रत्नागिरी: पुण्याहून कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने दिवसातून एका गाडीची व्यवस्था केली, तर पुणे आणि कोकण रेल्वेने जोडले जाईल आणि पुण्यातील चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळेल. तसेच मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांवरील ताणही कमी होईल, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी केली आहे.
पुण्याहून कोकणात येताना प्रवाशांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतो. सध्या पुण्याहून कोकणात जाण्यासाठी आठवड्यातून दोनच गाड्या आहेत. अशावेळी प्रवाशांना मुंबईमार्गे कोकणात यावे लागते; पण मुंबईमार्गे धावणाऱ्या गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि त्यामुळेच पुण्यातील रेल्वे प्रवाशांकडून पुणे ते कोकण अशी थेट रेल्वेसेवा सुरू झाली पाहिजे.
यापूर्वी रेल्वे प्रशासनाने काही सणांच्या निमित्ताने पुणे ते कोकणदरम्यान विशेष गाडी चालवली. या गाड्यांना प्रवाशांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला होता. तसेच सध्या सुरू असलेल्या आठवड्यातून दोन फेऱ्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र दिवसातून एकदा पुणे ते कोकण अशी रेल्वे सुरू झाली तर या मार्गावरील चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कर्जत, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, सापे वामने, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप या रेल्वेस्थानकांवर उतरणाऱ्या प्रवाशांना होईल, असे श्री. मुकादम यांनी रेल्वे प्रशासनाला कळविले आहे.