जागतिक अग्निहोत्र दिन
डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले : अध्यक्ष, विश्व फाऊंडेशन
जे जगात नाही ते वेदात आहे, असे म्हटले जाते. वेद हे भारतीय धर्माचे आणि संस्कृतीचे मूलमंत्र आहे. त्यातूनच पर्यावरण समृद्धी आणि व्यक्तिगत उपासनेसाठी अग्निहोत्राची निर्मिती झाली असावी आणि ती जगभर रूढ झाली. तोच विचार वैश्विक स्वरूपात मुख्यपीठ असलेल्या शिवपुरी येथून संस्थेचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांनी प्रभावीपणे मांडले. हा एक विचार जीवन परिवर्तन करणारा आहे. त्यात मानवता हा एकच धर्म आहे असे त्यांनी म्हटले आहे. त्या विचाराला आज जगभरात मान्यता मिळते ही बाब केवळ अक्कलकोटच्या दृष्टीने नव्हे तर सोलापूरच्या दृष्टीने सुद्धा भाग्याची समजावी लागेल. अक्कलकोटपासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर हे केंद्र आहे. अग्निहोत्राचे मूळ उगमस्थान म्हणून तर याकडे पाहिले जातेच, पण याशिवाय शिवपुरीने जगाला विश्वबंधुत्व आणि मानवतावादी दृष्टिकोन शिकवला आहे. यज्ञ परंपरा आणि अग्निहोत्र या दोन विषयाचे महत्त्व परमसद्गुरू श्री गजानन महाराजांनी १९४४ च्या दरम्यानच ओळखले आहे आणि त्यावेळी त्यांनी ह्या विचारांना चालना दिली आहे. म्हणून आज ७० ते ८० वर्षांनंतरही या विचारांकडे पर्यावरणवादी आणि विज्ञानवादी लोकांनी याचे स्वागतच केले आहे. अग्निहोत्र ही संकल्पना मुळात वैश्विक आहे. ती कुण्याही एखाद्या धर्माशी किंवा समाजाशी निगडित नाही ती संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी आणि शांततेसाठी आहे आणि ती व्यक्तिगत उपासनेवर आधारित आहे, त्यामुळे त्याला जगभरात मान्यता आहे. या विचाराला मूळ भारतातून म्हणजे शिवपुरी येथून सुरुवात झाली आहे. तो विचार आज ऑस्ट्रिया, कृएशिया, पोलंड, जर्मनी, इटली, बुल्गेरिया, इंग्लंड, फ्रान्स, स्पेन यासारख्या देशांनी स्वीकारला आहे. मुळात ही संकल्पना जी आहे ती अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी आहे त्यात शरीराला ऊर्जा देणारी आहे. या व्यक्तिगत विकासाला खूप चालना मिळते.
श्री गजानन महाराजांनी हा विचार तर दिलाच पण अक्कलकोट हे शिक्षण, आरोग्य, कृषी, आयुर्वेद, अग्निहोत्र याचे मुख्य केंद्र बनावे. त्या माध्यमातून जगभरातील लोक अक्कलकोटला यावेत आणि त्या माध्यमातून गावचा विकास व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यांचा वैश्विक विचार होता म्हणून त्यांनी प्रत्येक गोष्टी जगासमोर मांडल्या आणि त्या वेगळ्या पद्धतीने केल्या. म्हणून आज शिक्षण असेल किंवा अग्निहोत्र असेल याकडे समाज वेगळ्या दृष्टीने पाहतो. त्यासाठी मेहनत पण घेतली. प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देऊन हा विचार समाजामध्ये रुजवला. म्हणून आज परदेशातील लोक शिवपुरीला येतात. तोच विचार अधिक व्यापक पद्धतीने डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले हे पुढे नेत आहेत. यात आणखी एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आज आपण योग करतो. ही बाब शरीराला आवश्यक आहे. तसे पाहिले तर त्याआधी अग्निहोत्र करणे फार महत्त्वाचे आहे. कारण योग केल्याने शरीराला जी ऊर्जा मिळते ती म्हणजे अग्नी. आणि ती ताकतच अग्निहोत्रामध्ये आहे. तसे पाहिले तर अग्निहोत्र ही संकल्पना फार जुनी आहे त्यामुळे अग्निहोत्र किती प्राचीन आहे यावरून सिद्ध होते. विशेष म्हणजे हा विचार मुळात अक्कलकोटमधून जगासमोर गेला आहे त्यामुळे जागतिक पातळीवर शिवपुरीचे महात्म्य मोठे आहे. जर मूळ या संस्कृतीचा अभ्यास केला तर वेद हे संपूर्ण मानवसृष्टीच्या आधी परमेश्वराने मानवाच्या कल्याणासाठी निर्माण केले आहे. वेद हा संस्कृत शब्द असून तो ‘विद्’ या संस्कृत धातूपासून तयार झाला आहे. वेद या शब्दाचा अर्थ ‘ज्ञान’ असाही मानला जातो. ही ज्ञान उपासनेची परंपरा वर्षांनुवर्षापासून शिवपुरीत सुरू आहे. या ठिकाणी सर्वच क्षेत्रात काम चालते.
दीडशे एकरचा हा परिसर असून यामध्ये अग्निहोत्र, योग, ध्यान, आयुर्वेदाचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच यज्ञीय पद्धतीने शेती, गोशाळा, विविध आयुर्वेदिक वृक्षांचे संवर्धन केले जाते.सर्वात महत्त्वाचे म्हणजे १९६९ साली विशुद्ध अहिंसक यज्ञसंस्थेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी एकमेवाद्वितीय महासोमयाग यज्ञ करून या शिवपुरीची स्थापना झाली आहे. याच सोमयागामध्ये साक्षात काशीविश्वेश्वर यांनी श्रींच्या समोर प्रकट होऊन नित्य वास्तव्यासाठी या स्थानाची मागणी केली होती. त्यामुळे श्रीनी शिवपुरीला ‘भूकैलास’ असे संबोधले आहे. ज्या अग्निहोत्रामुळे शिवपुरी जगप्रसिद्ध आहे.याला वैज्ञानिक आधार आहे तो म्हणजे अग्निहोत्राच्या नित्य आचरणामुळे मनुष्याला मन:शांती आणि आनंदी जीवनाचा लाभ होतो. अग्निहोत्र हे आपल्या मन शरीर व आत्मा या तिन्ही स्तरावर काम करते. यामुळे व्यक्तीला सकारात्मकता आणि आनंदीपणाचा अनुभव येतो. अग्निहोत्र हे निसर्गचक्राशी जोडले आहे. मनाची एकाग्रता, मन:शांती, सकारात्मकता, परिवारातील एकात्मता, व्यसनमुक्ती आणि यज्ञ शेतीसाठी खूप फायदेशीर मानले जाते. श्रीजी असे नेहमी म्हणतात की, आत्मउन्नतीचा प्रयत्न करण्याबरोबरच समाजातील दु:खी आणि गरीब लोकांची सेवा करणे हे आपले ध्येय असले पाहिजे. लोकसेवा हीच ईश्वर सेवा आहे. म्हणून वारंवार मानवाच्या कल्याणासाठी शिवपुरीच्या विश्व फाऊंडेशनमार्फत अनेक समाजपयोगी संकल्पना आणि योजना सुरू असतात. कित्येक वर्षांपासून ही संस्था शिक्षण, आरोग्य, पर्यावरण या तीन गोष्टींवर प्रामुख्याने काम करते. याबाबतीत संपूर्ण जगभरात या संस्थेचे योगदान आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. यासाठी पिरॅमिड आकाराचे तांब्याचे एक भांडे घ्यावे. त्यासोबत गाईच्या गोवऱ्या, आहुती देण्यासाठी कच्चे तांदूळ, गाईचे तूप घ्यावे. स्थानिक सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ फार महत्त्वाची आहे. त्यासाठी दोन सोपे मंत्र आहेत. ते म्हणजे सूर्याय स्वाहा… सूर्याय इद न मम… प्रजापतये स्वाहा… प्रजापतये इद न मम! हा सूर्योदयावेळी आणि सूर्यास्तावेळी अग्नये स्वाहा. तूप आणि तांदूळ याची आहुती सूर्योदयाच्या वेळी दिली जात असल्याने वेगळ्या प्रकारची आत्मीक ऊर्जा मिळते.