कथा – रमेश तांबे
सोनापूर नावाचं गाव होतं. त्या गावाच्या माळरानावर एक मोठं पिंपळाचं झाड होतं. खूप मोठं, भरपूर फांद्या आणि भरपूर पानांचं! ते झाड गावातच नव्हे, तर आजूबाजूच्या गावांमध्येही भुताटकीचं झाड म्हणून कुप्रसिद्ध होतं. रात्रीचं तर सोडूनच द्या, पण दिवसा उजेडीदेखील कुणी तिथे जाण्यास धजावत नसे. हिंमत दाखवत नसे. लोकांची वर्दळ नसल्याने पिंपळ झाड खूप डेरेदार बनलं होतं. झाडाखाली सुक्या पानांचा नुसता खच पडलेला असायचा. वाऱ्याच्या झोताबरोबर पाने सळसळ करीत आवाज करायची. तो सळसळीचा आवाज परिसराची शांतता भंग करायचा.
अशा या पिंपळ झाडावर मुंबईच्या तीन मुली दीक्षा, वृंदा आणि शोभा रात्रभर मुक्काम करणार आहेत हे समजताच गावातल्या अनेक लोकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्या आपल्या निर्णयावर ठाम होत्या. शेवटी पंचायत बसली अन् भुतांना त्रास दिला, तर सगळ्या गावाला त्रास होईल असा निर्णय घेऊन दीक्षा आणि तिच्या मैत्रिणींना गावाबाहेर काढले. संध्याकाळची वेळ होती. आता आपण कुठे जाणार याचा विचार करता करता दीक्षा म्हणाली, “ काही हरकत नाही. उद्या कशाला आजच आपण झाडावर जाऊन बसायचं.” असं ठरवून तिघींनी आपापल्या बॅगा उचलल्या अन् पिंपळाच्या झाडाच्या दिशेने चालू लागल्या.
आता अंधार पडू लागला होता. हवेत गारवा वाढला होता. बोचरी हवा वाहू लागली होती. चांदण्यांच्या उजेडात त्या तिघींचा प्रवास सुरू झाला होता. थोड्याच वेळात त्या गावाच्या वेशीबाहेर पडल्या. अजूूनही देवळाच्या घंटांचे अस्पष्ट आवाज कानावर पडत होते. जेवणाची वेळ झाली होती. जेवण कुठे करायचे याचा विचार करीत असतानाच कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज ऐकू आला. दीक्षाने त्या मिट्ट काळोखात आपली नजर फिरवली, तर तिला दूरवर उजेड दिसला. मग तिघी त्या दिशेने वळाल्या. झोपडीचा दरवाजा उघडाच होता. दीक्षाने हाक मारली, “ कुणी आहे का?” तेवढ्यात एक तरुण स्त्री बाहेर आली. तिला बघून सर्वजणी आश्चर्यचकित झाल्या. रात्रीच्या वेळी या तीन मुली इथे कशासाठी आल्यात? असा प्रश्नार्थक भाव त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर मुलींना दिसला. तोच वृंदा म्हणाली, “आम्हाला जेवायचं आहे. जेवण करून आम्ही आमच्या गावाला निघून जाऊ. थोडा वेळ बसू का इथे?” तिने जरा आढेवेढे घेतले; परंतु नंतर होकार दिला.
दीक्षाच्या मनात मात्र चक्र सुरू झालं. ही एकटी स्त्री या झोपडीत काय करते आहे. पिंपळ झाडाची भुताटकी आणि हिचा काही संबंध तर नाही ना? असा विचार तिच्या मनामध्ये सुरू झाला. पंधरा मिनिटातच आपले जेवण उरकून त्या स्त्रीला निरोप देऊन तिघी निघाल्या. पाच मिनिटातच कुठली तरी आकृती अंधारातून पुढे पळत जाताना त्यांना दिसली. शोभा कुजबुजली, “ कदाचित तीच बाई असावी!” मग त्याही सावध झाल्या. हळूहळू भुताटकीचा पिंपळ अस्पष्ट दिसू लागला होता.
तितक्यात अंधारात त्यांना दोन-तीन आकृत्या दिसल्या अन् त्या अचानक गायब झाल्या. आता काय करायचं हा प्रश्न तिघींपुढे उभा राहिला. दीक्षा म्हणाली,
“काही हरकत नाही. ती माणसं आपल्याला घाबरवण्यासाठी झाडावर चढलेली आहेत. आपण सरळ पुढे जाऊ आणि झाडाखालीच बैठक मारू.” त्या पुढे निघाल्या तसं कुत्र्यांचं विव्हळणं ऐकू येऊ लागलं. चित्र-विचित्र आवाज येऊ लागले. शोभा म्हणाली ,
“घाबरायचं नाही. हीच माणसं आवाज काढत आहेत.” तोच अंगावर टपटप पिंपळ पाने पडली. तेव्हा मात्र वृंदा थोडी दचकलीच! मग दीक्षाने बॅगेतून बॅटरी काढली अन् तिचा प्रकाश पिंपळावर पाडला. पाहते तर काय दोन पुरुष आणि तीच बाई पिंपळावर! तिथल्या शांततेचा भंग करत शोभा म्हणाली, “सरळ शरण या. आम्ही पोलीस आहोत. नाही तर आम्हाला बंदूक चालवावी लागेल.” बॅटरीचा प्रकाश तोंडावर पडताच ती बाई घाबरली आणि धपकन खाली पडली अन् “आई गं आई गं” अशी जोरात ओरडली. तोच पिंपळावरच्या आणखीन दोघांनी पटापट उड्या मारल्या आणि ते चक्क तेथून पळून गेले. त्या बाईला तिथेच टाकून. शोभाने पटकन धाव घेत तिला पकडले अन् सारेजण गावाच्या दिशेने चालू लागले.
सकाळी बरोबर दहा वाजता गावाच्या पंचायतीसमोर त्या बाईला मुलींंनी हजर केलं. दीक्षाने फोन करून पोलिसांना बोलवले होतेच. पिंपळ झाडाच्या खऱ्या भुताला मुलींनी चक्क गावात आणलं हे बघून साऱ्या गावाने तोंडातच बोटं घातली. सारा गाव भुताला बघायला जमला होता. मुली म्हणाल्या,“ हे बघा पिंपळावरचं भूत!’’ मग घाबरत घाबरत त्या बाईने सगळी गोष्ट सांगितली. “गेली वीस वर्षे आम्ही चोरीचा माल पिंपळाजवळ लपवून ठेवतो आहोत. तो सुरक्षित राहावा म्हणून आम्हीच भुताची खोटी बातमी सर्वत्र पसरवली होती.” मग तिने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी तिच्या साथीदारांना तासाभरातच अटक केली. मुंबईच्या धाडसी मुलींनी गेल्या वीस वर्षापासून भीतीच्या छायेत राहाणाऱ्या गावाला भीतीमुक्त केले होते. मग गावानेच या तिघींचा फार मोठा सत्कार केला. अन् सन्मानाने मुंबईला पाठवले.