Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीमुंबईत आरेच्या स्टॉल्समधून अन्य खाद्यपदार्थांचीच विक्री

मुंबईत आरेच्या स्टॉल्समधून अन्य खाद्यपदार्थांचीच विक्री

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईमध्ये पदपथावर अतिक्रमण करून त्या जागा गिळंकृत केल्या जात असल्याने फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली जात असली तरी दुसऱ्या बाजुला केवळ महानंदा आरेच्या दुग्ध पदार्थांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी मुंबईत दिलेल्या स्टॉल्सचे रुपांतर आता खाद्यपदार्थ विक्रीसह अन्य वस्तूंचे स्टॉल्समध्ये होवू लागले आहे. मुंबईत आरे सरीताचे केवळ सातच स्टॉल्स शिल्ल असून उर्वरीत सर्व स्टॉल्सचा वापर अन्य वस्तूंच्या विक्रीसाठी केला जात आहे. मात्र, आरेच्या नियमानुसार या स्टॉल्सचा वापर अन्य कारणांसाठी केला जाणे नियमबाह्य असूनही महापालिकेच्यावतीने कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. त्यामुळे आरे सरीताच्या स्टॉल्सवर महापालिका प्रशासन कधी कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबईत अवजड वाहनांना रविवारी ‘नो एन्ट्री’

मुंबईमध्ये सध्या अनेक रस्त्यांवरील पदपथांवर आरे सरीताचे स्टॉल्स वितरीत करण्यात आले आहेत. आरेचे दूध वितरणासाठी दुग्ध पदार्थाच्या विक्रीसाठीच या स्टॉल्सचे वितरण करण्यात आले. मुंबईत अशाप्रकारे शेकडो स्टॉल्सचे वितरण झालेले असतानाही महापालिकेच्या नोंदीवर केवळ धारावी, दादर माहिम या जी उत्तर विभागात ४ आणि वांद्रे ते सांताक्रुझ पश्चिम या एच पश्चिम विभागांत ३ अशाप्रकारे ७ स्टॉल्स असल्याचे दिसून येत आहे. परंतु अन्य स्टॉल्सचा वापर हा आरेच्या नावाखाली अन्य खाद्यपदार्थ विक्री किंवा अन्य वस्तूंच्या विक्रीसाठी केला जात आहे. परंतु अशाप्रकारे नियमबाह्य असणाऱ्या या स्टॉल्सवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसून एकाच व्यक्तीच्या नावे अशाप्रकारे स्टॉल्स असल्याचे दिसून येत आहे.

वरंधा घाटात एसटी बस कोसळली, १५ प्रवासी जखमी

मागील युती सरकारच्या काळात अर्थात सन २०१४ ते २०१६ या कालावधी एकनाथ खडसे हे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय मंत्री असताना त्यांनी मुंबईतील सर्व आरे सरीताच्या स्टॉल्सची पाहणी करून जिथे आरेचे उत्पादन विकले जात नाही त्या स्टॉल्सवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर मुंबईतील सर्व स्टॉल्सची पाहणी करून याचा अहवाल तयार करण्यात आला. त्यानंतर मुंबईतील सर्वच आरे सरीतच्या स्टॉल्सवर आरे चे दुध आणि अन्य उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली होती.

परंतु मागील काही वर्षांपासून या स्टॉल्सचा कमर्शियल वापर होत असून हे स्टॉल्स आता मिनी हॉटेल स्वरुपात खाद्यपदार्थ विक्रीची ठिकाणे बनली आहेत. महापालिकेच्या जी उत्तर विभागातील टी एच कटारिया मार्गावरील माटुंगा पश्चिम येथील संदेश हॉटेल समोरील आरेचा स्टॉल हा फलाहार अशाप्रकारे खाद्यपदार्थ विक्रीचे ठिकाण बनले आहे. तर येथील भगत गल्लीतील आरेचा स्टॉल्स हा खाके पिके जाना तसेच शेजारच्या स्टॉल्सचा वापर अन्य कारणांसाठी वापरला जात आहे. तर गोखले रोडवरील आरेचा स्टॉल्स हा चहा विक्रीचे ठिकाण बनले आहे. तर त्याशेजारील एका स्टॉल्सवरही अन्य खाद्यपदार्थ विक्री केली जात आहे. मुंबईत अशाप्रकारे आरे सरीताच्या स्टॉल्सचा वापर अन्य कारणांसाठी केला जात असल्याने एक प्रकारे नियमांचे उल्लंघन केले जात असताना महापालिकेच्यावतीने कोणत्याही कारवाई केली जात नाही.

एका बाजुला परवानाधारक स्टॉल्सकडून अतिक्रमण झाल्यास किंवा अनधिकृत वापर होत असेल तर कारवाई करणाऱ्या महापालिकेला आरे सरीताच्या नावाखाली जे खाद्यपदार्थ स्टॉल्स चालतात यावर कारवाई करायची हिंमत होत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाला आता आरे सरीताच्या स्टॉल्सबाबत ठोस धोरण ठरवण्याची वेळ आली असून आरे प्रशासनाकडून या स्टॉल्सबाबत कोणत्याही सूचना केल्या जात नसल्याने महापालिका प्रशासन कारवाई करत नसल्याचे सांगत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यातून अंग काढून घेतले आहे.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -