स्नेहधारा – पूनम राणे
माणूस जन्माला येतो आणि या सृष्टीतून निघून जातो. विचारही जन्माला येतात; परंतु ते मात्र कायम टिकतात. पतीच्या खांद्याला खांदा लावणाऱ्या, समाज क्रांतीचा रथ सुरू ठेवणाऱ्या, शिक्षिका, मुख्याध्यापिका, समाजसेविका, लेखिका, दलितांच्या माता, स्त्रीमुक्तीच्या आद्य प्रणेत्या, असणाऱ्या सावित्रीबाईंची आजची ही कथा.
शेताच्या बांधावरून इकडून तिकडे छोटी चिमुरडी स्वच्छंदपणे बागडत होती. तेवढ्यात एका अनोळखी व्यक्तीने गाव पाहायची इच्छा व्यक्त केली. सारा गाव तिने त्या व्यक्तीला छान माहिती देऊन दाखविला. साहेब खूश त्याने तिला भेटवस्तू दिली. ती भेट होती, एक पुस्तक.
बिचारी… हातात पुस्तक घेऊन केवळ पानांवर पाने चाळू लागली. वाचता येत नव्हते. काय करावे? घरी जाऊन परकराच्या घडीत जपून ठेवले. मात्र दिवस-रात्र एकच विचार, “ मलाही लिहिता वाचता यायला हवे.” प्रसंग अनेकांना वळण लावतात. पण प्रसंगाला वळण लावणारी ही चिमुरडी सावित्रीबाई फुले.
अत्यंत हुशार, स्वाभिमानी अशा सावित्रीचा विवाह महात्मा जोतिराव फुले यांच्याशी झाला. दुधात साखर विरघळावी असे नियोजन नियतीने केले होते.
लग्नानंतर छोटी सावित्री दुपारची न्याहारी घेऊन शेतात जात असे. न्याहारी वाढताना ती जोतिबांना अनेक प्रश्न विचारत असे, ‘‘धनी, हे बघा ज्वारीचं कणीस कसं डुलतंय!” त्यावर इतके दाणे कसे लागलेत.” ते पाहा मोगऱ्याचे झाडं.” त्यावर इतकी फुले कशी लागली.” जोतिबा सांगत, ‘‘सावित्री, याकरिता एका ‘बी’ ने स्वतःला जमिनीत गाडून घेतलेलं असतं.”
जोतिबांच्या या उत्तराचे मर्म सावित्रीने जाणले आणि विचार पक्का झाला…
दुसऱ्या दिवशी परकरात जपून ठेवलेलं पुस्तक बागेत आणलं आणि जोतिबांना दाखवत म्हणाल्या, ‘‘हे पाहा मला यातील काही वाचता येत नाही. मला शिकवा ना, आपण. जोतिबा थोडा वेळ काढून सावित्रीला शिकवू लागले. मातीच पाटी आणि काठीच खडू झालेला होता. छान माती एकसारखी करावी आणि त्यावर काठी न् अक्षर लिहावीत, पुन्हा पुसावीत, असा नित्यक्रम सुरू झाला. ध्येयप्राप्तीसाठी घेतलेला सुखकारक अनुभव सावित्रीबाईंच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असे. मात्र काही कपाळकरंट्यांनी जोतिबांच्या वडिलांवर दडपण आणले. घरी आल्यावर मुलाची त्यांनी कानउघाडणी केली.
“माझं घर तुला सोडावं लागेल.” जोतिबांसोबत सावित्रीने घराचा त्याग केला.
स्त्रियांचे प्रश्न, पुनर्विवाह, विधवा विवाह, सतीची चाल, जातीभेद, बालहत्या, देवदासी पद्धत या अनिष्ट प्रथांना पायबंद घालण्याचे साधन म्हणजे शिक्षण.
“माणसाचे शरीर रोगी असेल तर बरे करता येईल, पण मन रोगी असेल तर बरे करणे कठीण!” म्हणून त्या म्हणत मनाचा रोग नाहीसा करण्याचे साधन म्हणजे विद्या.
यासाठी त्यांनी अनेक हालअपेष्टा सहन करून शाळा काढली. अंगावर शेंण, दगड टाकून शिव्या देऊन अपमानित केले. पण त्यांनी जिद्द सोडली नाही. केशवपण करणाऱ्या न्हाव्यांचा संप घडवून आणला. सती जाणे ही प्रथा बंद केली. एका शिक्षित स्त्रीने त्या काळात उचललेलं क्रांतिकारी पाऊल होते. त्याची जाणीव आजच्या महिलांनी ठेवायला हवी.
१८९३ मध्ये सत्यशोधक परिषदेच्या त्या अध्यक्षा होत्या. त्याप्रमाणे त्यांनी काव्यफुले, बावनकशी, सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रह लिहिले. प्लेगच्या साथीत त्यांचा १० मार्च १८९७ ला मृत्यू झाला.