मायभाषा : डॉ. वीणा सानेकर
देशात प्रथम रेडिओ केंद्र १९२७ पासून अस्तित्वात आले असे मानले जाते. १९५६ मध्ये ऑल इंडिया रेडिओ हे नाव योजले गेले आणि ‘आकाशवाणी ’ विविध भाषा आणि बोलीमधून दुमदुमू लागली. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन ही त्रिसूत्री समोर ठेवून आकाशवाणीचे कार्यक्रम अव्याहात सर्वाधिक लोकसंख्येपर्यंत पोहोचत असतात. नवीन वाहिन्या, चॅनेल्स आणि दृश्य माध्यमाचे आकर्षण हे सर्व त्या अर्थाने अलीकडचे आहे. त्यापूर्वीच आकाशवाणीने आपल्या सर्वांशी दृढ भावबंध जोडला होता.
मराठी साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक विषय, तरुणाईचे मुद्दे, संगीतविश्व या सर्वांशी निगडित असंख्य कार्यक्रम आकाशवाणीने निर्माण केले. अनेक नाट्यरूपांतरे, रूपके, उत्कृष्ट साहित्य कृतींचे अभिवाचन नाट्यमाध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचले. भाषा घडविण्याचा रियाज म्हणून मी अनेक वर्षे आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत आले. सादरीकरणाच्या अंगाने विविध कार्यक्रमांचा भागही झाले. केवळ संवाद आणि ध्वनी पार्श्वभूमीच्या साहाय्याने कार्यक्रम सदर करणे हे आव्हान आहे. मुक्ता भिडे, किशोर सोमण यांचे निवेदन ऐकणे हा अभ्यासाचा भाग होता.
यंदा भाषा दिनाच्या निमित्ताने उमा दीक्षितांची भेट झाली आणि आकाशवाणीशी जोडल्या गेलेल्या कित्येक आठवणी जाग्या झाल्या. सामाजिक कार्याचा वारसा पित्याकडून लाभलेली पूर्वाश्रमीची उमा शिंदे ही अतिशय संवेदनशील मुलगी. अतिशय नावीन्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती उमाने केली आहे.
विविध रंगमंचीय नाटकांचे नभोनाट्यरूपांतर सादर करण्यासाठी निर्माती म्हणून तिने परिश्रम घेतले आहेत. यात रंगमंचीय नाटकाचा उल्लेख करायचा तर ‘लेकुरे उदंड झाली’, ‘संशयकल्लोळ,’ ‘लहानपण देगा देवा,’ ‘हाच मुलाचा बाप,’’अनादि मी, अनंत मी,’ ‘वाऱ्यावरची वरात ‘अशा मराठीतील गाजलेल्या नाटकांचा समावेश आहे. असं घडलं नाटक, परदेशातला भारत, आठवणीच्या गंधकोशी, स्वयंपाक घरातील विज्ञान, मंत्र जगण्याचा अशा अविस्मरणीय कार्यक्रमांच्या संकल्पना तिने निर्मितीसह साकारल्या.
‘गाथा स्त्रीशक्तीची’ या तिने निर्मिलेल्या मालिकेला तर ‘लाडली’ या सामाजिक संस्थेचा पुरस्कारही लाभला. वनिता मंडळ हा स्त्रियांसाठीचा कार्यक्रम पाहताना त्याकरिता नवनवीन प्रयोग तिने केले. या विविध मालिकांची शीर्षकगीते तिच्या लेखणीतून साकारली. संगीतकारांच्या प्रतिभेची ओळख करून देणारा ‘तरी असेल गीत हे’ हा उमाच्या कल्पनेतून साकारलेला कार्यक्रमही चांगलाच गाजला होता.
अतिशय ऋजू स्वभावाची ही मुलगी मला आकाशवाणीत भेटली तेव्हा आम्ही दोघीनी आपापल्या कार्यक्षेत्रात नुकतेच पाऊल ठेवले होते. आज उमा दीक्षित सहायक संचालक(कार्यक्रम) प्रसारभारती या पदावर कार्यरत आहे. भाषेचा संबंध नावीन्यपूर्ण कल्पनाशी, सृजनशीलतेशी आहे. मराठी अभिजात संगीत, साहित्य, नाटक यांची मुशाफिरी करायची तर आकाशवाणीच्या आठवणींचा गंधकोश उलगडलाच पाहिजे. एखादे माध्यम समाजमानस घडवण्याचे काम कसे करू शकते याचा उत्तम आलेख यातून उभा राहतो.