Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडी'फसक्लास दाभाडे'चे चित्रपटगृहात अर्धशतक

‘फसक्लास दाभाडे’चे चित्रपटगृहात अर्धशतक

मुंबई : हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ महाराष्ट्रातच नाही तर सातासमुद्रापारही प्रेक्षकांचे प्रेम मिळवण्यात यशस्वी झाला. युएई – जीसीसी प्रदेश, युके येथे या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आणि तो त्या भागात सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला. स्पेन मधे तर फसक्लास दाभाडेच्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी सिनेमा रिलीज झाला. काही दिवसांपूर्वीच हा चित्रपट अमेझॉन प्राईमवरही प्रदर्शित झाला आणि पहिल्याच आठवड्यात संपूर्ण भारतात बघितल्या जाणाऱ्या पहिल्या तीन चित्रपटांमधे जाऊन पोहोचला. ओटीटीवर हा चित्रपट उत्तमरित्या चालत असतानाही अनेक प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहण्याला पसंती दर्शवली आणि आता आज हा चित्रपट सिनेमागृहात यशस्वी अर्धशतक साजरे करत आहे.

इरसाल भावंडांची स्टोरी असणाऱ्या या चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. टी-सीरीज, कलर येल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी निर्मित ‘फसक्लास दाभाडे’चे भूषण कुमार, कृष्ण कुमार, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्माते आहेत.

कुटुंबातील नातेसंबंध, सामाजिक संदर्भ, मजेशीर संवाद आणि प्रसंग या सगळ्यामुळे ‘फसक्लास दाभाडे’ हा एक परिपूर्ण कौटुंबिक चित्रपट ठरला आहे.

निर्माते भूषण कुमार म्हणतात, ” दाभाडे कुटुंबियांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. खूप छान वाटले. प्रेक्षकांचे हे प्रेम आम्हाला ऊर्जा देणारे आहे. प्रेक्षकांना मनापासून धन्यवाद. त्यांच्यामुळेच आम्हाला हा आनंदाचा क्षण अनुभवता आला.”

निर्माते आनंद एल राय म्हणतात, ” ‘फसक्लास दाभाडे’ प्रेक्षकांचे प्रेम मिळवण्यात यशस्वी झाला आहे. यासाठी मी प्रेक्षकांचा आभारी आहे. चित्रपटाच्या टीमचेही अभिनंदन. कारण टीमच्या मेहेनतीमुळेच ही कलाकृती प्रेक्षकांना आवडतेय आणि चित्रपटाला इतका प्रचंड प्रतिसाद मिळतोय. दिग्दर्शक हेमंत ढोमेची ही खासियत आहे, त्याला प्रेक्षकांची आवड कळते, त्यामुळेच तर तो असे आपलेसे वाटणारे चित्रपट मराठी सिनेसृष्टीला देतो.”

चित्रपटाच्या यशाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ”खूप आनंद वाटतोय की आपल्या मातीतला ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटगृहात सलग पन्नास दिवस पूर्ण करतोय आणि ओटीटी वर देखील अव्वल ठरतोय. मुळात ही कथा तुमच्या आमच्या घरातली असल्याने ती प्रेक्षकांना विशेष भावतेय. प्रेक्षकांच्या भरभरून प्रतिक्रिया ये आहेत आणि त्यामुळेच असेच नवनवीन विषय प्रेक्षकांपुढे आणण्याची उर्जा देखिल मिळते. झिम्मा, झिम्मा २ नंतर फसक्लास दाभाडे देखील चित्रपटगृहात ५० दिवस पुर्ण करतोय. आजवर मराठी प्रेक्षकांनी आम्हाला जे प्रेम दिलं त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे.”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -