श्रद्धा बेलसरे खारकर – काळोखाच्या गावी, प्रकाशाच्या वाटा
सावळा वर्ण, उंच, किडकिडीत बांधा, जगाकडे उत्सुकतेने बघणारे डोळे, अंगावर रंगीत खादीचा झब्बा आणि सतत धावण्याच्या मोडमध्ये असणारा दगडू लोमटे मला प्रथम भेटला तो अंबाजोगाईच्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहात. ते या समारंभाचे दुसरे तिसरे वर्ष असावे. त्यानंतर आजतागायत म्हणजे तब्बल ३२ वर्षे हा कार्यक्रम नियमितपणे सुरू आहे. त्यात खंड नाही. आधी श्री भगवानराव लोमटेंच्या बरोबर तो काम करत होता. गेल्या २५ वर्षांपासून एकहाती हा एवढा मोठा समारंभ तो सहजतेने पेलतो आहे.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई हे मराठवाड्यातील काहीसे दूरवरचे गाव. तालुक्याचे ठिकाण आहे. इथे रस्ते मार्गाशिवाय कुठलीही वाहतूक व्यवस्था आजही उपलब्ध नाही. रेल्वेने यायचे असेल तर लातूर किंवा परळीला उतरावे लागते. विमानासाठी थेट ४ तासांचा प्रवास करून छ. संभाजीनगर गाठावे लागते. पण परवीन सुलताना, राजन-साजन मिश्रा, सी. आर. व्यास, आरती अंकलीकर, शौनक अभिषेकी, ते पंडित अजय पोहनकरपर्यंतचे अनेक मान्यवर इथे हजेरी लावतात. किंबहुना इथे येण्यास उत्सुक असतात.
साहित्य क्षेत्रातील मंगेश पाडगावकर, गंगाधर गाडगीळ, ना. धों. महानोर, अरुण टिकेकर, साधनाताई आमटे, प्रकाश व मंदा आमटे, फ्रान्सिस दिब्रिटो, तुषार गांधी. आर. के. लक्ष्मण, सतीश आळेकर यांसह अनेक विचारवंत, लेखक, पत्रकार इथे आले आहेत. त्यांना ऐकण्यासाठी पूर्ण मराठवाड्यातून रसिक गर्दी करतात.
दरवर्षी तीन दिवसांचा मोठा सोहळा असतो. मराठवाड्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांना पुरस्कार, कविसंमेलन, कृषी क्षेत्रात नव्याने प्रयोग करणाऱ्यांचे सत्कार आणि कृषी प्रदर्शन असते. याला लागूनच मोठे पुस्तक प्रदर्शन भरवले जाते. तिसऱ्या दिवशी मान्यवर गायकांच्या मैफलीने या शानदार समारोहाची सांगता होते. इथे उपस्थित असलेल्या कलाकारांची नावे एकली तरी डोळे विस्फारून जातात. दरवर्षी दि. २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान हा कार्यक्रम होतो. साहित्य, संगीत, ललितकला, शेती, उद्योग, ग्रंथ, फोटो, चित्रकला, हस्तकला प्रदर्शन भरवले जाते. अनेक दिग्गज कलाकार आमंत्रित केले जातात. त्यामुळे अंबाजोगाईच्या रसिकांना मेजवानी मिळते. एखाद्या तालुक्याच्या गावी सतत ३२ वर्षे नेटाने असा कार्यक्रम करणे हाच मोठा विक्रम आहे.
दगडू तसा कलंदर माणूस आहे. पाचवी-सहावीत शिक्षण सुटले. चार भिंतीच्या शाळेत कधी मन रमलेच नाही. मग बाबा आमटेंच्या ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झाला आणि पूर्ण भारत सायकलवर प्रवास करून बघितला. तब्बल ६३०० किलोमीटरचा प्रवास सायकलने केला. त्यावेळी खुद्द बाबा आमटे यांच्याबरोबर राहण्याचे भाग्य मिळाल्याने तो विचाराने समृद्ध झाला. त्याने असाच प्रवास ‘नॉर्थ-इस्ट मैत्री संघा’तर्फे केला. अनेक मित्र जोडले. आजही तो बाबा आमटे यांच्या ‘आनंदवन’शी जोडला गेलेला आहे. तिथल्या अनेक उपक्रमांत त्याचा सहभाग असतो.
दगडूचा अनेक संस्थांशी संबध आहे. तो ‘मराठवाडा साहित्य परिषदे’चे काम करतो. मुंबईच्या ‘यशवंतराव प्रतिष्ठान’चे काम बघतो. त्याच्याबरोबर डॉक्टर एस. एन. सुब्बाराव यांच्या ‘गांधी पीस फाऊंडेशन’च्या शिबिरात सहभागी असतो. अहिल्यानगरला कुलकर्णी दाम्पत्याची स्नेहग्राम नावाची संस्था आहे. इथे अपंग, अनाथ, वृद्ध लोक राहतात. त्याचप्रमाणे एड्सग्रस्त लोकांनाही इथे आश्रय दिला जातो. या विकाराने बाधित रोग्यांबरोबर राहिल्यास सामान्य माणसालाही एड्स होतो असा गैरसमज एकेकाळी पसरला होता. हा गैरसमज दूर करण्यासाठी दगडू चक्क काही महिने मुद्दाम या लोकांत राहिला.
अंबाजोगाई सारख्या दूरवरच्या गावात राहूनही त्याचा जनसंपर्क फार दांडगा आहे. प्रत्येक जिल्ह्यात नव्याने कोण लिहितो आहे याच्यावर त्याचे बारकाईने लक्ष असते. दरवर्षी नव्या नव्या कवी लेखकांना तो बोलावतो आणि व्यासपीठ उपलब्ध करून देतो. कितीतरी कवींना प्रसिद्धीचा प्रकाश त्यानेच दाखविला आहे.
त्याला शास्त्रीय संगीताची आवड आहे. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत कुठेही मैफल ऐकायला जाण्याची त्याची तयारी असते.
एक गमतीची गोष्ट म्हणजे त्याला खादीचे रंगीबेरंगी कुडते घालायला आवडतात. अंबाजोगाईत हे कपडे कुठून मिळणार? मग त्यांनी विविध प्रांतातील खादी उत्पादकांशी संपर्क साधून एक खादीच्या कपड्याचे दुकानच सुरू केले! दरमहा एक तरी साहित्यिक कार्यक्रम झाला पाहिजे हा त्याचा कटाक्ष आहे. त्यामुळे नव्याने लिहिणाऱ्या आणि वाचणाऱ्यांची एक भक्कम फळी तयार झाली. रसिक वर्ग तयार झाला आहे. कलावंतांना भरभरून दाद मिळते. इतका अफाट जनसंपर्क असून आणि थोरा-मोठ्यांकडे जाणे-येणे असून त्याच्या वागणुकीत जराही गर्व जाणवत नाही. एकदम साधे सरळ वागणे आणि बोलणे आहे. या सर्व उपक्रमात त्याने स्वत:ला आणि संस्थेला राजकीय नेत्यांपासून दूरच ठेवणे पसंद केले आहे.
जिल्हा साहित्य संमेलने, सांस्कृतिक उपक्रम, मासिक संगीत मैफल, पुस्तक परिचय या उपक्रमात तो सहभागी असतोच पण ते सतत चालू कसे राहतील यासाठीही तो प्रयत्नशील असतो. नुकतेच फेब्रुवारी महिन्यात ‘अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन’ आयोजित केले होते. त्यात ३०० गझलकार सहभागी झाले होते. या दोन दिवसांच्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील अनेकांनी हजेरी लावली.
दगडू लोमटे हा मूळचा पत्रकार आहे. त्याची काही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. नेपाळमध्ये झालेल्या ‘शब्द विश्व साहित्य संमेलना’चा तो अध्यक्ष होता.
गेल्या अनेक दिवसांत बीड जिल्ह्याचे नाव विविध कारणाने गाजत आहे. ‘बीडचा बिहार झाला आहे’ असे म्हटले जाते. अशावेळी दगडू लोमटे यासारखे चार-सहा कार्यकर्ते जरी नव्याने पुढे आले तर चित्र बदलायला वेळ लागणार नाही.