Tuesday, October 21, 2025
Happy Diwali

Rohit Sharma : कसोटी कर्णधाराबाबत प्रश्नचिन्ह कायम

Rohit Sharma : कसोटी कर्णधाराबाबत प्रश्नचिन्ह कायम

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार

नवी दिल्ली : टीम इंडिया जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे, जिथे दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या दौऱ्यावर रोहित शर्मा (Rohit Sharma) संघाचा कर्णधार असेल की नाही याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) उत्तम नेतृत्वाखाली टीम इंडियाने नुकतेच चॅम्पियन ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. आता भारतीय संघ जूनमध्ये पुन्हा मैदानात उतरणार असून तेव्हा टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे.

५ कसोटी सामन्यांची ही मालिका होणार आहे. पण या दौऱ्यावर रोहित शर्मा (Rohit Sharma) टीम इंडियाचा भाग असेल की नाही, आणि जर तो खेळला तर तो कॅप्टन असेल की नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे. हे सर्व प्रश्न उपस्थित केले जात आहेत कारण त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. या दौऱ्यात रोहित (Rohit Sharma) कसोटीतून निवृत्त होऊ शकतो, अशा बातम्याही आल्या होत्या. मात्र, त्यानंतर रोहितने (Rohit Sharma) निवृत्तीचे वृत्त फेटाळून लावले. आता त्याच्या कर्णधारपदाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे.

चॅम्पियन ट्रॉफीच्या जेतेपदानंतर रोहित शर्माच्या कारकिर्दीत मोठे वळण आले आहे. आणखी एका मोठ्या दौऱ्यावर संघाचे नेतृत्व करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि निवड समितीचा पाठिंबा रोहित शर्माला मिळाला आहे. त्यामुळे जून महिन्यातील इंग्लंड दौऱ्यावर रोहित शर्मा हाच टीम इंडियाचा कॅप्टन असण्याची शक्यता आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयामुळे रोहित शर्माची कारकीर्द आणखी लांबू शकते, असा कयास वर्तवला जात आहे. टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ३-१ असा पराभव स्वीकारावा लागला होता. या काळात त्याच्या खराब कामगिरीमुळे रोहितने मालिकेतील शेवटचा सामना न खेळण्याचा निर्णय घेतला होता. रोहित शर्माने विश्रांती घेताच ही मालिका संपताच तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याच्या अफवा चाहत्यांमध्ये पसरू लागल्या. रोहितने कसोटीचा फॉरमॅट सोडावा, असे मत काही दिग्गजांनी व्यक्त केले होते. पण रोहितने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देताना मोठे वक्तव्य केले.

सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रोहित शर्मा म्हणाला, ‘आत्ता धावा निघत नाहीयेत, पण ५ महिन्यांनंतरही त्या येणार नाहीत याची शाश्वती नाही. मी मेहनत करीन. पण हा निर्णय निवृत्तीचा नाही. मी निवृत्त कधी व्हायचे आणि मला काय निर्णय घ्यायचा ते बाहेर लॅपटॉप, पेन आणि कागद घेऊन बसलेले लोक ठरवू शकत नाहीत,’ असे रोहितने सुनावले होते. रोहितने या मालिकेतील ३ सामन्यात ३, ६, १०, २ आणि ९ धावांची इनिंग खेळली होती. म्हणजेच भारतीय कर्णधाराने ५ डावात ६.२० च्या सरासरीने एकूण ३१ धावा केल्या होत्या. त्यानंतर बीसीसीआय इंग्लंड मालिकेत नवीन कर्णधाराची निवड करू शकते, असा दावा त्यानंतर करण्यात येत होता. मात्र सध्या तशी कोणतीही परिस्थिती नसून रोहितच कर्णधारपद शाबूत असल्यातचे चित्र दिसत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >