अन्न हे पूर्ण ब्रम्ह

ओंजळ - पल्लवी अष्टेकर


आधुनिक काळात सर्वांचे जीवन हे पळापळीचे झाले आहे. माणसाचे रहाणीमान सुधारते आहे. त्याबरोबर काळानुसार होणारे बदल अपरिहार्य आहेत. लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलत आहेत.


कुंदा काॅलेजात शिकणारी मुलगी. तब्येतीनं काहीशी जाड. पण त्यामुळे तिच्या वर्गमैित्रणी कधी-कधी तिला चिडवायच्या; परंतु कुंदाने ही बाब खूप गांभीर्याने घेतली. तिचे दोन्ही वेळेचे जेवण, नाश्ता यावर परिणाम होऊ लागला. तिच्या पालकांच्या ही गोष्ट लक्षात आली. तसेच कुंदा हल्ली त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलत नाही असे त्यांना वाटू लागले. तिच्या कमी आहार घेण्यामुळे तेही अस्वस्थ झाले. शेवटी त्यांच्या पाहुण्यातील कुणीतरी सुचविले की, कुंदासाठी आहारतज्ज्ञांची मदत घ्या.


सुरुवातीला कुंदाने यास नकार दिला. पण तिच्या पालकांनी तिला समजावले व ते दोघे कुंदाला आहारतज्ज्ञांकडे घेऊन गेले. आहारतज्ज्ञांनी तिच्याशी बोलून खाण्यापिण्याच्या गोष्टींचा तक्ता बनवून दिला व तो तंतोतंत पाळण्याचा सल्ला दिला. आता कुंदा त्या तक्त्यानुसार आपले खाणे-पिणे सांभाळू लागली. आता तिची तब्येत जाड व कृश यांच्यातील समन्वय साधू लागली. तिचा आत्मविश्वास तिला परत मिळाला. इथे आपण निव्वळ खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल बोलत नाही आहोत, तर मानसिक आजाराबाबत बोलतो आहोत, जे जीवघेणे होऊ शकतात. ज्यांना अनियमित खाण्याच्या सवयी किंवा वजन व आकार याबद्दल गरजेपेक्षा जास्त काळजी असते यावरून हे रुग्ण ओळखले जातात. या व्यक्ती गरजेपेक्षा जास्त अन्न खातात किंवा इतके कमी खातात की त्यांच्या जीवाला धोका पोहोचतो. खाण्यापिण्याच्या अनियमित सवयींमुळे रुग्णाचे हृदय, पचनसंस्था, हाडे व इतर शारीरिक अवयवांवर परिणाम होऊ शकतो. खानपानाशी संबंधित दोष हा आयुष्यात कधीही होऊ शकतो; परंतु बहुतेक वेळा तरुण-तरुणींमध्ये याचे प्रमाण जास्त असते.



खाण्याच्या विकाराची लक्षणे -



  • वजन कमी होणे, वजन वाढणे किंवा जलद वजन वाढणे. सामान्यत: आहारामुळे, कधीकधी आजारपणामुळे किंवा तणावपूर्ण परिस्थितीमुळे ही समस्या उद्भवू शकते.

  • समाजापासून दूर राहणे.

  • बेशुद्धी, थकवा वा चक्कर येणे.

  • त्वरित मूड बदलणे व चिडचिड

  • चिंता आणि नैराश्य

  • तर्कशुद्धपणे विचार करण्यात किंवा एकाग्रतेत ध्यान करण्यात अडचण येते.

  • उशिरा व जास्त आहार घेणे.


खाण्याचे विकार खालीलप्रकारे आहेत -



  • एनोरेक्सिया नर्वोसा : या समस्येचा रुग्ण खाण्यापासून दूर पळतो. त्याला वजन कमी करण्याचे वेड लागलेले असते. वजन थोडे जरी वाढले तरी तो अस्वस्थ होऊ लागतो. कधी-कधी स्थिती इतकी बिघडते की रुग्णाचा जीव धोक्यात येतो.

  • बुलेमिया नर्वोसा: यामध्ये रुग्ण भरपूर वेळा अन्न लपून-छपून व जबरदस्तीने खातो. खाल्लेले अन्न नंतर पचविण्यासाठी गरजेपेक्षा जास्त व्यायाम करणे, खाल्ल्यावर उलट्या होणे किंवा काटेकोर आहाराचे पालन करून ते संतुलित करण्याचा प्रयत्न करतो. जास्त खाणाऱ्या रुग्णांना त्यांच्या शरीरयष्टीबद्दल किंवा वजनाबद्दल अनेकदा लाज वाटते. पण अन्न पाहताच अशा व्यक्तीचा ताबा सुटतो.

  • बिंज इटिंग डिसआर्डर : या विकारात रुग्ण थोड्या-थोड्या वेळात भरपूर जेवतो. अनेकवेळा भूक न लागल्यानंतरही हा रुग्ण इतका आहार घेतो की त्याला शारीरिक त्रास होऊ लागतो. या विकारामध्ये रुग्णांमध्ये अनेकदा असंतोष, अपराधीपणा, नैराश्य व आत्मद्वेष अशी समस्या असते. जीवनातील प्रत्येक अडचणीचे समाधान तो फक्त अन्नात शोधण्याचा प्रयत्न करतो. तज्ज्ञांच्या मते खाण्यापिण्याच्या विकृती अनेक घटकांमुळे होतात. जसे की, सामाजिक, मानसिक व जैविक घटक.


१. सामाजिक घटक : काही वेळा नृत्य, जिम्नॅस्टिक, माॅडेलिंग यांच्याप्रमाणेच आपणही वजन कमी किंवा वाढविण्याचा दबाव आणणे. लोकांना त्यांच्या पोषाखाप्रमाणे जज करणे. जीवनात अचानक मोठे बदल होणे जसे की नातेसंबंध तुटणे, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू. तसेच जाहिरातींच्या प्रभावाखाली येऊन आदर्श शरीरयष्टी मिळवण्यासाठी चिंताग्रस्त होणे.


२. जैविक घटक : कधीकधी खाण्याच्या विकाराची समस्या जैविक कारणांमुळे जसे की, पौगंडावस्था व त्या वयात होणाऱ्या बदलांमुळे, अानुवंशिक किंवा कौटुंबिक कारणांमुळे होते.


३. मानसिक घटक : यामध्ये प्रामुख्याने नैराश्य, काळजी, आत्मसन्मानाचा अभाव, शरीराबद्दल नकारात्मक विचार, प्रत्येक गोष्टीत परिपूर्णतेसाठी प्रयत्नशील असणे यांचा समावेश होतो.


खाण्याचे विकार हे खरं तर विविध मनोवैज्ञानिक परिस्थितीचे प्रतिबिंब असतात, ज्यामुळे व्यक्तीला अस्वस्थ खाण्याच्या सवयी लागतात. खाण्याच्या विकाराच्या समस्येवर अनेक उपचार आणि थेरपी उपलब्ध आहेत. प्रत्येक रुग्णाच्या समस्येमध्ये मोठा फरक जाणवू शकतो. त्यासाठी व्यक्ती तज्ज्ञांची मदत घेऊ शकते. कधी ध्यान, कधी योगासने यांच्या माध्यमातून रुग्ण उपचार घेऊ शकतो.


अन्न हे पूर्णब्रह्म आहे. योग्य आहार तुमची जीवनशैली सुधारू शकतो. त्यामुळे घाईघाईत जेवण करणे योग्य नाही. त्याचा पचनावरही परिणाम होऊ शकतो. या आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तीस कुटुंब व मित्रांकडून मानसिक आधाराचीही गरज असते. त्यामुळे कुटुंब व मित्रांनी त्याच्यासोबत राहणे गरजेचे आहे. आधुनिक काळात एकूणच जंक फूड खाण्याचे प्रमाण वाढत आहे. भारतातील सर्वात लोकप्रिय जंक फूडमध्ये समोसे, पकोडे, वडापाव, चिप्स, चाॅकलेटस्, साखरयुक्त पेये आणि इंस्टंट नूडल्स यांचा समावेश होतो. हे पदार्थ सोयीसाठी आवडतात. पण त्यात चरबी, मीठ व साखर जास्त असते. जंक फूड खाण्याचे दुष्परिणाम अनेक आहेत. जंक फूडमध्ये असलेल्या कार्बोहायड्रेटमुळे रक्तातील साखर वाढते. त्यात असलेल्या अतिरिक्त कॅलरीजमुळे वजन वाढते. त्यामध्ये असलेल्या ट्रांस फॅटस्मुळे चांगले कोलेस्टेराॅल कमी होते. तसेच हृदयाचे आरोग्य बिघडू शकते. श्वसनाच्या समस्या निर्माण होतात व दम्याचा धोका वाढतो. जंक-फूडमुळे त्वचेवर, केसांवर व वयावरही गंभीर परिणाम होऊ शकतो. मुलांमध्ये वाढत असलेला जंक फूडचा ट्रेंड हा सर्वत्र चिंतेचा विषय असून याला रोखायचं कसं हा सामाजिक प्रश्नं निर्माण झाला आहेे. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार जंक फूडच्या अति-सेवनाने शरीरातील इन्सुलिनची पातळी गरजेपेक्षा जास्त वाढते आणि व्यक्तीची प्रतिसाद देण्याची शक्ती मंदावते. मुलांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक वाढीवर मोठा परिणाम होतो.


अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सर्वांना परिचित आहे. एका मुलाखतीत ती म्हणाली, “मला घरात व बाहेर बाॅडी शेमिंगला सामोरे जावे लागले.” तिची आई तिला नेहमी वजन कमी करण्यास सांगत असे. तसेच लठ्ठपणामुळे शाळेतील मुले तिला वेगवेगळ्या नावाने चिडवत. तिने केवळ चित्रपटात यायचे होते, म्हणून वजन कमी करण्याचा निर्णय घेतला असे नाही, तर तिला वजन कमी करणे आवश्यक होते. तिने विविध व्यायामाचे पर्याय निवडले. निरोगी आहाराची विशेष काळजी घेतली. उच्च प्रथिने (प्रोटिन्स) व कमी कार्बोहायड्रेट आहार घेण्यास सुरुवात केली. अशा तऱ्हेने तिने आपले वजन योग्य केले.


‘अन्न हे पूर्णब्रह्म’ असे रामदास स्वामींनी म्हटले आहे. या वाक्याचा अर्थ असाही होतो की अन्न सेवन केल्यानंतर त्याचे शारीरिक घटकद्रव्यात व शक्तीत रूपांतर होते. शरीराचे आरोग्य ही खरी संपत्ती आहे. त्यामुळे आरोग्यसंपन्न राहण्याची गरज आहे. तरी, योग्य आहार-विहार व निद्रा यांच्या संतुलनाने सुदृढ आयुष्य जगूया.

Comments
Add Comment

क्रिकेटमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

तंत्रवेध : डॉ. दीपक शिकारपूर आज क्रिकेट सामन्याप्रसंगी तसेच नंतर ॲक्शन रिप्ले आणि हायलाईट्सच्या माध्यमातून

साहित्यातला दीपस्तंभ - वि. स. खांडेकर

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर विष्णू सखाराम खांडेकर हे मराठी साहित्यातील एक अग्रगण्य कादंबरीकार, एक लोकप्रिय

ए मेरे दिल कहीं और चल...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे प्रत्येकाच्या जीवनात असा एखादा क्षण येऊन गेलेलाच असतो की जेव्हा त्यावेळी

वंदे मातरम्’ मातृभूमीचे सन्मान स्तोत्र

विशेष : लता गुठे भारतीय संस्कृतीचा विचार जेव्हा मनात येतो, तेव्हा अनेक गोष्टी मनात फेर धरू लागतात. अतिशय प्राचीन

पारिजातक वृक्ष पृथ्वीवर येण्याची कथा

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे पारिजातकाला स्वर्गातील वृक्ष असेही म्हटले जाते. पारिजात हा एक सुगंधी

घर जावई

क्राइम : अॅड. रिया करंजकर लग्न या संस्काररूपी संस्थेवरून तरुणांचा विश्वास उडत चाललेला आहे. शादी का लड्डू नही खावे