Saturday, April 19, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखकेंद्र विरुद्ध द्रमुक! रुपयाच्या चिन्हाशी छेडछाड

केंद्र विरुद्ध द्रमुक! रुपयाच्या चिन्हाशी छेडछाड

जगातील सर्वांधिक मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून जगाच्या पाठीवर आपल्या देशाचा सतत उदोउदो होत असतो. विविधतेतून एकता आणि एकतेतून विविधता हा आपल्या भारताचा परिचय आहे. विविध धर्म, जाती-उपजातींचा मिलाफ असलेला आपला भारत देश आहे. भारतात जातीय, धार्मिक दंगली यापूर्वी झाल्या, भाषिक वाद झाले. सीमावादही झाले. भारतातून वेगळे निघण्यासाठी पाकपुरस्कृत समाजविघातक शक्तींनी पंजाब गेली अनेक वर्षे धुमसत ठेवला. पण या जातीत, धार्मिक दंगली, कलह क्षणिक ठरले आणि ठरावीक काळानंतर सर्व देशवासी गुण्यागोविंदाने राहू लागले. हा आपल्या देशाचा १९४७ पासूनचा इतिहास आहे. विविध जाती-धर्माचे लोक येथे एकत्र वास्तव्य करत असताना, येथे भाषिक वाद असतानाही देशाचे चलन मात्र एकच राहिले आहे. गेल्या काही दिवसांपासून लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेवरून दाक्षिणात्य राज्यांमध्ये वाद सुरू झाला आहे. लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना ही लोकसंख्यानिहाय होत असल्याने नव्याने होत असलेल्या लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये लोकसभा मतदारसंघांची वाढ होणार असून तामिळ, कन्नड या बिगर हिंदी पट्ट्यात लोकसभा मतदारसंघांची संख्या घटणार आहे. यावरूनच तमिळ पट्ट्यात लोकसभा मतदारसंघाची नजीकच्या भविष्यात संख्या घटणार असल्याने राजकीय वाद चिघळण्यास सुरुवात झाली आहे. येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये स्थानिकांना भडकावून एकगठ्ठा मतदान वळविण्याचा हा सर्व प्रकार सुरू आहे.

तामिळनाडू सरकारने २०२५-२६ च्या अर्थसंकल्पासाठी काही प्रचार साहित्य तयार केले आहे. यात त्यांनी भारतीय रुपयाच्या चिन्हाशी छेडछाड करत, ते तमिळ भाषेत केले आहे. स्टॅलिन सरकारच्या या कृत्यामुळे आता देशातील राजकारण तापण्यास सुरुवात झालेली आहे. या संदर्भात एकीकडे हा राष्ट्रीय चिन्हाचा अनादर असल्याचे भाजपाने म्हटले आहे, तर दुसरीकडे हा तमिळ भाषेचा सन्मान असल्याचे द्रमुकने म्हटले आहे. स्टॅलिन सरकारच्या या कृत्यावर देशातील अधिकाधिक राजकीय घटक भडकले असून विविध राज्यांतून संतप्त सूर उमटू लागले आहेत. तामिळनाडू सरकारने रुपयाचे चिन्ह हटवले, त्यांचे हे पाऊल म्हणजे, घातक मानसिकतेचा संकेत आहे. स्टॅलिन सरकारने केलेले हे कृत्य म्हणजे ही एक प्रकारची घातक मानसिकता आहे. तसेच, जागतिक आर्थिक व्यवहारांमध्ये भारताची ओळख म्हणून काम करते. भारत यूपीआय वापरून सीमापार पेमेंटला प्रोत्साहन देत असतानाच, आपण खरोखरच आपल्या स्वतःच्या राष्ट्रीय चलन चिन्हाला कमी लेखले योग्य आहे? असा प्रश्न आता विविध थरातून उपस्थित करण्यात येत आहे. खरे तर, इंडोनेशिया, मालदीव, मॉरिशस, नेपाळ, सेशेल्स आणि श्रीलंकेसह अनेक देश आपले चलन अधिकृतपणे, ‘रुपया’ अथवा या नावाशी मिळत्या-जुळत्या नावाने वापरतात. लोकसभा निवडणुकीत सर्व राज्यातून निवडून आलेले प्रतिनिधी आणि अधिकारी आपल्या राष्ट्राचे सार्वभौमत्व आणि अखंडता राखण्यासाठी संविधानांतर्गत शपथ घेतात. राज्याच्या अर्थसंकल्पीय कागदपत्रांमधून रुपयासारखे राष्ट्रीय चिन्ह काढून टाकणे हे त्या शपथेविरुद्ध आहे. यामुळे राष्ट्रीय एकात्मतेची वचनबद्धता कमकुवत होते. स्टॅलिन सरकारने रुपयाचे चिन्ह हटवले असले तरी या चिन्हाचे डिझाईन द्रमुकचे माजी आमदार एन. धर्मलिंगम यांचे पुत्र डी. उदय कुमार यांनी केले होते. आता हे नाकारत, द्रमुक केवळ एका राष्ट्रीय प्रतीकच नाकारत नाही, तर एका तमिळ तरुणाच्या सर्जनशील योगदानाकडेही पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. ज्या माणसाने हे डिझाईन तयार केले, त्याच माणसाचे राज्यातील सत्ताधारी मतांच्या समीकरणांसाठी प्रतीक नाकारत आहे, हे एक प्रकारचे विडंबनच आहे. तमिळनाडूमध्ये त्रिभाषा सूत्रावरून वाद सुरू असताना, तसेच मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारशी दोन हात करण्याची तयार करणाऱ्या द्रमुक सरकारने केंद्राविरुद्ध नवा प्रतीकात्मक पवित्रा घेत आता रुपयाच्या चिन्हावर वार केला आहे.

यंदाच्या राज्य अर्थसंकल्पात रुपयाच्या राष्ट्रीय चिन्हाऐवजी तमिळ अक्षराचा वापर असलेल्या चिन्हाला स्थान दिले आहे. तमिळनाडूचे अर्थमंत्री थंगम थेन्नारासू शुक्रवारी अर्थसंकल्प सादर करणार असतानाच तमिळनाडूने हे नवे चिन्ह गुरुवारी जारी केले. यात ‘रुबाई’ या तमिळ शब्दाचे पहिले अक्षर ‘रु’ दर्शविले आहे. ते स्थानिक भाषेत भारतीय चलन दर्शवते. त्यावर ‘सर्वांसाठी सर्व काही’ असे लिहिले आहे. अर्थसंकल्पात सरकारचे सर्वसमावेशक मॉडेल असल्याचा द्रमुकचा दावा आहे. तमिळनाडूतील सत्ताधारी द्रमुकच्या एका शिष्टमंडळाने गुरुवारी तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची भेट घेतली. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन २२ मार्च रोजी चेन्नईत मतदारसंघाच्या पुनर्रचनेसंदर्भात बैठक घेत आहेत. रेड्डी यांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले. भाजपाचे पुनर्रचना धोरण हे दक्षिणेतील राज्यांविरोधातील कट आहे, अशी टीका द्रमुककडून करण्यात येत आहे. डॉलर आणि युरोच्या धर्तीवर भारतीय रुपयाचे चिन्ह तयार करण्यात आले होते. या अधिकृत चिन्हाचे डिझाइन तयार करणारे उदयकुमार धर्मलिंगम हे तमिळ आहेत. रुपयाचे चिन्ह तयार करण्यासाठी २०१० मध्ये देशपातळीवर स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत उदयकुमार यांच्या चिन्हाने बाजी मारली होती. त्यानंतर रिझर्व्ह बँकेसह केंद्र सरकारने रुपयाचे हे चिन्ह भारतीय चलनाचा अधिकृत लोगो म्हणून वापरण्यास मान्यता दिली. स्टॅलिन सरकारच्या कृतीचा प्रत्येक भारतीयाने निषेध करणे आवश्यक आहे. आज रुपयाचे डिझाईन बदली केले, उद्या हाच प्रकार अन्य बाबतीत घडू शकतो. माणसापेक्षा, राज्यापेक्षा देश मोठा आहे आणि कायम राहणार, हे प्रत्येकाने सर्वप्रथम आपल्या मनावर बिंबविले पाहिजे. तामिळनाडूने केलेला प्रकार चुकीचा आहे. याला कोठेतरी पायबंद घातलाच पाहिजे. लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना हा वेगळा भाग आहे, त्यास न्यायालयात आक्षेप घेऊन न्यायालयीन लढाई लढणे उचित ठरेल, पण त्यासाठी रुपयाचे डिझाईनच बदलणे कदापि योग्य ठरणार नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -