ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेनंतर नगरपालिकेने दुकानांना ठोकले टाळे
शिर्डी : महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या शिर्डी साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी देशभरातून भाविक शिर्डीच्या साईनगरीत येत असतात. तन-मन-धन या भावनेने साईचे आशीर्वाद घेण्यासाठी येणाऱ्या या भाविकांची स्थानिकांकडून लूट केली जाते. साईचरणी अर्पण करण्यासाठी विक्री होणाऱ्या वस्तू आणि सामानांचे भाव वाढवून भक्तांची लूट करण्यात येते. आता, याबाबत शिर्डीतील नगरपालिकेने कारवाईला सुरुवात केली असून तीन दुकानांना टाळे ठोकण्यात आले आहे. साईभक्तांना मूळ किमतीच्या अधिक किमतीत साहित्य विकणाऱ्या तीन दुकानांवर कारवाई करत नगर परिषदेने या दुकानांना टाळे ठोकल्याने येथील व्यापाऱ्यांना चांगलाच जरब बसला आहे.
साईभक्तांची होणारी फसवणूक आणि लूट लक्षात घेऊन शिर्डीतील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर नगरपालिकेने कारवाई केली आहे. विशेष म्हणजे या लुटीसंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केला जाणार आहे. शिर्डीत साई दर्शनासाठी लाखो साईभक्त येत असतात आणि साई मंदिरात दर्शनासाठी जातांना हार-प्रसादाच्या दुकानातून हार, फुले, प्रसाद खरेदी करतात. मात्र, भक्तांच्या श्रद्धेचा बाजार मांडून, भक्तांच्या भावनेचा गैरफायदा घेत साई मंदिर परिसरातील हार, फुले आणि प्रसाद व्यावसायिकांकडून भाविकांची लूट केली जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. विशेष म्हणजे भाविकांकडून अवाच्या सव्वा दराने विक्री करणाऱ्या तीन दुकानांना नगरपालिकेने सील ठोकले असून पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हाही दाखल केला जाणार असल्याची माहिती आहे.