Tuesday, March 25, 2025
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीपरमात्म्यावर पूर्ण निष्ठा पाहिजे

परमात्म्यावर पूर्ण निष्ठा पाहिजे

अध्यात्म – ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

आईकरिता रडत असलेले मूल आई भेटल्याशिवाय रडणे थांबवत नाही, त्याप्रमाणे, समाधानाकरिता, आनंदाकरिता, धडपडणारा आपला जीव, परमेश्वर प्राप्त झाल्याशिवाय शांत राहू शकत नाही. म्हणून प्रपंचाची काळजी न करता, परमेश्वराची प्राप्ती कशी होईल याची काळजी करा. भगवंतावर संपूर्णपणे निष्ठा ठेवल्याशिवाय आपली प्रपंचाची काळजी दूर होणार नाही. सर्व जगताचा जो पालनकर्ता, तो आपले पालन नाही का करणार ? प्रत्येक गोष्ट त्याच्याच सत्तेने होते हे लक्षात ठेवा, मग प्रपंच कधीही बाधक होणार नाही. एक भगवंतावरची निष्ठा मात्र शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळा. आपण पुराणात वाचलेच आहे की, भीष्माने पांडवांना मारण्याची प्रतिज्ञा केली. भीष्मप्रतिज्ञाच ती, मग ती खोटी कशी होऊ शकेल? सर्व पांडव चिंताग्रस्त झाले, पण द्रौपदीची निष्ठा मात्र जबरदस्त होती. ती म्हणाली, “आपण श्रीकृष्णाला विचारू.” तिने सर्व वृत्तांत त्याला कथन केला. श्रीकृष्ण म्हणाला, “भीष्माची प्रतिज्ञा खोटी कशी होईल? तरी आपण एक प्रयत्न करून बघू.” तो म्हणाला, “द्रौपदी, तू आता असे कर, रात्री भीष्माचार्यांच्या आश्रमात जा. तिथे फक्त संन्याशांना आणि स्त्रियांना मुभा आहे.

मी तुझ्याबरोबर आश्रमापर्यंत येतो.” त्यानंतर श्रीकृष्ण द्रौपदीला घेऊन भीष्माचार्यांच्या आश्रमापर्यंत गेले आणि बाहेरच तिचे अलंकार आणि इतर वस्तू सांभाळत बसले. श्रीकृष्णांनी तिला आत जाताना सांगितले की, “भीष्माचार्य आता झोपत आहेत, अशा वेळी तू आत जा आणि बांगड्या वाजवून नमस्कार कर.” त्याप्रमाणे द्रौपदी आत गेली, आणि बांगड्या वाजवून भीष्माचार्यांना तिने नमस्कार केला. त्यांनी लगेच तिला “अखंड सौभाग्यवती भव” म्हणून आशीर्वाद दिला. मग त्यांनी पाहिले तो द्रौपदी ! तेव्हा ते म्हणाले, “द्रौपदी ही अक्कल तुझी खचित नव्हे; तुझ्याबरोबर कोण आहे ते सांग.” ती म्हणाली, “माझ्याबरोबर गडी आणला आहे; तो बाहेर उभा आहे.” भीष्माचार्यांनी बाहेर येऊन पाहिले. त्यांनी श्रीकृष्णाला ओळखले; परंतु आता सर्व काम होऊन चुकले होते. म्हणून म्हणतो, परमात्म्यावर पूर्ण निष्ठा पाहिजे. या निष्ठेच्या आड जर काही येत असेल, तर तो म्हणजे आपला अभिमान. हा अभिमान सर्वांना घातक आहे. तो घालवण्यासाठीच परमात्म्याला वारंवार अवतार घेणे भाग पडले. ही अभिमानाची हरळी नाहीशी व्हायला भगवंताच्या नामासारखा दुसरा उपाय नाही. नामावर प्रल्हादाने जशी निष्ठा ठेवली तशी ठेवावी. त्याने नाम श्रद्धेने घेतले आणि निर्विषय होण्याकरिता घेतले, आपण ते विषयासाठी घेऊ नये. नामापुरते दुसरे सत्य नाही हे समजावे. याच जन्मात हे नाम शांतीचा आणि समाधानाचा ठेवा मिळवून देईल.
तात्पर्य : नामस्मरणात स्त्री-पुरुष, श्रीमंत-गरीब, हे भेद नाहीत. फक्त ते श्रद्धेने घेणे जरूर आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -