Wednesday, March 26, 2025

अभ्यासाची पाखर…

श्री गुरुगाथा – अरविन्द दोडे

ऐसी शरीराबाहेरलीकडे |
अभ्यासाची पाखर पाडे |
तव आंतु त्राय मोडे |
मनोधर्माची ॥६.२११॥

रीराच्या बाहेर अभ्यासाची छाया पडते आणि आतल्या बाजूस मनाच्या चंचलतेचा जोर नाहीसा होतो. कल्पना नाहीशी होते. तनमन शांत होतं. मनाचं संयमन करून आसनावर बसावं. सविकल्प समाधीत व्यवहारासाठी गुरू लोकांतात राहतो, पण हवा तेव्हा निर्विकल्प समाधीत जातो. सविकल्प समाधीत जग आणि जगदीश दोन्ही दिसतात, तर निर्विकल्प समाधीत जग लय पावतं. दृष्टीसमोर सृष्टी राहत नाही. साऱ्या क्रिया गुरू साक्षीभावानं पाहतो. सहा गुणांचं ऐश्वर्य ज्याच्याजवळ, तो भगवान!

गुरुभक्तियोग हा ‌‘पूर्णयोग’ मानला जातो. प्रणवाच्या पेठेत कृष्णसुखाचं रुपडं दिसतं. तो भक्ताच्या आवडीचा रस गुरुदेव पाजतात. सांसारिक सासुरवासाला जीव घाबरतो. प्रपंचाचा धाक तसा निरंतरच असतो. सुखाच्या अभिलाषेनं भारावलेला राहतो. तेव्हा अचानक एका जागृतीच्या वळणावर भक्त थांबतो. मागे वळून पाहतो. जगण्याचा किती आटापिटा केला, किती दमछाक झाली… श्रीशिल्लक काय? शून्य! कुठं गेली कमाई? हिशेबाची वही (अर्थात खर्चाची बाजू!) भरलेले दिसते. मग आपलेच धीराचे शब्द आपल्याला उपदेश करतात. ‌‘रिकामा मायेचा तराजू’ असं तुकोबाराया म्हणतात, तो प्रत्यक्ष दिसतो!

सर्वसंगाचा वीट आला तरी परित्याग करत नाही. संसारतापावर मात करणं हासुद्धा मोठा पराक्रम वाटतो. शब्दांचासुद्धा शीण येतो. विश्वासाचं अन्‌‍ विसाव्याचं ठिकाण शोधू लागतो. वाटतं, कशाला कुणा घायाळाच्या संगतीत राहून व्याकूळ व्हायचं? मग गुरूशोध सुरू होतो… गुरुगृह असतं. गुरुकुल असतं. गुरुआश्रम असतो आणि गुरुमंदिरही असतं. तिथं काय मिळतं? जीवनाचं महत्त्व कळतं. जगण्याची सात्त्विक शैली कळते. शिकण्याची ही प्रक्रिया पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे असते. जुनी होत नाही. या विद्येची परंपरा वेगवेगळी कशी आहे?

मौखिक : प्राचीन काळात लेखनकला नव्हती, तेव्हा गुरुशब्द ऐकायचे. लक्षात ठेवायचे. पाठांतर करायचे. गुरू-शिष्य परंपरा सुरू झाली ती अशी. व्यावहारिक उपयोग करायचे. चर्चा होत. संवाद होत. सैद्धांतिक शिस्त, ज्ञान वाढत असे. एवढंच नाही, तर चरित्र्यविकास होत असे. गुरू स्वत: ज्ञानी, शुद्ध आचार-विचारांचे असत. प्रेम, करुणा, शील, प्रज्ञा, प्रतिभा, अहिंसा, सेवा अशा अनेक गुणांचे संस्कार होत. उत्तम नागरिक तयार होऊन जात.

सर्व धर्मांचा इतिहास, शिक्षणपद्धती अशी होती. आदर्श शिक्षक, समर्पित शिष्य आणि सुंदर नीतिधर्म असा हा त्रिकोण होता. तंत्रज्ञान आलं अन्‌‍ माहितीच्या महाजालात मन, बुद्धी, शरीर अडकलं. दूरशिक्षणामुळे सर्वदूर शिक्षण पोहोचलं. गुरुजी गेले. पबजी, फाईव्हजी आले. पगार वाढले. खर्च वाढले. जिव्हाळ्याचे संबंध संपले. संस्कार हरवले. संस्कृती विसरले. श्रीमंत होणं म्हणजे मोठं होणं. सत्ता, संपत्तीसाठी काहीही करणं. मोजक्या विद्या, कलाक्षेत्रात ही गुरू-शिष्य परंपरा उरलीय. गायन, नर्तन, वादन वगैरे. ज्ञानाचं हस्तांतरण करताना स्पर्धा वाढली. सर्व गोष्टींत वाढ झाली. माणुसकी दुर्मीळ झाली. आपुलकी काळजाच्या कोपऱ्यात धूळ खात पडली. अध्यात्मविद्या मात्र अपवाद ठरली. कारण आत्मा आणि परमात्मा असा हा संबंध अतूट आहे. अर्थात श्रद्धा, आदर, आस्था हे धागे नित्य बळकट आहेत. अध्यात्मविद्या सूक्ष्म आहे. त्यामागे अवीट गोडीची प्रेरणा आहे. शिकण्यात मनमोकळेपणा आहे. आत्मपरिवर्तनाची भाषा नम्रता शिकवते. ही विद्या आतून ‌‘जागं’ करते. हा वारसा त्रिकालाबाधित आहे. अमर आहे. उत्तराधिकारी या विषयावर एक कथा आहे. एक होते आचार्य. त्यांच्या अनेक शिष्यांमध्ये दोन शिष्य जुने आणि जाणते होते. त्यात एकाला आपली गादी चालवायला द्यावी, पण कुणाला हे गुरूंना कळत नव्हतं. ते एकदा तीर्थयात्रेला निघाले. दोघांना एकेक मूठभर गहू देऊन म्हणाले, “मी काही महिन्यांनी येईन. हे दाणे जपून ठेवा. मी आल्यावर दाखवा.”

गुरू गेल्यावर एकानं गहू बांधून ठेवले. रोज त्याची पूजा करू लागला. गुरूची अमूल्य ठेव म्हणून जपू लागला. दुसरा शिष्य आश्रमाच्या मागील शेतात गेला. गहू पेरून नियमित काळजी घेऊ लागला. पुढील कथा कुणीही समजू शकतं!
गुरू आले. पहिल्यानं गहू जसेच्या तसे ठेवले होते. दुसऱ्यानं गव्हाचं पीक काढलं होतं. ते पीक पाहून गुरुदेव म्हणाले, “मी जे ज्ञान दिलंय, त्याचा प्रचार अन्‌‍ प्रसार तुझ्यासारखा शेतकरी उत्तम रीतीनं करू शकतो. गुरुदक्षिणेचा अर्थ हाच आहे की, गुरूने दिलेल्या ज्ञानाचा वसा पुढे चालवणं!”

गुरू हा योग्य शिष्याला गुरुपदी बसवतो. सर्व कसोटीवर शिष्य पात्र ठरतो.
वारसाहक्क मिळतो.

‌‘प्रत्यक्ष साधना करणं अत्यंत आवश्यक आहे. सतत साधना केल्याखेरीज काहीही लाभायचं नाही. रोज तासन्‌‍तास माझ्यासमोर बसून मी बोलेन ते ऐकत गेलात, तरी स्वत: प्रत्यक्ष साधना केली नाही, तर पाऊलभरही प्रगती होऊ शकणार नाही. प्रत्यक्ष साधनेवरच सारं अवलंबून आहे. प्रत्यक्ष आल्याशिवाय या गोष्टी खरोखर समजणं कदापि शक्य नाही. आपण त्या प्रत्यक्ष पाहिल्या पाहिजेत. त्यांची अनुभूती महत्त्वाची. मतं ऐकून काय होणार?’ असा प्रश्न विवेकानंद विचारतात.

प्रत्याहार आणि धारणाभ्यास करताना एकान्त साधावा. लोकांमध्ये फारसं मिसळू नये. अनेक प्रकारच्या लोकांमध्ये मिसळल्यानं मनात चलबिचल होते. खळबळ माजते. साधकानं, भक्तानं, शिष्यानं कमीतकमी बोलावं. पैशासाठी धावत सुटणं, तेही मरेपर्यंत घातक असतं. भरपूर श्रम केल्यानं मनाचा संयम साधणं कठीण. योग, भक्ती, साधना थोडी जरी केली तरी खूप आंतरिक लाभ होतो. पारलौकिक कल्याण होतं. त्यामुळे कुणाचं वाईट होत नाही. अशुभ होत नाही. सर्वांत मोठा फायदा म्हणजे गुरुसेवेनं मन शांत होतं. आरोग्य सुधारतं. स्वरदोष दूर होतात. याशिवाय काही अनोळखी गोष्टी स्वप्नात दिसतात. घंटानाद मंदपणे ऐकू येतो. काही तेजस्वी कण तरंगताना दिसतात. ते मोठे होत जातात. अशा अद्भुत गोष्टी दिसू लागल्या, तर साधकानं समजावं, आपण भक्तीच्या योग्य मार्गावर आहोत. अर्थात खाण्यावर नियंत्रण ठेवणं आलंच! गुरुभक्तियोग असा पूर्णत्व देतो. गुरुभक्तीत हठयोग, राजयोग, कर्मयोग, ज्ञानयोग सर्व आहेत. गुरुपूजा ही देवपूजाच होय. देहाच्या तिजोरीत भक्तीचा ठेवा सुरक्षित राहतो. अंतरीची पतपेढी कुणीही लुटू शकत नाही. भक्ती सुरक्षित राहते.
जय गुरुदेव!

([email protected])

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -