विशेष – अच्युत गोडबोले
मीना प्रभूचं जाणं मनाला खूपच चटका लावून गेलं. माझे आणि तिचे गेल्या ४० वर्षांपासून अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. दर महिन्याला आमचं फोनवरून बोलणं व्हायचं. तिचं ‘माझे लंडन’ हे मला खूप आवडलेलं पुस्तक होतं. अनेक वर्षांनी आयटीमधल्या एका कंपनीचा मी चीफ एक्झिक्युटिव्ह असताना सेंट्रल लंडनमध्ये ग्रीन पार्क या ठिकाणी माझं ऑफिस होतं. तिथून मग पिकॅडिली सर्कस, ट्रॅफॅलगर स्क्वेअर, हाईड पार्क, ब्रिटिश म्युझियम अशा अनेक ठिकाणी फिरताना ‘माझे लंडन’ या पुस्तकाची वारंवार आठवण यायची. हे एक अफलातूनच पुस्तक आहे.
यानंतर मग मी तिची इतरही सगळी पुस्तकं वाचली. तिच्या न्यूयॉर्कवरच्या ‘न्यूयॉर्क न्यूयॉर्क’ या पुस्तकाचं प्रकाशन तर मी आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते झालं होतं.
न्यूयॉर्क हे माझं खूप आवडतं शहर आहे. तिथे सेंट्रल पार्क, दी व्हिलेज, ब्रॉडवे, UN ची इमारत, म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट, मॅनहटन, पब्लिक लायब्ररी, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, चायना टाऊन अशा असंख्य ठिकाणी अनेक वेळा मी मनमुराद भटकलो होतो. हे पुस्तक वाचताना पुन्हा एकदा मी या सगळ्या ठिकाणी फिरतोय असंच वाटलं होतं. प्रकाशनाच्या दिवशी या आठवणींना उजाळा मिळाला होता. मीनानं ते पुस्तक तर भन्नाटच लिहिलं होतं आणि आजही ते भन्नाटच आहे.
२०१७ च्या जानेवारीत लंडनच्या मराठी संमेलनात आमचा नादवेध हा कार्यक्रम सादर करण्यासाठी आम्हाला आमंत्रित केलेलं होतं. म्हणून मी, माझी बहीण सुलभाताई पिशवीकर, पुष्पा, भाग्यश्री मुळे आणि प्रशांत देशपांडे असे सर्व गेलो होतो. मीना तिथे होतीच. तिनं आम्हाला अगदी अगत्यानं कार्यक्रमानंतर तिच्या लंडनच्या घरी नेलं. ते घर एखाद्या सिनेमातल्या घरासारखं प्रशस्त आणि सुंदर होतं. त्यात तिची सौंदर्यदृष्टी सर्वत्र दिसत होती. त्यावेळी मलमली पुरणपोळ्या, खीर अशा अनेक चविष्ट पदार्थांची मेजवानीच तिनं आम्हाला दिली. आश्चर्य म्हणजे तिनं हे सर्व स्वतः बनवलेलं होतं. ती उत्तम पाककला
विशारद होती.
याच वेळी आपल्या स्वित्झर्लंडच्या घरी येण्याचंही तिनं आमंत्रण देऊन ठेवलं. लगेचच ऑगस्टमध्ये मी, शोभा आणि माझ्या दोघी बहिणी सुलभा आणि पुष्पा असे चौघेजण आम्ही स्वित्झर्लंडला गेलो. खूप उत्साहानं चार दिवस आम्हाला तिथे तिनं अशी ठिकाणं दाखवली की, जी अत्यंत सुंदर होती आणि कोणतीही ट्रॅव्हल कंपनी दाखवणार नाही अशी होती. विशेष म्हणजे हे सर्व तिनं दाखवताना स्वतः गाडी चालवून आमच्याबरोबर रस घेत आम्हाला फिरवलं. तिच्या शेजारी फ्रंट सीटवर मी बसत असे. उंच, अरुंद आणि वळणावळणाच्या घाटावर चढताना तिचं गाडी चालवणं एवढं भन्नाट होतं की, मी अगदी जीव मुठीत घेऊन बसे. त्यावरून ती माझी चेष्टाही करायची.
तिच्या घरी आम्ही गॅलरीत आरामात बसायचो. समोर उंच उंच आल्प्स पर्वताच्या रांगा, खाली विस्तीर्ण तलाव आणि अशा वेळी मीनानं आणलेली मक्याची गरमागरम भजी…
कसं विसरायचं हे सगळं ! तिच्या मदतनीस मुलीचं नाव होतं लेक. मीना आणि सुधू (मीनाचा नवरा) तिच्याशी लेकीप्रमाणेच वागत. ती थाई होती. आमच्यासाठी तिच्याकडून मीनानं खास चवदार थाईकरी बनवून घेतली होती.
काही वर्षांपूर्वी सिडनी, ऑस्ट्रेलिया इथे महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमात मी आणि रघुनाथ माशेळकर प्रमुख पाहुणे होतो. तिथे मीना प्रभूची मुलाखत झाली. ती खूप हृद्य होती. खडतर लहानपण पचवून आणि त्यानंतरचं वैभवही रसिकतेनं अर्थपूर्ण जगून तिनं सगळं जग पायाखाली घातलं आणि सुंदर लिखाणातून आपल्याला दाखवलंही. अशा मीनाला किती किती आठवावं !
इथला प्रवास संपवून, ती आता दूर दूर…
फारच दूरच्या प्रवासाला एकटीच निघून गेली आहे.
त्या प्रवासाचं वर्णन मात्र आपल्याला वाचायला मिळणार नाही !!