मनाचा गाभारा – अर्चना सरोदे
त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे!!
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर !
पण सर्वांनी नर्मदा परिक्रमेविषयी ऐकले वा वाचले असेलच.
सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ नदी म्हणून गंगेचे महत्त्व असले तरी फक्त नर्मदा ही भारतातील एकमेव नदी आहे की, फक्त तिचीच परिक्रमा होते. इतर नद्यांच्या तुलनेत नर्मदा उलट दिशेने वाहते.
नुकतीच नर्मदा जयंती होऊन गेली. तुम्ही मध्य प्रदेशमध्ये गेलात की, तुम्हाला चारी दिशांना हिरवीगार शेते दिसतील… मुग, गहू, हरभरा, मटार, मका आदी. पिके इथे घेतली जातात. नर्मदा मैय्याच्या कृपेने आमच्या राज्यात समृद्धी नांदते आहे असे तेथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे आणि म्हणूनच मध्य प्रदेशमध्ये नर्मदा मैय्याला जीवनदायिनी म्हटले जाते. नर्मदा जयंतीनिमित्त माँ नर्मदेचा जयंती सोहळा इथे भक्तिभावाने आणि हर्षोल्लासात साजरा केला जातो. मध्य प्रदेशातील प्रत्येक घाटावर सजावट केली जाते. हजारों भाविक या उत्सवासाठी जमतात. नर्मदा पूराणानूसार नर्मदा मैय्याचा उद्गम दुपारी १२ वाजता झाला होता. म्हणून १२ वाजता माँ नर्मदेला अभिषेक घातला जातो. हवन करून तीचे पूजन केले जाते व मैय्याची महाआरती केली जाते. सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. त्यानंतर गावातील देवळातून चुनरी (साडी) घेऊन बायका दोन्ही बाजूने पकडून वाजत-गाजत, गाणीच म्हणत अनवाणी पायाने चालत घाटावर निघतात. ती लांबच लांब चुनरी आपल्या हाताने पकडत शेकडो भाविक घाटाच्या दिशेने प्रस्थान करतात. घाटावर गेल्यावर गावातील काही लोकं नाव घेऊन किनाऱ्यावर तयार असतात. चुनरीचा पुढचा छेडा नावेतील भक्तांकडे सुपूर्द केला जातो. आणि मग चुनरी घेऊन नाव निघते आणि ती संपूर्ण चुनरी मैय्याला अर्पण केली जाते.
नर्मदा मातेच्या अथांग पात्रावरून ती चूनरी जेव्हा ओढली जाते मैय्याचे रुप पाहून डोळ्यांतून आनंदाश्रू तरळू लागतात. त्या नंतर गावातील महिला नर्मदा मैय्याची पूजा करतात आणि पिठाच्या दिव्यांचे दीपदान केले जाते. रात्री भजन कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. काही घाटांवर सात दिवस नर्मदा पूराणाचे आयोजन केले जाते. नर्मदा जयंतीचा हा उत्सव भाविकांच्या “नर्मदे हर’’च्या गजरात भक्तिभावाने साजरा केला जातो. नर्मदा मैय्याची थोडक्यात कहाणी अशी आहे. असं म्हणतात की, समुद्राच्या मंथनानंतर भगवान शिवाच्या घामाचा थेंब पृथ्वीवर पडला, ज्यामुळे नर्मदा माता प्रकट झाली म्हणून तिला शिवसुता असेही म्हटले जाते. देवतांनी तिचे नाव नर्मदा असे ठेवले. इकडे मैकलराजाने मुलं होण्यासाठी शंकराची घोर तपश्चर्या केली आणि १२ वर्षांची कन्या नर्मदा मेकल पर्वतावर प्रगट झाली. म्हणून तिला मेकलची राजकन्या मेकलकन्या असेही म्हटले जाते. नर्मदेचा विवाह करण्यासाठी राजा मेकल यांनी कन्या नर्मदेच्या विवाहासाठी पण ठेवला. राजाने घोषणा केली की, जो कोणी राजकुमार गुलबकवलीचे फूल आणेल त्याच राजकुमाराशी नर्मदाचं लग्न होईल. अनेक राजपुत्र आले, पण कोणीही हा पण पूर्ण केला नाही. तेव्हा राजकुमार सोनभद्र गुलबकवलीचं फूल घेऊन आला आणि त्याचं नर्मदेशी लग्न ठरलं.
राजकन्या नर्मदेला सोनभद्र याची भेट घेऊन त्याचा स्वभाव जाणून घ्यायचा होता म्हणून नर्मदाने सखी जुहिला हिला तिचा निरोप घेऊन राजकुमारकडे जाण्यास सांगितले. जुहिलाची नियत फिरली आणि ती नर्मदा बनून राजकुमारकडे गेली आणि बराच वेळ झाल्यानंतरही ती परतली नाही. नर्मदा चिंतेत पडली आणि ती जुहिलाला शोधण्यास निघाली.
शोधता शोधता नर्मदा सोनभद्राकडे पोहोचली आणि तिथे जुहिलाला राजकुमारासोबत पाहिलं. हे पाहून नर्मदा संतापली आणि ती उद्वेगाने संतापात त्यांच्या विरुद्ध दिशेने निघाली. म्हणून ती पश्चिमेकडून वाहते. तिने आयुष्यभर कुमारी राहण्याच व्रत घेतलं. नर्मदा मैयाच्या या निर्णयामुळे त्यांना “चिर कुमारी” असे म्हणतात; परंतु तिचा उद्वेग थांबवणे मात्र कोणालाही शक्य नव्हते. तेव्हा सर्वजण शंकराला शरण गेले. भगवान शंकराने तिला शांत केले आणि तिला वर दिला की, माता नर्मदेच्या केवळ दर्शनाने मानवाच्या दु:खाचा शेवट होईल. प्रलय काळात देखील तिचा अंत होणार नाही. नर्मदेमधून निघणारे दगड हे शिवाचे रूप मानले जाईल. त्यांना प्राणप्रतिष्ठा करण्याची गरज नाही आणि म्हणूनच अशी आख्यायिका आहे की, जो कोणी तिची पूजा करून व पूर्ण भक्तीने दर्शन घेतो त्यांना नक्कीचं नर्मदा मैय्या एकदा दर्शन देते.
नर्मदे हर हर हर…