पुणे : गावी जाण्यासाठी स्वारगेट आगारात बसची वाट पाहणाऱ्या एका २६ वर्षीय मुलीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली. अत्याचाराच्या घटनेनंतर महामंडळ प्रशासनाला जाग आल्याचे बघायला मिळत आहे. स्वारगेट डेपोमधील जुन्या, मुदत संपलेल्या आणि नादुरुस्त ७२ बसेस भंगारमध्ये विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये शिवशाही आणि शिवनेरी बसचा समावेश आहे.
२१ मार्चला ७२ निकामी बसचा लिलाव होणार आहे. जवळपास वर्षभरापासून या शिवशाही आणि शिवनेरी बस पडून होत्या. या भंगार बसमुळे जागाही व्यापली होती आणि बसमधील साहित्याची चोरी होत होती. अत्याचाराच्या घटनेनंतर स्वारगेट आगारातील भंगार बस मोठा मुद्दा बनल्या होत्या. या भंगार बसमध्ये अनेक चुकीची कामे होत असल्याची देखील धक्कादायक माहिती ही पुढे आली होती.