मुंबई : मुंबईमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईमधील बोरिवली भागात असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भीषण आग लागली आहे. राष्ट्रीय उद्यानाच्या लगतच असणाऱ्या दहिसर परिसरात धुलीवंदनाच्या सणाचा आनंद लुटण्यासाठी काही तळीराम एकत्र जमले होते. यातील एका तळीरामाने ही आग लावल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दारूच्या नशेत त्यांनी जंगलाचा काही भाग पेटवून टाकला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. होळीच्या दिवशी तळीरामांना कसलंच भान नसतं. ते दारुच्या नशेत काय करतील, याचा नेम नसतो. होळीमुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळच्या दहिसर परिसरात गेले होते. होळीनिमित्त काही जणांनी या भागात दारुची पार्टी केली. या आगीत राष्ट्रीय उद्यानाचे अर्धा हेक्टर जंगल जळून खाक झाल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय उद्यानात आगीचे मोठे लोट दिसू लागले. त्यानंतर अनेक जणांनी तिथून पळ काढला. तळीरामांनी लावलेल्या या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या तिथे आल्या. अग्नीशमन दलाच्या जवानांनी आता ही आग आटोक्यात आणली आहे. साधारणपणे दीड तास अग्निशमन दलाचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. याबाबतची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच ते सहा गाड्या आणि राष्ट्रीय उद्यानाच्या सुरक्षारक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नानंतर दीड तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.