Monday, May 12, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Arvind Singh Mewar : महाराणा प्रताप यांचे वंशज अरविंद सिंह मेवाड यांचे निधन

Arvind Singh Mewar : महाराणा प्रताप यांचे वंशज अरविंद सिंह मेवाड यांचे निधन
उदयपूर : मेवाडच्या राजघराण्याचे सदस्य आणि एचआरएच हॉटेल समुहाचे अध्यक्ष अरविंद सिंह मेवाड यांचे प्रदीर्घ आजारपणामुळे उदयपूर येथे निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते.



अरविंद सिंह मेवाड हे मेवाडचे राजे महाराणा प्रताप यांचे वंशज होते. उदयपूर येथील सिटी पॅलेसमधील शंभू निवासात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अरविंद सिंह मेवाड यांच्या मागे पत्नी विजयराज कुमारी, मुलगा लक्ष्यराज सिंह मेवाड, मुलगी भार्गवी कुमारी मेवाड आणि पद्मजा कुमारी परमार असा परिवार आहे. सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली.



अरविंद सिंह मेवाड हे भगवंत सिंह मेवाड आणि सुशीला कुमारी यांचे धाकटे पुत्र होते. त्यांचे मोठे बंधू महेंद्र सिंह मेवाड यांचे मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात निधन झाले होते. अजमेरच्या मेयो महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. त्यानंतर त्यांनी ब्रिटनमध्ये जाऊन हॉटेल मॅनेजमेंटची पदवी घेतली. तसेच विविध आंतरराष्ट्रीय हॉटेलमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतले होते.

एचआरएच ग्रुप ऑफ हॉटेल्सची स्थापना त्यांनी केली होती. तसेच त्यांनी बरीच वर्ष शिकागो येथे राहून काम केले. मेवाड यांना क्रिकेट, पोलो आणि संगीताची आवड होती. त्यांनी राजस्थानच्या रणजी क्रिकेट संघाचे कर्णधारपदही भूषविले होते. तब्बल दोन दशके त्यांनी क्रिकेटपटू म्हणून मैदान गाजवले होते.

संपत्तीचा वाद

भगवंत सिंह मेवाड १९५५ मध्ये महाराणा झाले. यानंतर काही काळातच संपत्तीवरुन त्यांच्या मुलांमध्ये वादाला सुरुवात झाली. भगवंत सिंह मेवाड यांनी वारशात मिळालेली संपत्ती विकण्यास आणि भाडेतत्त्वावर देण्यास सुरुवात केली. हा निर्णय पटला नाही म्हणून भगवंत सिंह मेवाड यांचे ज्येष्ठ पुत्र महेंद्र सिंह मेवाड यांनी न्यायालयात दाद मागितली. महेंद्र सिंह मेवाड यांच्या कृतीमुळे संपत्तीच्या मुद्यावरुन वाद सुरू झाला. महेंद्र सिंह मेवाड आणि त्यांचे धाकटे बंधू अरविंद सिंह मेवाड यांच्यात वाद सुरू झाला. हा वाद सुमारे ७० वर्षे असाच सुरू राहिला. मीडिया रिपोर्टनुसार मेवाड घराण्याची एकूण संपत्ती १० हजार कोटींच्या घरात जाते. या वादाचे पुढे काय होणार हे लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment