दी लेडी बॉस : अर्चना सोंडे
आयुष्यात कोणतंही ध्येय गाठायचं असेल तर उच्च शिक्षण, पैसा हे भरपूर असले पाहिजे हा समज दूर होतोच. पण सोबतच पुरुष जे आव्हानात्मक काम करायला दोन पावले मागे येतील ते तिने पार पाडले ते देखील वयाच्या साठीमध्ये. आपल्या ठायी जर निर्धार, चिकाटी आणि जिद्द असेल तर कोणतेही स्वप्न साकार करू शकतो हा विश्वास जिने निर्माण केला ती म्हणजे एव्हरेस्टपर्वतच्या बेस कॅम्पवर चढाई करणारी वसंथी चेरुवीट्टिल.
वसंथी चेरुवीट्टिलचा जन्म केरळच्या कन्नूर येथे एका साध्या कुटुंबात झाला. लहानपणीच तिला आणि तिच्या कुटुंबीयांना विविध आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. परिणामी वसंथीला लहान वयातच जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागल्या. या समस्या असताना देखील वसंथीने आपल्या जीवनाची दिशा स्वतः ठरवण्याचा निर्धार केला. परिस्थितीअभावी तिला शाळेत जास्त शिकता आले नाही. तिला शिवण कामाची आवड होती आणि हेच कौशल्य पुढे जाऊन तिच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन बनले.खडतर आयुष्य पाचवीला पुजलेल्या वसंथीचा व्यवसायाने इलेक्ट्रिशिअन असणाऱ्या लक्ष्मण सोबत विवाह झाला. काही वर्षांत तिला दोन मुलगे झाले. विनिथ आणि विवेक असे त्यांचे नामकरण झाले. पतीच्या कमाईमध्ये घरखर्च भागवणे अवघड होते म्हणून वसंथी शिलाईची कामे करू लागली. लहान-सहान ऑर्डर मिळू लागल्या. केरळी पारंपरिक साड्या आणि कपडे शिवले. वसंथीने हळूहळू ग्राहकांची पसंती मिळवली. तिचा व्यवसाय चांगला चालू लागला. व्यवसायाच्या जोरावर तिने आपल्या दोन्ही मुलांना चांगले शिक्षण दिले. मुलं शिकली. विवेक सिनेमॅटोग्राफर बनला. काही वर्षांपूर्वी अल्झायमरने तिच्या पतीचे निधन झाले. तिच्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली.
टेलरिंग आणि आई या जबाबदाऱ्यांमध्ये अडकूनही ती आपल्या कुटुंबाची जबाबदारी उत्तम पार पाडत होती. वसंथीला प्रवासाची आवड होती. तिच्या वयाच्या महिलांसाठी नेहमीच्या मर्यादा होत्या, पण वसंथीने आपली स्वप्ने सोडली नाहीत. तिचा पहिला एकट्याने प्रवासाचा अनुभव अनपेक्षित होता. काही मित्रांसोबत तिने थायलंडला जाण्याचा बेत आखला होता, पण एक-एक करत सगळ्यांनी माघार घेतल्याने हा प्रवास एकट्याने करण्याचा निर्णय वसंथीने घेतला. ही सफर त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरली आणि त्यांना हे उमगले की, वय कोणत्याही स्वप्नासाठी अडथळा ठरू शकत नाही.वसंथीचे सर्वात मोठे ध्येय म्हणजे एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठणे. विशेष म्हणजे, तिला कोणतेही ट्रेकिंगचे अनुभव नव्हते. तसेच तिने कोणतेही औपचारिक प्रशिक्षणदेखील घेतले नव्हते. यूट्यूब व्हीडिओ पाहून तिने स्वतःच संपूर्ण योजना आखली. चार महिने तिने सातत्याने तयारी केली. रोज चार तास चालण्याचा सराव केला. सोबत ट्रेकिंग गियरबद्दल माहिती घेतली.
१५ फेब्रुवारी २०२५ रोजी वसंथीने नेपाळच्या सुरके येथून प्रवास सुरू केला. खडतर हवामान, कठीण भूप्रदेश आणि उंचावरील कमी ऑक्सिजन यांचा सामना करत तिने पुढे चालत राहण्याचा निर्धार केला. अखेर, आठ दिवसांच्या थरारक प्रवासानंतर, २३ फेब्रुवारी रोजी तिने एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठले. केरळी पारंपरिक साडी परिधान करत तिने त्याठिकाणी आपला तिरंगा फडकावला. भारताच्या एका कन्येने इतिहास घडवला. एकटी स्त्री आणि विधवा असल्यामुळे, प्रवासासाठी पैसा उभा करणे हे मोठे आव्हान होते. पण त्यांनी कधीही हार मानली नाही. त्यांनी आपल्या टेलरिंग व्यवसायातून बचत केली, अनावश्यक खर्च टाळले आणि वेळोवेळी त्यांच्या मुलांकडून काही मदत घेतली. पण त्यांचा आत्मविश्वास आणि जिद्द यामुळे त्या नेहमी पुढे जात राहिल्या.
एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठणे हा त्यांच्या प्रवासाचा शेवट नव्हता, तर नवीन सुरुवात होती. त्यांचे पुढील स्वप्न चीनमधील ‘ग्रेट वॉल’ पाहण्याचे आहे. त्यांच्यासारख्या अनेक महिलांना त्यांनी हे दाखवून दिले आहे की, वय, जबाबदाऱ्या आणि अडचणी या गोष्टी आपल्या स्वप्नांमध्ये अडथळा आणू शकत नाहीत.वसंथी चेरुवीट्टिल यांचे जीवन हा संघर्ष आणि चिकाटीचा उत्तम नमुना आहे. त्यांनी समाजातील पारंपरिक चौकटी मोडीत काढल्या आणि धैर्याने आपले जीवन जगले. त्यांची कहाणी केवळ त्यांच्या पिढीसाठीच नव्हे, तर आजच्या महिलांसाठीही प्रेरणादायी आहे. त्यांनी दाखवून दिले आहे की, आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी केवळ इच्छाशक्ती आणि मेहनत हवी.
त्यांचा प्रवास हे दाखवतो की, नवीन सुरुवात करण्यासाठी कधीही उशीर होत नाही. जोखीम पत्करून, समाजाच्या चौकटी मोडून आणि आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर, आपण कोणतेही स्वप्न पूर्ण करू शकतो. वसंथी यांनी दाखवून दिले आहे की, जगण्यासाठी धैर्य हवे आणि जग जिंकण्यासाठी जिद्द!