कथा – प्रा. देवबा पाटील
विज्ञानातील कोणताही प्रश्न विचारा, आनंदराव यांच्याजवळ त्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर तयारच असायचे. बरे ती कोणतीही गोष्ट इतकी स्पष्ट करून सांगायचे की, ती ऐकणाऱ्याला छानपणे समजायची व त्याच्या डोक्यात मस्तपैकी घुसायची.
त्यांचा नातू स्वरूप दररोज सकाळी त्यांच्यासोबत फिरताना त्यांना अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडायचा. ते आजोबाही अत्यानंदाने आपल्या लाडक्या अभ्यासू, जिज्ञासू व हुशार अशा नातवाच्या साऱ्या शंका-कुशंकाचे सुयोग्यशी उत्तरे देऊन त्याचे समाधान करीत असे. हसतखेळत, रमतगमत, गप्पाटप्पा करीत त्यांचे दररोजचे सकाळचे फिरणेही व्हायचे. फिरताना होणाऱ्या व्यायामासोबत स्वरूपचे विद्यार्जन व्हायचे व आजोबांचे ज्ञानदानही व्हायचे.
“ काहो आजोबा, झाडाच्या खोडांना व फांद्यांना बाहेरून साल का असते?” स्वरूपने विचारले.
“झाडाच्या फांदीच्या टोकाला जसजशा नवनवीन पेशी तयार होत असतात तसतशा बाजूच्या पेशींची पूर्ण वाढ होऊन त्यांचे लाकडात रुपांतर होत असते आणि त्याचवेळी बाहेरच्या बाजूच्या पेशींचे झाडाच्या सालीत रुपांतर होत असते. झाडाच्या खोडाचा व फांद्यांचा सर्वात बाहेरचा आपणास दिसणारा जो भाग असतो त्याला झाडाची साल म्हणतात. उन्हामुळे व पावसाच्या मायामुळे हा बाह्यभाग कडक व खरखरीत बनतो. आतील भाग वाळू नयेत, तसेच त्यांना काही दुखापत होऊ नये म्हणून निसर्गाने ही सालीची रचना केली आहे. म्हणजे ती साल झाडाच्या आतील नाजूक भागाच्या बाहेरील आघातांपासून संरक्षण करते. सालीचा सर्वात बाहेरचा थर जुना झाला की, त्यातील पेशी मरतात व तो थर गळून पडतो.” आनंदरावांनी सांगितले.
“झाडाच्या सावलीत थंड कसे काय वाटते आजोबा?” स्वरूपने प्रश्न केला.
“झाडाच्या पानांतून बाष्पीभवनाची क्रिया सतत सुरू असते. ती तयार झालेली वाफ वातावरणात जाते. झाडाभोवतीच्या वातावरणातील उष्णता कमी होते म्हणून हवेत गारवा जास्त राहतो. तसेही झाडाच्या दाट पानांमुळे सूर्याची उष्णताही झाडाखाली पोहोचत नाही. म्हणून झाडाच्या सावलीत थंडावा वाटतो.” आनंदरावांनी उत्तर दिले.
“आजोबा झाडांची पाने कशी गळतात?” स्वरूप त्याची जिज्ञासा दाखवत होता व आनंदरावांनाही त्याचे प्रश्न बघून आनंद होत होता.
आजोबा सांगू लागले, “पानांमध्ये हरितद्रव्यांच्या साहाय्यानेच अन्न तयार होत असल्यामुळे पानातील हरितद्रव्यांचे प्रमाण हळूहळू कमीकमी होत जाऊन पान नारिंगी-पिवळे पडू लागते. हिवाळ्यात सूर्यप्रकाश थोडा कमी असल्याने प्रकाशसंश्लेषणाची प्रक्रियाही मंदावते व पानांचा रंग बदलल्याने झाड सुंदर दिसते. पानांतील हरितद्रव्य नाहीसे होत गेल्याने ते पान पिवळे पडते, सुकते, वाळते व झाडावरून गळून पडते. त्यालाच “पानगळ” असे म्हणतात. जुन्या पानांच्या जागी पुन्हा नवीन पाने येतात व त्यातील हरितद्रव्य अधिक जोमाने अन्ननिर्मिती करते आणि त्या झाडाचे आयुष्य वाढत जाते. पानगळ झाली नसती, तर अन्ननिर्मिती बंद पडून झाड पूर्णपणे वाळून गेलेले असते.”
“पण मग ही पानगळ हिवाळ्यातच का होते?” स्वरूपने आपली शंका पुढे केली. “ हिवाळ्यात म्हणजे शरद ऋतूत सूर्यप्रकाश कमी असतो. त्यामुळे तापमानही कमी असते. त्यामुळे झाडांच्या पानांची प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया खूप मंदावते. त्यामुळे पाने पिवळी पडतात व गळतात. तसेच जर या दिवसात वारे जर जोराने वाहत असले तर ही पानगळसुद्धा जलदगतीने होते. वसंत ऋतूत झाडांना पुन्हा नवीन पालवी फुटते?” आजोबांनी सांगितले.
चल बाळा आता आपण परतूया व परत जाता जाता गप्पा करू या. आजोबा म्हणाले व ते परत फिरले.