Saturday, April 19, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखConsumer Rights Day : जागतिक ग्राहक हक्क दिन

Consumer Rights Day : जागतिक ग्राहक हक्क दिन

शाश्वत जीवनशैलीकडे संक्रमण

मंगला गाडगीळ

मार्च नाही उजाडला तर फारच गरम व्हायला लागले आहे. पुढे उन्हाळ्यात काय होईल? लोक आतापासूनच कुरकुरायला लागले आहेत. हे तर खरेच आहे की गेल्या शतकातले हे दशक आतापर्यंतचे सर्वात उष्ण आहे. जगभरातच उष्ण हवामान हा नियम बनत आहे. परिणामी उपजीविका आणि जीवन अधिकाधिक खडतर होत आहेत. त्याच वेळी प्रदूषण मानवी आरोग्यासाठी वाढता धोका निर्माण करत आहे आणि जैवविविधतेचे नुकसान करत आहे. यावरून हे स्पष्ट होत आहे की या संकटांचा परिणाम केवळ पर्यावरणीयच नाही तर आर्थिक आणि सामाजिक देखील आहे. कंझ्युमर्स इंटरनॅशनलने याची गंभीर दखल घेत संपूर्ण जगाचे लक्ष या मुद्द्याकडे वेधण्याचा प्रयत्न केला आहे. यंदाच्या वर्षी १५ मार्चच्या जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त ‘शाश्वत जीवनशैलीकडे योग्य प्रकारे संक्रमण’ ही थीम निवडली आहे. यासाठी संघटना १० ते १४ मार्च दरम्यान एक शिखर परिषद आयोजित करत आहे. या परिषदेत अन्न, आहार, आरोग्य, प्लास्टिक, ऊर्जा, लिंग आणि ग्राहकांसाठी माहिती यांसारख्या प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाईल. शाश्वत जीवन जगणे सर्वांसाठी सोपे कसे होईल? कोणती धोरणे आणि नवीन कल्पना खरा बदल घडवून आणतील? सध्या कोण या मार्गाचे नेतृत्व करत आहे? त्यांच्याकडून काय शिकता येईल? अशा प्रकारच्या प्रश्नांची व्यावहारिक उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला जाईल. ही उत्तरे वापरून २०५० पर्यंत हरितगृह वायू उत्सर्जन ४०-७०%ने कमी करण्याचा प्रयत्न राहील. आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी तातडीने कारवाई न केल्यास ग्राहकांसमोरील अनेक गंभीर आव्हाने लक्षणीयरीत्या वाढतील हे स्पष्ट दिसत आहे. परिस्थिती बिघडण्याचा वेग फार मोठा आहे. जीवाश्म इंधनांवर आपण इतके अवलंबून आहोत की त्यामुळे अन्नधान्याच्या आणि ऊर्जेच्या किमती वाढत चालल्या आहेत. वायू, रसायन आणि प्लास्टिक प्रदूषणामुळे होणारे पर्यावरणीय प्रदूषण दरवर्षी किमान ९ दशलक्ष अकाली मृत्यूंचे कारण बनत आहे. याकडे आपण हतबलतेने पाहत आहोत.

गेल्या २० वर्षांत जागतिक स्तरावर प्रदूषणाच्या आधुनिक स्वरूप म्हणजेच सभोवतालच्या कणयुक्त पदार्थांचे वायू प्रदूषण, सभोवतालचे ओझोन प्रदूषण, शिशाचा संपर्क, व्यावसायिक कार्सिनोजेन्स, व्यावसायिक कणयुक्त पदार्थ, वायू, धूर आणि पर्यावरणीय रासायनिक प्रदूषण आदींमुळे मृत्यूंमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. प्रदूषणाशी संबंधित ९०% पेक्षा जास्त मृत्यू गरीब देशांमध्ये होतात. गेल्या दोन दशकांमध्ये प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ६६% वाढ झाली आहे. औद्योगिकीकरण, अनियंत्रित शहरीकरण, लोकसंख्या वाढ, जीवाश्म इंधनाचे ज्वलन आणि पुरेशा राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय रसायन, संबंधित धोरणाचा अभाव ही त्याची प्रमुख कारण आहेत. या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. जागतिक स्तरावर दरवर्षी ६५ लाखांहून अधिक मृत्यू वायू प्रदूषणामुळे होतात, तर १८ लाख मृत्यूंसाठी शिसे आणि इतर रसायने जबाबदार आहेत. प्रदूषण, हवामान बदल आणि जैवविविधतेचे नुकसान हे गुंतागुंतीचे त्रिकूट हे आजच्या काळातील प्रमुख जागतिक पर्यावरणीय संकट आहे. रक्तातील शिशाचे प्रमाण वाढल्यास मेंदूचे गंभीर नुकसान करते. बुद्ध्यांक कमी झाल्याने शालेय अपयश आणि वर्तणुकीशी संबंधित विकार वाढतात. परिणामी आर्थिक उत्पादकतेत घट आणि जागतिक आर्थिक नुकसान ओढवले जाते. हा परिणाम आफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर दिसतो. असेच प्रदूषण बांगलादेशात पिकणाऱ्या हळदीमध्ये आढळून आले आहे.

रासायनिक प्रदूषणाचे तीन चिंताजनक परिणाम म्हणजे विकासात्मक न्यूरोटॉक्सिसिटी, पुनरुत्पादक विषारीपणा आणि इम्युनो टॉक्सिसिटी. शिसे, पारा, क्लोरीन, आर्सेनिक असे जड धातू तसेच ऑर्गेनोफॉस्फेट कीटकनाशके, सेंद्रिय सॉल्व्हेंट्ससह २०० हून अधिक रसायने मानवांसाठी न्यूरोटॉक्सिक आहेत. यापैकी अनेक रसायने वातावरणात मोठ्या प्रमाणात आढळतात. बालकांवर यांचा परिणाम जास्त होतो. मोठ्या माणसांमध्ये कमी डोसमध्ये देखील विशिष्ट उत्पादित रसायनांच्या संपर्कात आल्याने प्रजनन क्षमता आणि गर्भधारणेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. याशिवाय स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग आणि टेस्टीक्युलर कर्करोग यांचा धोकाही वाढतो. काही प्रदूषक रोगप्रतिकारक शक्ती कमी करतात असे आढळून आले आहे. बहुतेक प्रदूषण मूळ उत्पत्ती ठिकाणाजवळ एकवटलेले राहते, तरी वारा, पाणी, अन्नसाखळी आणि ग्राहक उत्पादनांद्वारे दूरवर पसरते. उदा. पूर्व आशियातून उत्तर अमेरिकेत, उत्तर अमेरिकेतून युरोपमध्ये आणि युरोपमधून आर्क्टिक आणि मध्य आशियामध्ये वायू प्रदूषण पसरते. चीनमधील कारखान्यांतून तयार होणारे प्रदूषण जपान, दक्षिण कोरिया आणि तैवान सारख्या जवळच्या ठिकाणी तसेच अमेरिकेसारख्या दूरच्या ठिकाणी पसरलेले दिसते. हे सर्व थांबवणे अत्यावश्यक झाले आहे. कठीण असले तरी शाश्वत जीवनशैलीकडे संक्रमण झालेच पाहिजे.

याकरिता ग्राहकांवर वैयक्तिक जबाबदारी टाकण्यापेक्षा शाश्वत आणि निरोगी पर्याय सर्वांसाठी उपलब्ध, सुलभ आणि परवडणारे असावेत. यासाठीच कंझ्युमर्स इंटरनॅशनलने ‘शाश्वत जीवनशैलीकडे योग्य प्रकारे संक्रमण’ ही थीम निवडली आहे. हा भला विचार जागतिक पातळीवर आज चर्चिला जातो असला तरी मुंबई ग्राहक पंचायत स्थापनेपासून म्हणजेच १९७५ सालापासून, गेली ५० वर्षे हेच सांगत आली आहे. केवळ बोलघेवडेपणा न करता वितरणाच्या माध्यमातून प्रत्यक्षात हेच धोरण राबवत आली आहे. या संघटनेचे काम फुलपाखरासारखे आहे. फुलपाखरू फुलांवर बसते, त्यातील मध शोषून घेते आणि फुलाला हानी न पोहोचवता उडून जाते. आपण सर्वांनी आपल्या रोजच्या जगण्यात हेच तत्त्व वापरले पाहिजे. पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही असे आपले वर्तन असावे हे आपले मुख्य कर्तव्य आहे. कंझ्युमर्स इंटरनॅशनलच्या कामात आपणही सहभागी होऊ या. आपला खारीचा वाटा उचलू या.
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -