जयपूर : अभिनेत्री श्रीदेवी यांचं २४ फेब्रुवारी २०१८ रोजी निधन झालं. दुबईतील हॉटेलमध्ये बाथटबमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर कलाविश्व हादरलं होतं. श्रीदेवी यांनी २०१७ साली निधनाच्या आधी ‘मॉम’ हा शेवटचा सिनेमा केला होता. आता नुकतंच या सिनेमाच्या सीक्वेलची घोषणा बोनी कपूर यांनी केली आहे. यामध्ये कोण अभिनेत्री असणार याचाही खुलासा त्यांनी नुकताच केला.
२०१७ साली आलेल्या श्रीदेवीचा ‘मॉम’ हा चित्रपट रिलीज झाला होता. हा चित्रपट श्रीदेवीचा शेवटचा चित्रपट ठरला.आता बोनी कपूर यांनी सिनेमाच्या सीक्वेलची घोषणा केली आहे. आयफा अवॉर्ड्सच्या ग्रीन कार्पेटवर त्यांनी ही घोषणा केली. तसंच सिनेमात जान्हवी कपूर नाही तर धाकटी लेक खुशी कपूरला कास्ट करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. बोनी कपूर म्हणाले, “मी खूशीचे सर्व सिनेमे पाहिले आहेत. ‘आर्चीज’,’लव्हयापा’,’नादानियां’. ‘नो एंट्री’नंतर मी तिच्यासोबत सिनेमा करण्याची प्लॅनिंग करत आहे. मॉम २ मधून ते होऊ शकतं. खूशी तिच्या आईच्या पावलावर चालण्याचा प्रयत्न करत आहे. तिची आई सर्व भाषांतील सिनेमात टॉप स्टार होती. खुशी आणि जान्हवी सुद्धा तितक्या उंचीवर जाऊन पोहोचतील अशी मला आशा आहे.
२०१७ साली आलेल्या ‘मॉम’ सिनेमात श्रीदेवी यांनी आईची भूमिका साकारली होती. आपल्या लेकीला वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जाणारी आई त्यांनी उत्तम साकारली. श्रीदेवी यांच्या कमबॅकनंतर त्यांचा हा करिअरमधील सर्वोत्कृष्ट सिनेमांपैकी एक होता. त्यांना मरणोत्तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अवॉर्डही मिळाला होता.’मॉम’ सिनेमाचं दिग्दर्शन रवी उद्यवार यांनी केलं होतं. हा क्राइम थ्रिलर सिनेमा होता. श्रीदेवी यांच्याशिवाय नवाजुद्दीन सिद्दीकी, अक्षय खन्ना, अभिमन्यू सिंग, सेजल अली, आदर्श गौरव यांचीही भूमिका होती. बोनी कपूर यांनी सिनेमाची निर्मिती केली होती.