Monday, April 21, 2025
Homeसाप्ताहिककोलाज‘ली प्यारने अंगड़ाई…’

‘ली प्यारने अंगड़ाई…’

नॉस्टॅल्जिया – श्रीनिवास बेलसरे

काही गाणी फक्त त्यांच्या संगीतामुळे, विशेषत: त्यांच्या ठेक्यामुळे आपल्याला बांधून ठेवतात. देशात १९५२ पासून आलेले ‘इस्टमन कलर’ तंत्रज्ञान त्याकाळी खूप लोकप्रिय झालेले होते. त्यामुळे पडद्यावरची मनोहारी दृश्ये आणि संथ, कर्णमधुर संगीताचा आस्वाद घेण्यात रमलेल्या तत्कालीन प्रेक्षकांचे अशा गाण्यातील कवितेकडे सहजच दुर्लक्ष होऊन जायचे. वर्षानुवर्षे गाणे ऐकूनही आठवणीत राहायचा तो गाण्याचा ठेका आणि पडद्यावरची रम्य दृश्येच. त्यात पुन्हा चित्रपटाचे सगळे चित्रीकरण जर काश्मीरसारख्या निसर्गरम्य भागात झाले असेल आणि संगीतकार ठेकेबाज ओ. पी.नय्यर असतील तर विचारायलाच नको. पण जर गाण्याचे गीतकार शमसुल हुदा बिहारींसारखे दर्दी असतील तर गाण्यातली कविताही तितकीच मनाची पकड घेत असे.

सिनेमा होता १९६४ साली आलेला ‘कश्मीर की कली’! शक्ती सामंता यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात प्रमुख भूमिकेत होता – स्वत:ची प्रतिमा आपल्या बहुतेक सिनेमात जाणीवपूर्वक स्वच्छंदी, मुडी, उदार, काहीसा वेडपट तरुण अशीच ठेवू इच्छिणारा शम्मी कपूर. सोबत हिंदीत प्रथमच पदार्पण करणारी शर्मिला टागोर, प्राण, नाझीर हुसैन, धुमाळ, अनुपकुमार, मदनपुरी, पद्मा देवी, पद्मा चव्हाण, टूनटून असे कलाकार होते.

चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले न झाले तोच चित्रीकरणाच्या जागी पावसाची प्रचंड झड लागली. ती किती दिवस लागावी? तर तब्बल २१ दिवस! क्षणभरही न थांबणाऱ्या पावसामुळे सगळे चित्रीकरण ठप्प झाले. पण याचा एक वेगळाच फायदा झाला! जेव्हा पाऊस थांबला तेव्हा मात्र पुन्हा पाऊस आला तर काय या भीतीने चित्रीकरणाने एकदम वेग घेतला आणि संपूर्ण सिनेमा फक्त २५ दिवसांत पूर्ण झाला!

प्रेक्षकांना काश्मीरची दृश्ये पाहताना वेगळाच आनंद मिळत असे. कारण एकंदरच कश्मीर पर्यटन आपल्याला शक्यच नाही अशी सर्वांचीच धारणा होती. त्यामुळे सिनेमाला प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली. त्या वर्षीच्या सर्वात जास्त उत्पन्न देणाऱ्या चित्रपटात ‘कश्मीर की कली’चा क्रमांक सहावा होता. पुढे एन. टी. रामाराव यांना घेऊन तेलुगूमध्ये कश्मीर की कलीचा ‘शृंगारा रामुडू’ नावाने तेलुगू रिमेकही निघाला.

गीतकार एस. एच. बिहारी यांनी लिहिलेली सर्वच गाणी कमालीची लोकप्रिय झाली. त्यात ‘तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हे बनाया’, ‘इशारो इशारोमे दिल लेनेवाले बता ये हुनर तुने सिखा कहांसे’, ‘हाय रे हाय, ये मेरे हाथमे तेरा हाथ, नये जजबात, मेरी जान बल्ले बल्ले’, ‘हैं दुनिया उसीकी जमाना उसीका’सारखी गाणी होती.

काश्मीरच्या ‘दल-लेक’मध्ये चित्रित झालेले एक गाणे आजही अनेकांच्या स्मरणात ताजे आहे. शम्मी कपूर आणि शर्मिलाचे प्रेम हे कथेतील अत्युच्य बिंदूवर पोहोचलेले असते. शम्मी कपूरला लग्नाची घाई झालेली असते. तो शर्मिलाला ‘मला तुझ्या वडिलांना भेटायचे आहे’ असे सांगतो. त्या प्रसंगावर एस. एच. बिहारी यांनी हे गाणे लिहिले होते. प्रेक्षकांना डोलायला लावणाऱ्या त्या कर्णमधुर गाण्यात आवाज होते महमंद रफी आणि आशा भोसले यांचे तर गाण्याचे शब्द होते –

‘दीवाना हुआ बादल,
सावनकी घटा छाई.
ये देखके दिल झूमा,
ली प्यारने अंगडाई…’

‘दिवाना’ या शब्दाचा अर्थ खरे तर सरळ वेडा असाच आहे. पण हिंदी चित्रपटसृष्टीने सतत आपल्या रोमँटिक शैलीत या शब्दाचा वापर करून या शब्दाला खूपच सौम्य करून टाकले आहे. जेव्हा शम्मी कपूरला शर्मिला ‘दिवाना’ म्हणते तेव्हा तो कश्मीरच्या निळ्याभोर आकाशात वेगाने धावणाऱ्या ढंगानाच वेडे ठरवून मोकळा होतो आणि त्याच्या मनात निर्माण झालेल्या शर्मिलाबद्दलच्या प्रेमाच्या वेडाचे समर्थन करतो.

संपूर्ण गाणे पाहताना प्रेक्षकांचे लक्ष सतत शर्मिलाच्या लालभडक लिपस्टिककडे आणि दल लेकच्या, कश्मीरच्या निसर्गसौंदर्याकडे आलटून पालटून वेधले जाते. ‘आकाशातले हे बेधुंद वेगाने धावणारे ढग पाहून, पावसाचा एखाद्या थंडगार सरीची शक्यता दिसत असताना माझ्या मनात तुझ्या प्रेमाने पुन्हा उचल खाल्ली आहे’ असे शम्मीचे निवेदन आहे. तो म्हणतो, खरे तर माझे नशीब काही इतके चांगले नव्हते की मला तुझ्यासारखी प्रेमिका मिळावी. पण तुझी भेट झाल्यापासून, तुझ्या एकेक अदा न्याहाळल्यापासून माझे मन अगदी वेडावले आहे.

‘ऐसी तो मेरी तक़दीर न थी,
तुमसा जो कोई महबूब मिले.
दिल आज खुशीसे पागल है,
ऐ जान-ए-वफ़ा तुम खूब मिले.
दिल क्यूँ ना बने पागल,
क्या तुमने अदा पाई.
ये देखके दिल झूमा…’

यावर शर्मिलाचे स्त्रीसुलभ प्रांजल निवेदन मोठे सुंदर आहे. ती म्हणते, ‘प्रिया, तुझ्याशी नजरानजर झाल्यापासून माझ्या काळजात जणू आगळ्या भावनांचे एक वादळच उठले आहे. मी गवताच्या एखाद्या तुसासारखी त्या वादळात वाहून गेले. भावनांचा तो पूर काही मला आवरता आला नाही. माझ्या सगळ्या भावविश्वात प्रचंड खळबळ माजली आहे रे!’ तिचे पुढचे वाक्यही एका सुसंस्कारित तरुणीचे आहे. ती म्हणते, ‘तुला भेटल्यापासूनच माझ्या मनात सनई वाजू लागली आहे.’ म्हणजे ती प्रियकराकडे अगदी संयतपणे पण त्यांच्या लग्नाचीच सूचना करते आहे.

‘जब तुमसे नजर टकराई सनम,
जज्बातका इक तूफान उठा.
तिनकेकी तरह मैं बह निकली,
सैलाब मेरे रोके न रुका.
जीवन में मची हलचल,
और बजने लगी शहनाई.
ये देखके दिल झूमा…’

इकडे शम्मीच्या मनाचीही काही वेगळी अवस्था नाही. तो म्हणतो ‘माझ्या मनातही खूप रम्य अशी स्वप्ने, आकांक्षा जाग्या झाल्या आहेत. कितीतरी दिवस मला असे वाटत होते की अवतीभवती सतत फक्त पानगळीचा उदास ऋतूच सुरू आहे. पण जेव्हा तू भेटलीस तेव्हापासून माझ्या जीवनात जणू वसंत ऋतूच फुलू लागला आहे, असे वाटतेय. माझे मन नाचू लागले आहे. आपल्या प्रेमाला बहर आला आहे.’

‘है आज नये अरमानोंसे,
आबाद मेरे दिल की नगरी.
बरसोंसे फिजाका मौसम था,
वीरान बड़ी दुनिया थी मेरी.
हाथों में तेरा आँचल,
आया के बहार आई.
ये देखके दिल झूमा,
ली प्यारने अंगडाई.’

अशी अगदी सहज साध्या शब्दांनी आणि मधुर संगीताने श्रोत्याच्या मनात सप्तरंगी वसंत ऋतू फुलवणारी गाणी ऐकून मनाला ताजेतवाने करून घेणे तसे किती सोपे आहे, नाही?

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -