Saturday, September 13, 2025

Holi 2025 : होळी, धूलिवंदन दिवशी ट्रेनमधील प्रवाशांवर फुगे, प्लास्टिकच्या पिशव्या मारल्यास होणार कारवाई

Holi 2025 : होळी, धूलिवंदन दिवशी ट्रेनमधील प्रवाशांवर फुगे, प्लास्टिकच्या पिशव्या मारल्यास होणार कारवाई

मुंबई : होळी आणि धूलिवंदनाच्या निमित्ताने रेल्वे गाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर फुगे, प्लास्टिकच्या पिशव्या मारल्यास आता कारवाई केली जाणार आहे. प्रवाशांच्या जीविताची हानी किंवा धोका निर्माण करण्याच्या आरोपाखाली भारतीय दंड संहिता १२५ अंतर्गत अडीच हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांपर्यतचा कारावास किंवा दोन्ही, अशी शिक्षा होऊ शकते, अशा इशारा लोहमार्ग पोलिसांनी दिला आहे.

होळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. रेल्वे रुळांलगतच्या वस्त्यांमधून काही समाजकंटक प्रवाशांवर पाण्याने भरलेले फुगे आणि प्लास्टिकच्या पिशव्या मारतात.यामुळे रेल्वे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. होळी साजरी करताना रेल्वे प्रवाशांना त्रास होणार नाही, याची आम्ही काळजी घेणार आहोत असे अनिल कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लोहमार्ग पोलिस यांनी सांगितले आहे. मध्य रेल्वेच्या सायन, वडाळा, कुर्ला तसेच पश्चिम रेल्वेच्या वांद्रे, माहीम, अशा भागांमध्ये फुगे मारण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षीअशा ठिकाणांवर विशेष नजर ठेवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

ट्रेनचा वेग जास्त असल्याने प्रवाशांवर फुगे, प्लास्टिकच्या पिशव्या मारल्याने बऱ्याचदा दारात उभे असलेल्या किंवा खिडकी शेजारी बसलेल्या प्रवाशांच्या चेहऱ्यावर, डोळ्यांवर मोठ्या प्रमाणात दुखापत होते. आता हे सर्व प्रकार टाळण्यासाठी रेल्वे पोलिस आणि जीआरपी यांच्याकडून वस्त्यांमध्ये प्रबोधन केले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. होळी हा आनंदाचा सण असल्याने रंगांची उधळण सुरक्षित पद्धतीने करणे गरजेचे आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आम्ही जीआरपी आणि आरपीएफच्या मदतीने रुळांलगतच्या वस्त्यांमध्ये प्रबोधन करत आहोत असे विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे यांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment