मुंबई : मुंबई शहर व उपनगर आणि नवी मुंबई शहरांच्या गरजा दिवसेंदिवस वाढत आहेत.या वाढत्या गरजांची पूर्तता करण्यासाठी नवीन परिवहन व्यवस्थांची आवश्यकता आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ,या दोन्ही विमानतळांच्या आजूबाजूला प्रमुख आर्थिक विकास केंद्रांच्या निर्मितीलाही वेग आहे.हे पाहता होणारी भविष्यातील रहदारीची मागणी पूर्ण करण्यासाठी,राज्य सरकारने या विमानतळांशी आंतरजोडणी सुधारण्यासाठी सक्रिय सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारच्या निर्णयानुसार,मुंबई मेट्रो मार्ग-८ या मेट्रो मार्गिकेमधील बहुतांश लांबी नवी मुंबई परिसरात असल्याने आणि आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सिडकोद्वारे विकसित केले जात असल्याने मुंबई मेट्रो मार्ग-८ हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर उभारण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. मुंबई मेट्रो मार्ग-८ मार्गिकेसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल सिडकोमार्फत तयार करण्यात येईल. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या प्रकल्पासंदर्भातील सुसाध्यता अहवाल व सविस्तर प्रकल्प अहवाल या संबंधीची सर्व माहिती आणि कागदपत्रे सिडकोला देतील.
मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी तसेच, मुंबईकरांना आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी एमएमआरडीएमार्फत मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) ३३७ किमीचे मेट्रोचे जाळे विणण्यात येणार आहे. राज्य सरकार वेगाने या संकल्पपूर्तीच्या दिशेने जात आहे. मुंबई ‘मेट्रो १’ ही घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा, ‘मेट्रो २-अ’ दहिसर ते डी एन नगर आणि ‘मेट्रो ७’ दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व आणि मुंबई ‘मेट्रो ३’ या भूमिगत मार्गिकेचा आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा मुंबईकरांच्या सेवेत आहे. दुसर्या टप्प्याची कामेही पूर्णत्वाकडे आहेत.
केवळ ३० मिनिटांत अंतर पार करता येणार
सुमारे ४० किमीचे हे अंतर रस्तेमार्गे सध्यस्थितीत एक तास, दहा मिनिटे इतके आहे. मात्र, हेच अंतर मेट्रो मार्गाने केवळ ३० मिनिटांत पार करता येईल. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते मानखुर्द आणि मानखुर्द-नवी मुंबई विमानतळ अशी मार्गिका उभारण्यात येईल. ‘सिडको’ या प्रकल्पसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करेल. अंदाजे ३५ किमी लांबीच्या या मार्गावरून लाखो प्रवाशांना सेवा मिळण्याची अपेक्षा आहे.
येत्या ५ वर्षांत २३७.५ किमी लांबीचे मेट्रो मार्ग होणार कार्यान्वित
आज मुंबई, नागपूर व पुणे महानगरांमधील नागरिकांना पर्यावरणपूरक, शाश्वत, विनाअडथळा व वातानुकूलित वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एकूण १४३.५७ किमी लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात आले आहेत. येत्या वर्षात मुंबईमध्ये ४१.२ किमी लांबीचे मेट्रो मार्ग सुरू होतील. येत्या पाच वर्षांत एकूण २३७.५ किमी लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात येणार आहेत. ठाणे वर्तुळाकार मेट्रो मार्गासाठी केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता मुंबई महानगर प्रदेशाच्या कोणत्याही टोकावरून कुठेही मेट्रोने जाता येणार आहे.