आपण गाव सोडून शहरामध्ये राहत असलो तरी उन्हाळ्यात आपल्याला आपल्या गावातील जुन्या आठवणी जाग्या होतात आणि असे वाटते केव्हा एकदा मुलांची परीक्षा संपते आणि गावी जातो. आपले बालपण गावाकडच्या निसर्गरम्य वातावरणात गेले असले तरी शेवटी नोकरीनिमित्ताने गाव सोडून इतर ठिकाणी जरी गेलो तरी गावची मजा काही वेगळीच असते. त्यामुळे वर्षातून एकदा तरी न चुकता प्रत्येक जण आपल्या गावी जाऊन येत असतात. त्याला एकच कारण असते ते म्हणजे गावाकडची जमा. बरेचजण गावी गेल्यावर घराच्या पाया पडल्यावर शाळेच्या पायऱ्यांवर जाऊन नतमस्तक होतात. नंतर बालपणातले सवंगडी यांच्या भेटीगाठी घेतात. त्यानंतर वर्षभराने एकत्र आल्याने बालपणातील आठवणी रंगू लागतात. गावाकडची मजा काही वेगळीच असते. ती सांगून समजणार नाही, ती लिहून समजणार नाही तर त्यासाठी गावाच्या बाहेर चार दिवस राहाल त्यावेळी समजेल गड्या आपला गाव बरा. पोटापाण्याचा प्रश्न…! नाय तर गाव सोडलं नसतं. अशी परिस्थिती आता प्रत्येक गावात झाली आहे. त्यामुळे काही गाव ओस पडत चालले आहेत. नव नवीन घरे सुद्धा बंद असताना दिसत आहेत. याचा परिणाम जिल्ह्याची लोकसंख्या घटत असल्याची जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचनाचा अभ्यास केल्यावर लक्षात येते. याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली पाहिजे. तेव्हा परदेशात जाऊन संशोधन करण्यापेक्षा जिल्ह्यामध्ये संशोधन करून रोजगार कसा निर्माण करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
गाव सोडून शहरात रोजीरोटीसाठी आलेला प्रत्येकजण आता उंच इमारतीमध्ये राहत असला तरी त्याला घरासमोरील अंगण कसे असते हे मुलांना दाखविण्यासाठी आपल्या मूळ गावी जावेच लागते. वर्षभर इमारतीतील चार बाय चारच्या खोलीत त्यात काही ठिकाणी कृत्रिम गार हवा असल्याने आपण कोंडवाड्यात राहत आहोत असे काही जण म्हणत असतात. त्यासाठी मोकळा श्वास घेण्यासाठी कधी एकदा मुलांची परीक्षा संपते आणि गावी जातो असे प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी आता लालपरीसाठी दोन/तीन दिवस तिकिटांसाठी रांग लावण्याची गरज नाही. ऑनलाईन तिकीट उपलब्ध असतात. आजही लालपरीने प्रवास केल्यास एक वेगळीच मजा असते. रेल्वे, विमान, खासगी बस, भाड्याने गाडी करून गावी जातात. हल्ली तर बऱ्याच चाकरमान्यांची स्वत:ची गाडी घेतल्याने ते आपल्या स्वत:च्या गाडीने गावी जातात. त्यात घरासमोरील अंगण कसे असते याची मुलांना पहाण्याची लागलेली उत्सुकता त्याची वचनपूर्ती करण्यासाठी लागलेली त्यांची ओढ असते. त्यात गावातील पाषाणी घर आता मात्र इतिहासजमा होणार हे मात्र निश्चित. त्यामुळे यापुढे असे घर पाहायचे असेल तर आपल्याला एखाद्या पुस्तकातील चित्र पाहून समाधान मानावे लागेल. त्या घराची काही वेगळीच ओळख असायची. घराला मध्ये चौकोन, त्याला वळय असे म्हणतात, चार बाजूला पडवी. एका पडवीत जेवण, एका पडवीत कोंबडी-कुत्री, एका पडवीत आंगोळीसाठी न्हाणी, एका पडवीत उठा बसाक. घराच्या चारी बाजूने आंब्या-फणसाची झाडे त्यामुळे घरात फॅनची आवश्यकता नाही आणि चुलीवरचे जेवण तेव्हा गावी नवीन आलेल्या मुला-बाळांना वेगळा आनंद वाटत असतो. त्यात उन्हाळ्याचे दिवस असल्याने. गावाकडील मेवा पाहून मुले अधिक उत्साही दिसतात. त्यामध्ये पिकलेल्या फणसाचे गरे, फणसाची केलेली जनता भाजी, काजूच्या बोंडाचा रस, काकूने चुलीत भाजून दिलेले काजू, रायवळ आंबे, हापूस आंबे, जांभूळ यांच्यावर मारलेली ताव याची मजा काही वेगळीच असते.
तसेच रानात काकांबरोबर गेल्यावर करवंदे स्वत: काढून खाताना आनंद काही वेगळाच असतो. संध्याकाळी मुंबईला जाण्यापूर्वी मेरा घालून देणार या अटीवर मेरा फोडून कोपऱ्यात क्रिकेट खेळला जातो. त्याआधी दुपारचे बैल धरणावर पाणी पिण्यासाठी गेल्यावर काकांची नजर चुकवून धरणाच्या पाण्यात डुबकी मारल्यावर त्याची मजा काही वेगळीच असते. इतकेच काय काकीबरोबर बाजाराला जाताना लालपरीतून प्रवास करताना खूप मजा येत असते. बाजारात गाडी थांबल्यावर काकी समोरच्या हाटेलात नेऊन लिंबवाचो सरबत नंतर हाटेल मालकाक सांगतली धकटे दीर ना त्यांची पोरा. परीक्षा झाली ना इली गावाक. काकी जी काय हॉटेल मालकाला सांगते ती एकूण मुले हसायला लागतात. वरती काही सांगता हसलास पोरानू तर नंतर बाजाराक आनुचय नाय. असा गे काकी काय म्हणत. बाजाराचे पिशवे आम्ही घेतव मग तर झाला. तरी पण पिशवे काकीच घेता. इतकेच नव्हे तर लालपरीने घरी आल्यावर आधी घरात जाऊन घागरीतला पाणी तांब्यातून घेऊन पहिला चाकर मान्यांच्या मुलांका देतली इतकी काकी मायाळू असते. स्वत:चे आंबे किंवा फणस जरी नसले तरी शेजाऱ्या पाजाऱ्याकडे जाऊन कधी घेऊन येईल हे सांगता सुद्धा येणार नाही, इतकी गावाकडची माणसे प्रेमळ असतात. सकाळी घावने आणि नारळाचो रस, दुपारी ओल्या काजूचा रसरशीत कालवण, बागेतली केळी, नारळाचा गारगार पाणी, कलिंगड, मध्येच अधून मधून मासे आणि परतीच्या प्रवासाच्या आदल्या दिवशी सागोती वडे यामुळे परतीच्या प्रवासाला निघतात प्रत्येकाचे डोळे पाणावलेले दिसतात. तेव्हा कधी एकदा परीक्षा संपता आणि गावाकडची मजा लुटण्यासाठी गावी जातो असे प्रत्येकाला झाले आहे.
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…