ऋतुराज – ऋतुजा केळकर
‘अद्वैताच्या उंबरठ्यावर
एक होळी जळतेय मनाच्या कोपऱ्यात
आत्म्याच्या ओढणीला षड्रिपूंचे
डाग पडलेत ना…’
हिता लिहिता हात अडकला, आज होलिका दहन, होलिका दहनाची कथा आहे की प्राचीन काळी राक्षस राजा हिरण्यकश्यपुने आपल्या पुत्राला प्रल्हादाला ठार मारण्याचे ठरवले होते. कारण प्रल्हाद भगवान विष्णूंचा भक्त होता. हिरण्यकश्यपुच्या आदेशानुसार त्याची बहिण होलिका, जिला ब्रम्हदेवाचे असे वरदान होते की ती अग्नीत जळणार नाही. तिने प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत प्रवेश केला परंतु तिने आपल्या वरदानाो वाईट प्रकारे उपयोग केल्याने होलिका राक्षसीण अग्नीत भस्मसात झाली. तसेच प्रल्हाद हा विष्णू भक्त असल्याने त्याला अग्नीची अजिबात झळ पोहोचली नाही, या घटनेला स्मरण करण्यासाठी होलिका दहन केले जाते.
फाल्गुन शुध्द पौर्णिमेला होळीचे दहन केले जाते. यास ‘हुताशनी पौर्णिमा’ असे देखील संबोधित जाते. होलिका दहन म्हणजेच होळी होय. खरतर त्यानंतर येणाऱ्या पंचमीस रंगपंचमी खेळली जाते परंतु सध्याच्या गतिमान युगामुळे रंगपंचमी दुसऱ्याच दिवशी धुलीवंदन म्हणून साजरी केले जाते. हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे. हा उत्सव पापावर पुण्याचा आणि अंधकारावर प्रकाशाचा विजय दर्शवतो. होलिका दहन रात्री केले जाते. विशेषतः रात्री उशिरा लोक एका ठिकाणी एकत्र येतात आणि होलिका दहनाचे पूजन करतात. पूजनानंतर, दुष्ट शक्तीचे प्रतिक म्हणून फटाके, वाळू, लाकूड आणि पिळकडी याचा ढिगारा करून त्याला आग लावली जाते. ज्याला “ प्लावनी ” किंवा “होलिका दहन” असेही म्हटले जाते. पापावर पुण्याचा विजय, अंधकारावर प्रकाशाचा विजय आणि दुष्टतेवर सत्याचा विजय हाच होलिका दहनाचा मुख्य संदेश आहे. हे एक धार्मिक आणि मानसिक शुद्धतेचे प्रतीक आहे, होळी सणाच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळले जातात, तीच रंगपंचमी होय. रंगपंचमी ही श्रीकृष्णाशी जोडली गेलेली आहे. कान्हा सर्व गोपिकांसोबत रंगपंचमी अत्यंत आनंदाने खेळत असे असेही वेगवेगळ्या पुराण कथांमध्ये सांगितले जाते. तसा रंगांचा आणि कान्ह्याचा खूप जवळचा संबंध आहे असे मला वाटते. कारण कान्ह्याला आवडते ते मोरपीस आणि मोरपिसात सप्त रंग सामावलेले असतात.
पण तुम्हाला माहिती आहे का की, रंगांचे देखील एक शास्त्र आहे, आपल्या पौराणिक ग्रंथात देखील याचा उल्लेख आहे, त्या शास्त्रानुसार आपण जर त्या त्या रंगांचा योग्य त्या पद्धतीने आपल्या आयुष्यात वापर केला तर सकारात्मकरित्या त्याचा फायदा आपल्या आयुष्यात यशाच्या पायऱ्या चढण्याकरिता आपल्याला होईल.
प्रत्येक रंग हा वेगवेगळ्या भावना प्रतीत करतो. आपल्या मानसिकतेवर देखील रंगाचा खोल परिणाम होतो. जसे शक्ती, सामर्थ्य आणि निर्णयक्षमता याचे प्रतिक हा तांबडा किंवा लाल रंग आहे. तो प्रेम आणि प्रगती दर्शवतो. त्याला पवित्रता आणि भक्तीच्या दृष्टीने महत्त्व दिले जाते. तसेच शौर्य आणि सामर्थ्याशी संबंधित देखील याला विशेष महत्व आहे. त्यानंतर येतो तो नारिंगी रंग. सूर्यास्ताच्या वेळी क्षितिजावर रेंगाळत राहणारा हा रंग अध्यात्माशी निगडीत आहे. जीवनातील बदल हा नवनवीन संधीचे प्रतिक आहे. तप, त्याग आणि अध्यात्मिक ज्ञानाचे प्रतिक म्हणजे नारिंगी रंग होय. त्या नंतर येणारा पिवळा रंग हा लक्ष्मीचे तसेच ऐश्वर्याचे प्रतिक आहे. वसंत ऋतुचा प्रारंभ आणि निसर्गातील नवजीवन पिवळ्या रंगाने व्यक्त होतो त्यानंतर येणारा हिरवा रंग हा सकारात्मक आणि प्रेरणादायी असतो. मानसिक शांती आणि मनाचे संतुलन हे यामुळेच राखले जाते. समृद्धी, सर्जनशीलता आणि चांगले आचारविचार देखील हिरवा रंगात प्रतीत होते. त्यानंतर येणारा रंग म्हणजे निळा रंग. निळा रंग शांती, ज्ञान, स्थिरता आणि गहिरा विचार यांचे प्रतीक मानला जातो. तो तप आणि बौद्धिक उन्नती दर्शवतो. निळा रंग स्थिरता, विश्वास आणि सुरक्षा यांचे प्रतीक आहे. तो व्यक्तीला मानसिक स्थिरता आणि आत्मविश्वास देतो. तो स्वप्न, महत्त्वाकांक्षा आणि उंचीचे प्रतीक म्हणून देखील ओळखला जातो. म्हणूनच असेल कदाचित पण भगवान विष्णू किंवा कृष्णाचा रंग हा देखील निळाच आहे. पुढे येणारा पांढरा रंग हा दिव्यता, अध्यात्मिकता आणि ईश्वरत्वाशी संबंधित आहे.
शुद्धतेचे आणि व्यावसायिकतेचे प्रतीक मानले जाते. विश्रांती आणि आत्मसमाधानाचे तसेच आयुष्यातील अंधकारापासून प्रकाशाकडे, अज्ञातापासून ज्ञानीपणाकडे आणि दुःखापासून सुखाकडे जाण्याच्या प्रक्रियेत पांढरा रंग जास्त महत्वाचा आहे. एकाग्र होऊन पुनर्निर्माण करण्याकरिता पांढऱ्या रंगाचा विशेष वापर केला जातो. त्यानंतर येणारा रंग म्हणजे जांभळा रंग. जांभळा रंग हा ऐश्वर्य, समृद्धी आणि राजसतेचे प्रतिक आहे. प्रतिष्ठा, संपत्ती तसेच उच्च दर्जा या रंगाद्वारे प्रतीत होतो. हा रंग मानसिक तणाव तर कमी करतोच शिवाय या रंगाच्या वापराने खोलवर विचार करण्याची क्षमता तसेच उत्कृष्टता देखील येते. सर्वात शेवटी येतो तो काळा रंग की जो खरंतर सप्त रंगात येत नाही. तरीही त्या काळ्या रंगाचे स्वतःचे एक वैशिष्ठ आहे. काळा रंग हा शक्ती, सामर्थ्य आणि प्रभावाचा तसेच नियंत्रणाचे प्रतीक मानला जातो, परंतु कधी कधी तो काळाच्या आणि भविष्याच्या अनिश्चिततेचे प्रतीक मानला जातो. त्याचे गडद स्वरूप भविष्याच्या अंधकाराशी आणि अविश्वासाशी जोडले जाते आणि कधी कधी आपल्या आयुष्यातील अनिश्चिततेची भावना व्यक्त करते. म्हणूनच तो गूढता, रहस्य आणि अनोळखीतेचे प्रतीक आहे. असे तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा, जांभळा आणि काळा हे अष्ट रंग आपण योग्य पद्धतीने वापरून आपल्या आयुष्याची यशाची कवाडे उघडू शकतो आणि असे केले तर आपल्या आयुष्यात रंगपंचमीचे सारे रंग नक्कीच अवतरतील.