माझे कोकण : संतोष वायंगणकर
कोकणचा कॅलिफोर्निया हे शब्द पन्नास वर्षांपूर्वीपासून कोकणातील विशेषत: राजकीय सभा, समारंभात नेत्यांच्या भाषणातून कानावर आले आहेत. शाळा, कॉलेजमध्ये असताना त्या-त्या वेळच्या निवडणुकांमध्ये विशेषत: काँग्रेसी सभांमध्ये आम्ही कोकणचा कॅलिफोर्निया केल्याशिवाय रहाणार नाही. हे वाक्य एकदा-दोनदा नव्हे तर किमान हजार वेळा कानावर आले असेल. शालेय जीवनात कॅलिफोर्निया हे कॅलिफोर्निया काय म्हणतात ते कळत नव्हतं. नंतर-नंतर या कॅलिफोर्नियारूपी ‘गाजरा’चा उलगडा झाला. कॅलिफोर्नियाचा हा काँग्रेसी गजर साधारणपणे १९९०-९५ पर्यंत सुरू होता. नंतर मग या कोकणच्या कॅलिफोर्नियाची वेगळी चर्चा सुरू झाली. कोकणातील जनतेलाही समजत नव्हते की, कोकण हाच सृष्टीसौंदर्याने नटलेला एक स्वर्ग आहे. कोकण हे परमेश्वराला पडलेले एक सर्वांग सुंदर स्वप्न आहे. हे नंतरच्या काळात कोकणविषयक विपुल लेखन साहित्यातून होऊ लागले. कोकणाला लाभलेला १२९ कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा, उंच डोंगर, दऱ्या अशा सर्वांचा मिळून कोकण आहे. कोकणात पर्यटन व्यवसाय आता उभारी घेत आहे. १९९८ साली कोकणच्या विकासाचा खऱ्याअर्थाने प्रारंभ झाला. कोकणात पर्यटन व्यवसायाला वाव आहे. पर्यटनातूनच कोकण विकसित करायला हवे. हे ज्यांना वाटले, पटले त्या विद्यमान खा. नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन म्हणून घोषित केला आणि कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात पर्यटन वाढत गेले.
दरवर्षी कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत गेली. कोकणातील पर्यटन प्रकल्पांच्या बाबतीत राज्य सरकारने विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कोकणातील पर्यटन व्यवसायातून महाराष्ट्राच्या तिजोरीला मोठा हातभार लागू शकतो. परंतु दुर्दैवाने महाराष्ट्रात सत्तास्थानावर आलेल्या सर्वच राज्यकर्त्यांनी कोकणकडे कधी फारसे लक्ष दिले नाही. कोकणात पर्यटन प्रकल्पासाठी काही विशेष प्रयत्नही करण्यात आले नाहीत. काही बाबतीत जशी महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांची चूक आहे तसा तो कोकणातील जनतेचाही तो दोष आहे. कोकणातील जनता विकासाच्या बाबतीत कधीही संघटित झाली नाही. उलट ज्यांच्याकडे विकासाच व्हीजन आहे. नवीन काही उभ करण्याची उमेद आहे. काही चांगल्या संकल्पना आहेत. त्यांना पाठबळ देण्याऐवजी कोकणवासीय राजकारणात अडकून पडले. यामुळे नुकसान कोकणचेच झाले. यासाठी एक उदाहरण सांगतो. माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचा लातूर जिल्हा आणि आपला सिंधुदुर्ग जिल्हा एकाच वेळी घोषित झाले. जिल्हा मुख्यालयांच्या इमारतींसाठी त्याकाळी २१ कोटींचा निधी मंजूर झाला. दुर्दैवाने सिंधुदुर्गच्या मुख्यालयाचा वाद न्यायालयात अडकून पडला. त्यामुळे तत्कालिन मंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी सिंधुदुर्गचा निधी लातूरला वळवला आणि लातूर जिल्हा मुख्यालय आणि जिल्हा विकसित केला. त्यानंतर तब्बल १० वर्षांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय तयार झाले. विकासाचा बॅकलॉक तसाच राहिला. ताज, ओबेरॉयसारख्या पंचतारांकित प्रकल्पांना विरोध करणाऱ्यांना केवळ राजकारण करायचे आहे. म्हणून त्यांचा या प्रकल्पांना विरोध आहे. बाकी त्यातून काही घडणारे नाही. कोकणचा विकास हा विरोधकांच्या विरोधात अडकला आहे. ज्यांना काहीच करायचे नसते असेच कोकणात विरोधाचे काम करतात. आजवर तुम्ही कोणते विकास प्रकल्प आणले. कोकणच्या विकासाची आपली संकल्पना काय आहे. या प्रश्नाचे उत्तरही विरोधक स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी विरोधकाची भूमिका घेतात.
कोकणातील जनतेला अशा भूमिकांमुळे कोकणचे नुकसान होत आहे. कोकणला सर्वकाही निसर्गाने दिले आहे, त्याचा नीट नियोजन करून उपयोग केला तर कोकणात स्वयंरोजगार निर्माण होऊ शकतात. जसा कोकणात पर्यटन व्यवसायाला वाव आहे त्याप्रमाणेच कोकणात उद्योगांची निर्मितीही होण्याची आवश्यकता आहे. उद्योगांची उभारणी कोकणात झाल्याशिवाय कोकणातील इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेला तरुण नोकरीनिमित्त मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसारख्या शहरात काम शोधायला जातो. यामुळेच आज कोकणातील बहुसंख्य वाडी-वस्तीतील घर बंद आहेत. कोकणातील समृद्धी ही पर्यटन व्यवसायातून जशी येऊ शकते; परंतु त्याच्या जोडीला उद्योगांची उभारणीही अत्यंत आवश्यक आहे. काही वेळा काही जणांकडून उद्योगच नकोत म्हणून विरोध केला जातो; परंतु जर उद्योगच नको म्हणणाऱ्यांनी इंजिनीअरिंग किंवा अन्य शिक्षण घेतलेल्या तरुणांनी कोकणात थांबावं असा कोणता उद्योग आहे. पर्यटन व्यवसायातील व्यावसायांना काही मर्यादा आहेत. त्यापलीकडे जाऊन आणखी काही होण्याची शक्यता नाही. यामुळे याचा विचार आपण करायलाच हवा आहे. राज्य सरकारनेही कोकणातील पर्यटन प्रकल्पांना चालना देतांना राज्य सरकारने हात आखडता घेता कामा नये. कोकणातील पर्यटन प्रकल्पांसाठी ज्या-ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या सर्वत्र पायाभूत सुविधांची निर्मिती होणे आवश्यक आहे. कोकणातील बंदरे विकसित होत असताना निश्चितच ही नव्याने विकसित होणारी कोकणातील बंदरे देखील पर्यटकांचे खास आकर्षण ठरणारी आहेत. त्यासाठीही प्रयत्न व्हावेत. कोकणचा कॅलिफोर्निया न होता कोकणाचे कोकणपण टिकवून ठेवत कोकणातला तरुण इथेच थांबेल कसा याचा विचार होणे ही आत्यंतिक बाब आहे. आता-आता कळतय कॅलिफोर्निया पेक्षा आपले कोकण एकदम भारी आहे. कोकणातीलच भिरवंडे तालुका कणकवली गावचे सुपुत्र गीतकार, संगीतकार श्रीकृष्ण सावंत यांनी बांदा ते बाणकोट पर्यंतच कोकण कसे आहे. याच अतिशय सुंदर वर्णन केले आहे.
आमचो ह्यो कोकण
स्वर्गापेक्षा सुंदर आसा
आमचो ह्यो कोकण
तुम्ही येऊन जावा आणि बघून जावा
तुमचा प्रसन्न होतला मन
असो आमचो ह्यो कोकण
या गीतातील वर्णनाप्रमाणेच कोकण आहे. म्हणूनच वेळोवेळी येवा कोकण आपलोच आसा.