पर्यावरणपूरक वाहने एप्रिलपासून महागणार
मुंबई (प्रतिनिधी) : अर्थसंकल्पात सीएनजी, एलपीजी व इलेक्ट्रिकवर धावणाऱ्या वाहनावर वाढीव कर लावण्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे पर्यावरणपूरक ठरणारी वाहने एप्रिलपासून महागणार आहेत. पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण व त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या रोखण्यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पर्यावरणपूरक अर्थात इलेक्ट्रिक, सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न सुरू केले असतानाच त्यांच्याच गृहराज्यात भाजपच्याच सरकारने अर्थसंकल्पात पर्यावरणपूरक मोटारींवर वाढीव कर आकारला.
यांमुळे ही वाहने महागणार असून एकप्रकारे हा गडकरींच्या प्रदूषण मुक्तच्या प्रयत्नालाच सुरूंग मानला जातो. सोमवारी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२५-२०२६ या वर्षासाठी १ लाख ३६ हजार कोटींची वित्तीय तूट असलेला अर्थसंकल्प सादर केला.
२०२४ लोकसोभा व विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या लोकप्रिय घोषणांमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवरचा भार अधिक वाढला होता. कर्जाचा डोंगरही सारखा वाढतच होता. सरकार करवाढीच्या संदर्भात काही कठोर पावले उचलेल, अशी अपेक्षा होती.