रवींद्र मुळे : अहिल्यानगर
इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माने सलग शतके ठोकली होती. भारताची विजयी घौडदौड त्यावेळी रोखली गेली होती. न्यूझीलंडकडून त्यावेळी रोहितच्या डोळ्यांतून गळणारे अश्रू माल्कम मार्शल १९८३ साली भारताकडून वेस्ट इंडीज पराभूत झाल्यावर ज्या अवस्थेत होता त्याची आठवण करून देणारे होते. तेव्हाच रोहित हा केवळ पैशासाठी खेळणारा खेळाडू नाही हे लक्षात आले होते. ह्या वर्षी टेस्ट चॅम्पियन स्पर्धेतून भारताला बाहेर पडायला न्यूझीलंड संघच कारणीभूत होता. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिजमध्ये रोहितची फलंदाजी बघून रोहितच्या सगळ्या चाहत्यांना खूप वाईट वाटत होते. २०-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकल्यानंतर ह्या गुणी खेळाडूचा निवृत्तीचा काळ जवळ आला की, काय अशी धाकधूक ह्या कसोटी मालिकेमुळे वाटत होती. पण रोहित सावरला. इंग्लंड विरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत चमकला. एक शतक काढून आपण अजूनही फॉर्म टिकवून आहोत हे त्याने सिद्ध केले आणि चॅम्पियन्स ट्रॉफीला सज्ज होत एकही सामना न गमावता तो भारताला ट्रॉफी मिळवून देता झाला. एका अर्थाने न्यूझीलंड संघाचा खूप दिवसाचा हिशोब आज चुकता झाला आणि अशा वेळी आज अंतिम सामन्यात तर स्वतःच्या उत्कृष्ट फलंदाजीचा नमुना पण त्याने पेश केला.
रोहित नेहमी संघासाठी खेळत राहिला आहे आणि त्यामुळे गेल्या ५० षटकांच्या आणि नंतर २०-२० वर्ल्ड कपपासून पॉवर प्लेमध्ये संघाला जास्तीत जास्त धावा करून देण्यासाठी तो धडपडत आहे. आजचा त्याचा नजारा तोच होता आणि धावांची गती कमी होती आहे हे बघितल्यावर स्वतःच्या शतकापेक्षा गतीला महत्त्व देण्याच्या नादात स्वतःची विकेट घालवून बसला. ह्या चॅम्पियन्स ट्रॉफीने भारताला खूप काही दिले. चार स्पिनर्सचे कॉम्बिनेशन भारताच्या स्पिनर्स गोलंदाजीचा प्रसन्न, बेदी, चंद्रशेखर, वेंकट ह्यांची आठवण करून देत होते. तर अक्षर पटेल आणि हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा ह्या तिघांना अष्टपैलू म्हणून संघात बघताना १९८३ मधील मदन, मोहिंदर, कपिल ह्यांची आठवण करून देत होते. शुभमन आणि श्रेयस निव्वळ फलंदाज म्हणून आपली भूमिका पार पाडत असताना, उत्कृष्ट यष्टिरक्षण करून राहुल संपूर्ण स्पर्धेत शेवटच्या विजयी षटकापर्यंत उभा होता. “विराटने तर कमालच केली आणि २०२७ सालचा वर्ल्ड कप होईपर्यंतची चिंता दूर केली. बुमराह नसताना आम्ही ही स्पर्धा जिंकली आहे आणि अंतिम सामन्यात विराट अपयशी ठरल्यावर सांघिक खेळावर आम्ही जिंकलो आहोत हे येथे लक्षात ठेवावे लागेल. ऋषभ पंतसारखा मॅच विनर खेळाडू बाहेर राहू शकतो इतकी गुणवत्ता ह्या भारतीय संघात दिसली. रोहित कर्णधार म्हणून करत असलेले गोलंदाजीत बदल आणि त्याची क्षेत्ररक्षण आखणी आणि सर्व परिस्थित डोके थंड ठेवून त्याने सहकाऱ्यांना दिलेला धीर सर्वसामन्यात भारताला बाजी पलटवण्यात यशस्वी झालेला दिसला. त्यामुळेच कुठल्याच सामन्यात भारत नियंत्रण गमावतो आहे अशी स्थिती आली नाही. काही मूर्ख राजकीय क्रिकेट पंडित रोहितबद्दल जे बोलत होते ते किती असभ्य, मूर्खपणाचे होते हे आजच्या विजेतेपदावरून आणि महत्त्वाच्या क्षणी रोहितने केलेल्या फलंदाजीने सिद्ध झाले. महान खेळाडू असेच असतात. ते आपल्यावरील टीकेला आपल्या खेळाने उत्तर देतात. रोहितने ते आज करून दाखवले.
२००७ मध्ये २०-२० वर्ल्ड कपमध्ये तो होता. २०११ मध्ये दुर्दैवाने नव्हता पण नंतर सलग सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताला विराटच्या बरोबरीने यश मिळवून देणारा रोहित हा महान खेळाडू ठरला आहेच पण जगातील महान कर्णधार म्हणून पण तो ओळखला जाणार आहे. सोबर्स, लॉईड, बॉर्डर, पाँटिंग, माइक ब्रिअर्ली, इलिंगवर्थ, इम्रान, रणतुंगा आणि अजित वाडेकर, धोनी हे प्रामुख्याने क्रिकेट इतिहासातील महान कर्णधार मानले जातात त्यामध्ये आता रोहित हे नाव जोडले जाईल. मागील २०२३ वर्ल्डकपमध्ये अंतिम सामन्यात पराभूत झाल्यावर पंतप्रधान मोदी ह्यांनी जे प्रोत्साहन सर्वांना भेटून दिले त्यातून देशासाठी खेळण्याची सर्व खेळाडूंची प्रेरणा अधिक दृढ झाली असे म्हणावे लागेल. भारतात, कुणाला आवडेल न आवडेल पण क्रिकेट ह्या माध्यमातून देशभावना प्रज्वलित होते रोहितने आणि विराटने अजून काही काळ खेळत राहावे आणि चाहत्यांना असेच आनंदित करावे ही तमाम भारतीयांची भावना आहे. वेल प्लेड भारत! आज तुम्ही तमाम भारतीयांना खूप खूप आनंद दिला! पुन्हा एकदा रोहित शर्माचे खास अभिनंदन! ‘शमा मोहम्मद गँग’ मोकळ्या मनाने रोहितचे अभिनंदन करणार का? त्यांनी करो अथवा न करो भारत क्रिकेटमध्ये चॅम्पियन आहे आणि रोहित यशस्वी कर्णधार तर आहेच पण उत्कृष्ट फलंदाज आहे हे सत्य आज अधोरेखित झाले आहे.