स्रियांची मौखिक लोकगीते हा भारतीय लोकसंस्कृतीचा आरसा आहे असं मला वाटतं. या लोकगीतांना हजारो वर्षांची परंपरा आहे. आज मी आपल्यासमोर अशाच एका सुपरिचित असलेल्या लोकगीतांविषयी माहिती सांगणार आहे .
ही लोकगीते कोणी लिहिली? कधी लिहिली? याचा काहीही थांगपत्ता नाही, कारण याचा रचेता कोण आहे, हे सांगता येत नाही… ही लोकगीते एका पिढीकडून, दुसऱ्या पिढीकडे मौखिक स्वरूपाने संक्रमित झालेली आहेत. महाराष्ट्रामध्ये बारा कोसाला बदलणारी मराठी भाषा आणि त्या मराठीतल्या शब्दकळा लोकगीतांमधून साकार झालेल्या असतात. अंगभूत लय असलेला हा कवितांचा प्रकार ओवी स्वरूपात जास्त परिचित आहे, यामध्ये जात्यावरच्या ओव्या किंवा विविध कामे करताना म्हणायची गीते. तसेच लग्न समारंभामध्ये या गीतांना अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे आजही ग्रामीण भागातून लग्न विधीमध्ये ही गीते म्हटली जातात. अगदी आदिवासी पाड्यांपासून ते शहरातील वस्तीपर्यंत ही पारंपरिक गीते गायली जातात. यामधून स्त्रिया त्यांचे भावविश्व साकार करतात. तसेच सासर, माहेरचं कौतुक एवढंच नाही, तर जे त्या अवलोकन करतात त्याचाही प्रत्येय लोकगीतातून येतो. उदाहरणार्थ शेतात काम करणारा शेतकरी असो किंवा तेथील प्राणी, पक्षी पाऊस, झाडं, ऊन, वारा, या सर्वांचा लोकगीतांमध्ये समावेश असतो. बोलीभाषेत असलेली लोकगीते ऐकायला अतिशय मधुर असल्यामुळे ती आपोआपच पाठ होतात आणि लोकगीतांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे कमीत कमी शब्दात मोठा आशय व्यक्त केलेला असतो.
अशाच लोकगीतांचा एक प्रकार आहे. भोंडला भुलाबाईची गाणी, ही परंपरेने चालत आलेली लोकगीते आहेत. त्यांचे मर्म जाणून घेण्याचा मी जेव्हा प्रयत्न केला, तेव्हा मला त्यातील अर्थसंदर्भाचा उलगडा झाला. या गीतांमधून समूहमनाचे प्रतिबिंब उमटते. या गीतांचा कर्ता ‘अनाम’ असतो; परंतु ही गीते इतकी लवचिक असतात की बदलत्या काळानुसार त्यामध्ये नवीन शब्द, प्रतिमा गुंफले जातात. त्याच चालीवर नव्याने शब्दांची रचना करून नव्या रूपात ही गीते साकार होतात, त्यामुळे बदलत्या काळाचे संदर्भही अशा गीतांमधून येतात. अशा गीतांमध्ये अनेकांच्या मनाचे रंग मिसळलेले असतात.
मानवी मनाच्या एकात्मतेचे अनोखे दर्शन त्यातून घडते. हादगा भोंडल्याच्या गाण्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न इतिहासाचार्य राजवाड्यांनी केला आहे, परंतु त्यातून गाण्याचे एकसंध चित्र उमटले नसले तरी, गाण्यांचे स्वरूप बऱ्यापैकी उलगडते. शब्दांमागे असलेले काळाचे संदर्भ, संस्कृती, परंपरा, संकेत, घटनांचे संदर्भ इत्यादींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर गाण्यातून साकार होणारे रूप डोळ्यांसमोर उभे राहू शकते.
भोंडला व हादग्याच्या गीतातून अनेक नात्यांवर प्रकाश पडतो उदाहरणार्थ सासू सुनेचं नातं, नणंद भावजयची नातं, जावा-जावांचं नातं अशा नात्यातील नोकझोक, खट्याळपणा समोर येतो.
भोंडला वा हादग्याचे नमन गीत : ऐलमा पैलमा गणेश देवा हे सर्व परिचित आहे. नवीन सासरी आलेल्या सुनेची पहिली मंगळागौर जेव्हा असते तेव्हा पारंपरिक वेश परिधान करून स्रियां भोंडल्याची गाणी म्हणून त्याबरोबर वेगवेगळे खेळही खेळतात. यातून करमणूकही होते आणि महत्त्वाचं म्हणजे पारंपरिक संस्कृती जोपासली जाते. अशाप्रकारे मंगळागौर साजरी करतात. प्रत्येक विधीमध्ये श्री गणेशाला असलेला मान इथेही खालील गाण्यामधून व्यक्त होतो.
ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा खेळ मांडून दे, करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडिला वेशिच्या दारी
पारवळ घुमते गिरिजा कपारी
पार्वतीच्या बाळाचे गुंजावणी डोळे…
अशाप्रकारे मूळतःच अंगभूत लय असलेला काव्यप्रकार या गाण्यांमधूनही पाहायला मिळतो.
भोंडला वा हादगा मांडल्यावर पहिल्या दिवशीचे पहिले गाणे म्हणून ऐलमा पैलमा या गाण्याला मान दिला जातो, ‘ऐलमा पैलमा’ या नमनगीताचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यातून आणखी वेगळेही अर्थ आपल्यासमोर येतात.
ऐलमा पैलमा शब्दाचा अर्थ ऐल-पैल असा होतो. ऐल पैल या दोन शब्दांना मराठी भाषेत विशिष्ट अर्थ आहे. त्यातून विशिष्ट संकेत मिळतो. ऐल म्हणजे अलीकडचे, पैल म्हणजे पलीकडचे. परंतु ऐल म्हणजे ईहलोक तर पैल म्हणजे परलोक असा संकेत त्यातून दर्शविला जातो. माणसाला ईहलोकीचे जीवन जगत असताना परलोकाविषयी नेहमीच आकर्षण असते. ऐल आणि पैल यांच्यामध्ये वेस असते. या वेशीच्या दारांतला खेळ प्रपंचाचा तर नसेल ना? असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो. सहज सोप्या साध्या शब्दांमध्ये म्हटलेली ही लोकगीतं आपल्याला विचार करायला लावतात. भोंडल्याची गाणी म्हणजे खेळाची गाणी. असे खेळ खेळत त्यातून जीवनाचे तत्वज्ञान व्यक्त करत ते एका उंचीवर घेऊन जातात. एकमेकींच्या हातात हात गुंफून फेर धरून गणेशाची आराधना करून झाल्यानंतर पुढच्या गाण्याला सुरुवात होते…
एविन गा तेविन गा ….
कांडा तिळ बाई तांदूळ घ्या
आमच्या आया तुमच्या आया
खातील काय दुधोंडे
दुधोंड्याची लागली टाळी… (चाल बदल)
आयुष्य दे रे बा माळी
माळी गेला शेता भाता…. (चाल बदल)
पाऊस पडला येताजाता
पडपड पावसा थेंबाथेंबी
थेंबाथेंबी आळव्या लोंबी
आळव्या लोंबती अंकणा (चाल बदल)
अंकणा तुझी सात कणसं
भोंडल्या तुझी सोळा वर्ष
या गाण्यांमध्ये निसर्गातील अनेक विभ्रम आलेले आहेत. यामध्ये पाऊस, शेतातील पीक याचा संदर्भ येतो. रोजच्या जीवनातील घटना प्रसंग या गाण्यातून गुंफलेले असतात. तसेच स्त्रियांची रोजची कामे ती म्हणजे रांधणे, वाढणे, स्वयंपाक यातून साकार होणारं स्री जीवन व्यक्त होतं. त्याचप्रमाणे वेगवेगळे सोपे, साधे, खेळ टाळीच्या ठेक्यांमध्ये ऐकायला खूप छान वाटतात… असंच आणखी एक गीत म्हणजे,
पोरी पिंगा गं…
पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा !
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली,
रात जागवली पोरी पिंगा !
फेटा बांधल्याला भाऊ माझा गं
जावई तुझा गं पोरी पिंगा
सासरी असलेल्या सासुरवाशीने या निमित्ताने एकमेकींबरोबर आनंदाने काही क्षण घालतात. काही काळासाठी तरी शारीरिक कष्ट विसरतात.
या गाण्यांमधून अनेक नात्यांची जवळीक त्याचबरोबर केलेलं कौतुक पाहायला मिळतं… हा सामुदायिक खेळ खेळताना समूह मनाचं प्रतिबिंब त्यामधून उमटतं. पुढे दुसरी म्हणते…
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली,
झोप चाळिवली पोरी पिंगा !
शालू नेसल्याली भैन माझी ग
सून तुझी गं पोरी पिंगा
अशाप्रकारे ही ताजीतवानी, मनाला प्रसन्न करणारी गीतं. आजही म्हटली जातात हेच खरं या गीतांचा श्रेष्ठत्व आहे. अशाप्रकारे ही स्त्रियांची ग्रामीण लोकगीते आपल्या संस्कृतीचा एक सुंदर आरसाच आहेत असे म्हटल्यास फारसे वावगे ठरू नये.
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…