माेरपीस :पूजा काळे
पानगळीच्या सुरुवातीच्या दिवसांत पानांवर दिसून आलेले बदल झाडापर्यंत पोहोचतात. ओकीबोकी निष्पर्ण झाडं नजरेला तितकीशी आल्हाददायक, सुखद वाटत नाहीत. तीन पानांच्या पळस झाडावरील, पिवळ्या फुलांचा बहर पाहता, वसंत ऋतूच्या आगमनाची बातमी चहूबाजूस पसरायला वेळ लागत नाही. कोकिल गुंजन, पक्षी स्थलांतरित होण्याचा सक्रिय काळ याच दिवसात घडतो. डोंगरमाथ्याशी, रानोमाळी पिवळी शिवार डोलू लागतात. पशू, पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी निसर्गाने रचलेली किमया म्हणजे चमत्कारचं रूप. रंगाच्या फुलांची बरसात निसर्गाने भरभरून दिल्याच्या खुणा सांगतात. ऋतू सजायला लागले की, मनातही मांडे खुलू लागतात. डोळ्याचं पारडं जड होतं. बहराच्या मोसमाला कुणाची दृष्ट न लागण्याचं भान निसर्ग राखतो. कुशीमातीतल्या एकेका तांबड्या कणावर अंकुराचं बीजारोपण करणाऱ्या इवल्याशा फुलांची मोजदाद होऊ शकत नाही. दार, परसदार, मळा, पाणवठा, रानमळा, बांदावर वैविध्यपूर्ण रंगातल्या, विविध आकारातल्या रानफुलं, पानफुलांची अनोखी दुनिया साऱ्यांना मोहात पाडते.
जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात मुंबईत बहुतांश ठिकाणी मनमोहक झाडं, फुलझाडाचं प्रदर्शन पाहण्याचा योग आला. छोट्या बोन्सायपासून ते अगदी वड-पिंपळापर्यंतच्या झाडांची मुबलकता, फुलझाडांची दुनिया. ज्यातील रंग फुलपाखराप्रमाणे दृष्टीलाही सुखावणारे. त्या दिवशी जिजामाता उद्यानातली एक संध्याकाळ, ही धकाधकीच्या जीवनातलं एक ओएसिस होतं. आठवडाभर चाललेल्या प्रदर्शनानं मुंबईच्या मुकुटावर मोरपीस चढलं; एवढी विविधता झाडं, पानं, फुलात प्रथमचं माझ्या पाहण्यात आली. देशोदेशीच्या जैवविविधतेचा अाविष्कार पाहून, फुलझाडं प्रकारातल्या नावीन्यपूर्ण शोधांनी मुंबईकर अचंबित न होवोत तर नवल! वर्षातून एकदा होणारं प्रदर्शन आकर्षणाचा बिंदू ठरलं हे वेगळं सांगायला नको. यावेळी महानगरपालिकेच्या उद्यानात फुलझाडांवर घेतलेली मेहनत दिसून आली. वातावरणाशी जुळणारी फुलझाडं देखरेखीखाली असतात. विविध जाती प्रकारातले गुलाब, अष्टर, शेवंती असल्याने प्रथमच जास्वंदी फुलांचे प्रदर्शन मोठ्या प्रमाणावर दृष्टीस आले.
जास्वंद फुलाबद्दलची उत्सुकता वाढण्याचे कारण बहुधा हेच असावं. लहानपणापासूनच काही समजुती असतात ना, अगदी तसंच होतं माझं. गणपतीला आवडणारी लाल रंगांची फुलं ती जास्वंदी होय हेचं फिट बसलं होतं डोक्यात. आईकडून ऐकलेले काही औषधी उपयोग, गुणधर्म वगळता जास्वंद तेवढी माहीतही नव्हती मला. पण रंगाच्या विविधतेत पहिल्या नंबरवर असणारी लाल, पिवळी, शेंदरी, गुलाबी, तांबडी, भगवी फुलं प्रथमदर्शनी डोळ्यांत भरली. दोन, चार, सहा पाकळ्यांत जास्वंदीचा टवटवीतपणा दिसला. मलेशिया, दक्षिण कोरियाचं राष्ट्रीय फूल गणलेल्या जास्वंदी फुलाला इंग्रजीत हिबिस्कस नावाने ओळखतात हे माहीत असूनही जास्वंद म्हणजे आपल्याकडीलचं फूल हा गोड गैरसमज त्या दिवशी दूर झाला. बहुवार्षिक वनस्पतीत भरपूर फुलं देणारी जास्वंदी ही हरिवल्लभ, जयपुष्पी, रक्तपुष्पी, रुद्रपुष्पी, जपा(संस्कृत), अरुणा, जवाकुसुम, शू-फ्लॉवर नावाने ओळखली जाते. दाट झाडीतून डोकावणारे अतिशय मोहक पण सुगंधरहित फूल ज्याला कडक सूर्यप्रकाश लागतो. देवाला वाहण्यापासून, औषधी गुणधर्मयुक्त अशा जास्वंदीचा वापर खाण्याच्या पदार्थासाठी होतो हेही तितकचं महत्त्वाचं. केशवर्धक तेल ते सूप, चटणी, जेली इत्यादींसाठी ही जास्वंद उपयोगी ठरते. अभ्यासाने शिकता येतं या अन्वये मी जास्वंदी फुलाच्या अभ्यासात गुंतले. फुलांशी बोलता आलं, तर त्यांची ओळखही ओळखीची होते. ज्येष्ठ कवयित्री अंजना कर्णिक यांचं निसर्गप्रेम बऱ्याचदा मी अनुभवलं आहे. फुलांच्या, झाडांच्या सान्निध्यात रमताना त्यांच्याकडून सुंदर काव्य प्रस्तुत होते, बहरते. त्या म्हणतात, “या फुलांवर येऊन बसती पक्षी
या रंग रंगाची भूमिवरती नक्षी
ही फुलेच रंगपंचमीची साक्षी.”
किती निखालस सुंदरता या निसर्गात भरलीयं. फुलांच्या रंगारी दुनियेची, आसमंत सुगंधित करणाऱ्या जादुई किमयेची कीटकांना देखील भूल पडते. फुलांच्या साम्राज्याची भुरळ कोणाला नाही? रंगीत फुलं देवाला जशी प्रिय असतात तशीच ती आपल्याही पसंतीस उतरतात. मग सण म्हणू नका की उत्सव. ‘फुलांची दुनिया न्यारी, मन घेतसे भरारी.’ नैसर्गिक रंग, गंध फुलांवर अनोखा ताज कायम ठेवताना तिच्या बारीक-सारीक नजाकतीला बहरानंतर बळ येतं. मुबलक साठवून आहे निसर्ग आपल्या ओटीपोटात. तेव्हा केसात माळण्यासाठी, धार्मिक किंवा इतर शास्त्रीय संस्कारांसाठी लागणाऱ्या मोहक फुलांची दुनिया आपल्या आसपास सदैव असल्याने गरज आहे तिला फक्त न्याहाळण्याची. निसर्गाच्या सान्निध्यात रमणं, फिरणं या छंदासह निरीक्षण नावाची शक्ती माझ्या आसपास सतत वावरत असते. कोकण आणि गोव्याच्या भूमीत आढळणारी, कमी पाण्यात जगणारी जास्वंदी फुलं ही तिथल्या मातीला वरदान आहे. क्वचितच एखाद्या घरासमोर तुम्हाला गुलाब, चाफा दिसेल पण घोसाने वाढणारी जास्वंद रानात, घरादारांत, शेतात दिसतील. पावसाळ्याच्या दिवसांत मातीत पेरलेली तिची एक काठी पाळंमुळं रूजवत उगवून वर येते. गणपतीला वाहणारी जास्वंदी पाच किंवा त्यापेक्षा जास्त पाकळ्यांची असू शकते पण गोव्याच्या काही भागात एकावर एक तीन फुलं फुललेली जास्वंदी पाहून, मला आश्चर्याचा धक्का बसला. संपूर्ण झाड अशा पद्धतीने फुललेलं तेव्हा मोहही आवरेनासा झाला. एकाचं झाडावरच्या गुलाबी, पिवळ्या, तांबड्या, केशरी रंगछटा पाहून जास्वंदाप्रती स्नेह दाटून आला आणि मी लिहून गेले. फुलांनी फुलावे निर्मळी हसावे, अर्थ द्यावा जगण्याला. पाषाणाशी निजरूप व्हावे, देव भेटीला पावला. फुलांची चाहूल वसंताची सुरुवात. जास्वंद फुलली, पानगळीच्या मोसमात. जास्वंदीस बहर, तोही वर्षभर, देवाजीची कृपा असे सदैव आमच्यावर.