प्रतिभारंग – प्रा. प्रतिभा सराफ
‘बिनधास्त’ या शब्दाची मला लहानपणापासून धास्ती वाटत आली आहे. सरकारी नोकरीनिमित्त बाबा कायम बाहेरगावी राहायचे आणि आई म्युनिसिपल शाळेमध्ये शिक्षिका असल्यामुळे आम्हाला मुंबईत राहणे भाग होते. त्याचा फायदा असा झाला की, आम्हा बहिणींचे शिक्षण एकाच शाळेत मुंबईतच पूर्ण होऊ शकले. आम्हाला भाऊ नव्हता. त्यामुळे आमच्या वयाच्या मुलांचे आमच्या घरात येणे नव्हते. त्या काळात शाळेमध्ये मुले, मुलींशी बोलायची नाहीत. त्यांच्या बसायच्या रांगासुद्धा वेगळ्या होत्या. त्यामुळे मस्ती करणे, भांडाभांडी करणे, शिव्या देणे हे जे काही बिनधास्तपणाचे प्रकार होते ते काही आम्ही आत्मसात करू शकलो नाही. बाबा पाहुण्यासारखे घरी यायचे. मामाकडे, काकाकडे गेल्यावर ते शेतात आणि कामात असायचे त्यामुळे फार पुरुषांशी बोलणे व्हायचे नाही. पुरुषांबद्दल एक अनामिक भीती कायम मनात होती आणि कदाचित आमच्या घरात पुरुष नसल्यामुळे आई आम्हाला समज द्यायची की, मुलांना खेळायला घरात घ्यायचे नाही वगैरे. त्यामुळे आमच्या घरामध्ये फक्त मुलीच खेळायला यायच्या.
एकदा बाबा ज्या गावात नोकरीच्या निमित्ताने राहत होते, त्या गावात बाबांच्या ड्रायव्हरकडून आम्ही बहिणी सायकल शिकलो. म्हणजे ‘खेळायला जातो’ सांगून आम्ही बहिणी बाहेर पडायचो. बाबा ऑफिसच्या कामामध्ये असल्यामुळे ड्रायव्हर निवांत ऑफिसबाहेर बसलेला असायचा. त्याची जेन्ट्स सायकल त्याने आम्हा बहिणींना शिकवली. एकदा बाबांनी हे पाहिले आणि ते आईला ओरडले मग आई आम्हाला ओरडली. ‘काय सायकल शिकायची गरज आहे? कशाला हवा असला बिनधास्तपणा? तुमच्या का ओळखीचा आहे तो ड्रायव्हर? भाड्याने लेडीज सायकल आणून शिकायचे होते ना, मैत्रिणींकडून’ वगैरे. पण त्याआधी आम्ही दोघी उत्तम सायकल शिकलो होतो. आजही मला तो ड्रायव्हर आठवतो. आईचा आरडाओरडाही आठवतो.
एकदा मला केस कापावेसे वाटले. वर्गातल्या बऱ्याच मुलींचे बॉबकट होते. माझे केस गुडघ्यापर्यंत लांब होते. आई म्हणाली, “ हे बघ केसाला कात्री लावायची नाही जेव्हा लग्न होऊन नवऱ्याकडे जाशील तेव्हा बिनधास्तपणे काप केस.”
सासरी आल्यावर सासू माझ्या केसांच्या प्रेमात पडली आणि बिनधास्तपणे केस कापायची परवानगी तिनेही दिली नाही. आजपर्यंत शेपटाच घेऊन फिरते आहे. जे होते ते चांगल्यासाठीच, म्हणते आणि सोडून देते. असो.
दहावीची परीक्षा झाली आणि आम्ही सर्व मैत्रिणी ‘खूबसुरत’ हा सिनेमा बघायला गेलो. त्यात ‘रेखा’ कसली बिनधास्त दाखवली आहे. बाकी काही आठवत नाही पण रेखाचा बिनधास्तपणा नेहमी आठवत राहतो.
‘असं केलं तर तसं होईल… तसं केलं तर कसं होईल?’ अशा काहीशा भीतीने आयुष्यात कोणताच निर्णय बिनधास्तपणे घेता आला नाही. सगळे कायम तोलूनमापून, जरुरीपेक्षा खूप जास्त विचार करून करत राहिले.
हो, लिहिता लिहिता एक प्रसंग आठवला. शाळेत असताना ‘रायगडा किल्ला’ ही सहल आयोजित केली होती. केवळ ताई होती म्हणून आईने मला त्या सहलीसाठी पाठवले. सर्व विद्यार्थ्यांना एका ठिकाणी थांबायला सांगून सर, काही पाहणी करण्यासाठी पुढे गेले. आजूबाजूला कुंपण नसलेल्या निमुळत्या वाटेवरून मी सरांच्या मागे मागे चालू लागले. सर वेगात पुढे जात होते मीही त्याच वेगात पुढे जात होते. इथे ताईने आरडाओरड करायला सुरुवात केली कारण आदल्या दिवशी टकमक टोकाविषयी आम्हाला माहिती दिली गेली होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला त्या भागात घेऊन गेले होते. सर टेहळणी करत पुढे जात होते, भन्नाट वारा सुटला होता त्याचा मोठा आवाज होता. त्यामुळे सरांचे माझ्याकडे किंवा ताईच्या आरड्याओरड्याकडे लक्ष नव्हते. ते जेव्हा टोकाशी पोहोचले तेव्हा मीही पोहोचले आणि मग त्यांनी मला खूप सुनावले त्यापेक्षा जास्त ताईने हा प्रसंग रंगवून आईला सांगितला आणि मग आईने तर तोंडच रंगवले.
त्यामुळे थोडासाही बिनधास्तपणा पुढे कधी करता आला नाही. आजही ‘बिनधास्त’ या शब्दाची धास्ती वाटते आणि बिनधास्तपणे वागणाऱ्यांचे खूप खूप कौतुक वाटते!