Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Dhule News : ...अन् मेलेलं बाळ पुन्हा जिवंत झालं! धुळ्यात घडला 'असा' चमत्कार

Dhule News : ...अन् मेलेलं बाळ पुन्हा जिवंत झालं! धुळ्यात घडला 'असा' चमत्कार

धुळे : नंदुरबारमधील (Nandurbar) धडगाव तालुक्यात एक विलक्षण प्रकार घडल्याचे समोर आले आहे. होळीला माहेरी आलेल्या एका महिलेचे  दोन महिन्यांचे बाळ उलट्या आणि अति रडण्याने निपचित पडले होते. बाळ काहीच हालचाल करत नसल्यामुळे  घरच्या लोकांना बाळाचा मृत्यू झाल्याचे वाटल्याने महिलेच्या माहेरी आणि सासरी रडारड सुरू झाली. मात्र अशातच डॉक्टरांच्या रुपाने आलेल्या देवदूताने केलेल्या एका कृतीमुळे बाळ जिवंत झाले. या घटनेमुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला असून हसरे वातावरण निर्माण झाले आहे.



नेमकं प्रकरण काय?


धडगाव तालुक्यातील तेलखेडी येथे राहणाऱ्या मिनाबाई सचिन पावरा ही महिला तिच्या दोन महिन्यांच्या बाळासह होळीसाठी आपल्या माहेरी गेली होती. माहेरी गेल्यावर बाळाची तब्येत बिघडली. उलट्या होऊन बेजार झालेले बाळ दूधही पीत नव्हते आणि बाळ निपचित पडले होते. त्याचबरोबर बाळाचा श्वासोच्छ्रुासही बंद पडला होता. बाळ कुठलीही हालचाल करत नसल्यामुळे परिवाराकडून राडाराडा सुरू झाली आणि अंत्यविधीची ही तयारीला सुरुवात झाली होती. मात्र परिवारातील नातेवाईकांनी नजीकच्या आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच डॉक्टर घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी आपला अनुभव वापरत बाळाच्या पायाला टिचकी मारली आणि बाळ हालचाल करत श्वास घ्यायला लागले.


त्यानंतर बाळाला धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सलाईन लावल्यानंतर बाळ नियमित श्वास घ्यायला लागले. सध्या बाळाची प्रकृती ठणठणीत असून, दोन दिवसांनी त्याला डिस्चार्ज दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टरांच्या रुपाने देवदूतच आयुष्यात आला आणि बाळाला नवं जीवन देऊन गेला अशी भावना गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment