सेवाव्रती : शिबानी जोशी
महाराष्ट्रीय पारंपरिक पदार्थांबरोबर नवनवीन चटपटीत नमकीन, गोड, तिखट २५० हून अधिक खाद्यपदार्थ उत्पादन, त्याचबरोबर दररोज तीन टन बाकरवडी, ऑनलाइन ऑर्डरची सुविधा, खाद्यपदार्थांची सातत्याने अचूक चव असे सर्व देणारा उद्योग कोणता आपल्याला माहीत आहे का, तो आहे चितळे बंधू उद्योग. तुम्ही महाराष्ट्रात असा की, जगाच्या कोनाकोपऱ्यांत खाद्यपदार्थ वेळेत पोहोचणारे व्यवस्थापन. अल्पावधीत अवाढव्य उद्योग विस्तारलेल्या ‘चितळे बंधू’ यांच्या व्यावसायिक यशाचे रहस्य दडलंय तरी कशात? तर दर्जेदार गुणवत्तापूर्ण उत्पादन, चांगलं पॅकिंग, नियोजन यामुळे मिळालेली विश्वासार्हता. १९३९ मध्ये, जेव्हा भास्कर गणेश चितळे यांनी सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथे एक साधा दूध वितरण व्यवसाय सुरू केला. १९५०च्या दशकाच्या सुरुवातीला एक महत्त्वाचा टप्पा उद्योगात आला तो म्हणजे भाऊसाहेब. भाऊसाहेब म्हणजे रघुनाथ चितळे यांनी चितळे बंधू मिठाईवाले यांची स्थापना केली. हा उद्योग आता लोकल ते ग्लोबल झाला आहे. गुणवत्ता आणि परंपरेप्रती असलेल्या त्यांच्या वचनबद्धतेमुळे चितळे बंधूंची लोकप्रियता वाढली व त्यांची उत्पादने जगाच्या पाठीवर अनेक देशात पोहोचली आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध ब्रँडपर्यंत वाढलेल्या, चितळे बंधू ब्रँडने नमकीन, मिठाई आणि नाश्त्याच्या विविध प्रकारांचा तसेच पॉकेट फ्रेंडली खाद्यपदार्थांचा समावेश करण्यासाठी खूप मोठा विस्तार केला आहे.
माधव चितळे, श्रीकृष्ण चितळे आणि संजय चितळे यांच्या नेतृत्वाखालील पिढीने आणि आता आलेल्या तिसऱ्या पिढीने त्यांचे जाळे आणखी सर्व दूर पोहोचवले आहे. किरकोळ विक्रीचे जाळे आणि वितरण चॅनेल स्थापित करून देशभरात आपली उत्पादनं पोहोचवली आहेत. त्यांचे वितरण कौशल्य इतके आहे की, आज तीन लाख रिटेल शॉपमध्ये चितळे उत्पादन वेळेवर अचूक पोहोचतात. १९७६ मध्ये, कंपनीने महाराष्ट्रीय बाकरवडी सादर केली, हा एक विशिष्ट आणि लोकप्रिय नाश्ता होता जो लवकरच ग्राहकांमध्ये आवडता झाला. या अनोख्या पदार्थाची वाढती मागणी ओळखली आणि आज केवळ चितळे बंधू यांची बाकरवडी नाही तर पुण्याची ओळख बाकरवडी झाली आहे. स्वतःचा एखादा पदार्थ त्या शहराची, राज्याची ओळख बनू शकतो हे चितळे बंधू यांच्या बाकरवडीने दाखवून दिले आहे. पुण्यातील गजबजलेल्या रस्त्यांपासून ते युनायटेड स्टेट्स, युरोप, आखाती देशादेशांमध्ये बाकरवडी आवडीने खाल्ली जाते. पुण्यात आले की, बाकरवडी न घेता कोणीच जाऊ शकत नाही इतकी अफाट लोकप्रियता या पदार्थाला मिळाली आहे अर्थात यासाठी चितळे यांनी दर्जा, गुणवत्ता राखला आहे. बाकरवडीसाठी लागणाऱ्या मिरचीपासून डाळीपर्यंत ते जातीने लक्ष घालून पिकवून घेतात. मिठाईपासून ते चवदार पदार्थांपर्यंत आणि इतर अनेक २५० हून अधिक उत्पादने आज चितळे बंधूंची बाजारात आहेत. चितळे बंधूंचे पदार्थ लोकप्रिय असले तरी अधिकाधिक लोकांना आपले पदार्थ कळावेत तसेच बाजारातील अन्य पदार्थांबरोबर तुलना करता आपला पदार्थ उत्कृष्ट ठरावा यासाठी जाहिरातीवरही चितळे बंधू नेहमीच लक्ष पुरवतात. चितळे यांच्या जाहिराती सुद्धा त्यांच्या उत्पादनाप्रमाणेच नेहमीच आकर्षक असतात. यंदा चितळे बंधूंचे ७५ म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष सुरू आहे त्यानिमित्ताने त्याने भारतरत्न सचिन तेंडुलकर याला ब्रँड अँबेसिडर केला आहे.
१९३६ च्या सुमारास सांगली जिल्ह्यात कृष्णेकाठी असलेल्या भिलवडी गावात सुरू झालेल्या दुधाचा व्यवसाय आज मोठ्या उद्योग समूहांच्या यादीत झळकला आहे. भाऊसाहेबही आज हयात नाहीत. पण त्यांनी यशस्वीपणे पुढे आणलेला १५० लिटर्स दुधाचा धंदा आज दररोज रोज ४ लाख लिटर्स दूध संकलनावर पोहोचला आहे. जा भिलवडी गावातून चितळे उद्योगाची सुरुवात केली त्या गावाचा कायापालट त्यांनी केला. तेथील लोकांना उद्योग व्यवसाय त्यांच्यामुळे मिळाला आहे. सध्या युरोपियन युनियन, अमेरिका, आग्नेय आशिया आणि ऑस्ट्रेलियामधील देशांमध्ये तिच्या उत्पादन निर्यात करते.
आमच्या कोणत्याही उत्पादन युनिटमध्ये ऑटोमेशन नेहमीच एक मुख्य तत्त्व राहिले आहे. आमची जवळजवळ ८०% उत्पादने स्वयंचलित वातावरणात तयार केली जातात. त्यामुळे क्रॉस हँडलिंग दरम्यान दूषित होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी राहते तसेच मानवी चुकांची शक्यता कमी करते, असं इंद्रनील चितळे यांनी सांगितले. इतका मोठा आणि एस्टॅब्लिशेड उद्योग असूनही नवनवीन पदार्थ बाजारात आणणे, व्यवसाय आणखी फोफावणे तसेच नवनवीन संकल्पनांसाठी त्यांची रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीम सतत कार्यरत असते. एखादा पदार्थ जेव्हा आम्ही लॉन्च करतो त्यापूर्वी वर्ष दोन वर्षे त्यावर संशोधन केले जाते असे इंद्रनिल चितळे यांनी सांगितले. ओल्या नारळाची करंजी, मोतीचूर लाडू, बेसन लाडू, रवा लाडू, पुरणपोळी, उकडीचे मोदक असे आपले पारंपरिक पदार्थ प्रिझर्वेटिव्हचा वापर न करता ताजे बनवून लोकांना हेल्दी फूड खायला देणे हे आमचे उद्दिष्ट आहे असे ते म्हणाले. यापुढेही तीन लाख रिटेलरवरून दहा लाख रिटेलरपर्यंत पोहोचण्याचा कंपनीचा मानस आहे आणि त्या संख्येने उत्पादनात वाढ करणे हेही उद्दिष्ट आहे असे इंद्रानील यांनी सांगितले.
अशा रीतीने काळाप्रमाणे आपल्या उद्योगात बदल करत, संशोधनावर भर देत, वितरण व्यवस्थेचं जाळं अचूक विणत, ग्राहक हाच सर्वोतोपरी असे मानत, दर्जा टिकवत एखादा उद्योग केला की तो सर्वदूर पोहोचून सातत्याने विकास साधू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे चितळे बंधू उद्योग समूह असे म्हणता येईल.