दुबईच्या अरबी वाळवंटात रोहित शर्माने स्वतःची एक परिकथा रचली आणि त्यामुळे भारत चॅम्पियन ट्रॉफी जिंकू शकला. त्यात भारताने सर्वाधिक वेळा ही ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम नोंदवला आणि भारताने चॅम्पियनशिप जिंकवण्यासाठी स्वतःचे अनेक पैलू दाखवले. दुबई येथे झालेल्या या रोमांचक थ्रिलर सामन्यात एका थिलर चित्रपटाचे सर्व गुण होते. रोहितवर अलीकडे त्याच्या खराब फॉर्मसाठी प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले होते आणि रोहितने आता निवृत्त व्हावे अशी टीका त्याच्यावर क्रिकेट रसिकांकडून सुरू होती. या रोहित आणि त्याच्या टीमच्या विजयाच्या मार्गात जरूर अडथळे होते पण रोहित आणि त्याच्या टीमने ते सारे पार करून चॅम्पियनशिप जिंकली आणि विरोधकांच्या टीकेला निरुत्तर केले. २५२ धावांचा पाठलाग करताना रोहितच्या बॅटमधून चौकार आणि षटकार पडत होता आणि त्याच्या आक्रमक फलंदाजीपेक्षा त्याचे खेळातील बारकाव्यांवरील प्रभुत्व विजयाला आकार देत होते. त्याला साथ दिली ती दुसरा फलंदाज श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल. यांच्या साथीमुळे आपल्याला विजय मिळवता आला. रोहितचे फिरकी गोलंदाज त्याच्या मदतीला धाऊन आले आणि मग भारताने इतिहास रचला.
भारताने या सामन्यात सामना जिंकला आणि भारतीयांना गर्वाने मान ताठ करण्याची संधी दिली. अखेर के. एल. राहुलने एक षटक शिल्लक असतानाच सामन्यावर भारताची मोहर उमटवली आणि भारताचा दुष्काळ संपवला. या सामन्यात भारतासाठी काही घटक महत्त्वाचे ठरले हे जरी असले तरी सुरुवातीपासूनच रोहित शर्माने शुभमन गिलसोबत भक्कम पाया रचला, त्यानंतर मधल्या फळीत श्रेयसने अक्षर पटेलसह उत्कृष्ट भागीदारी रचली आणि लोकेश, राहुलसह हार्दिक पांड्याची गोलंदाजी किवींना भारी ठरली. रवींद्र जडेजाने चौकार मारत भारताचा विजय पक्का केला. या विजयामुळे भारताने या प्रकारच्या मालिकेत आणि इतिहासात आपले वर्चस्व प्रस्थापित केलेच पण सर्वात यशस्वी संघ असा नावलौकिकही प्राप्त केला. भारत आता ही मालिका सर्वाधिक वेळा जिंकणारा संघ ठरला आहे. चॅम्पियन ट्रॉफी ही स्पर्धा मिनी वर्ल्ड कप म्हणून ओळखली जाते आणि त्यात जगातील आठ टॉपचे संघ सामील होत असतात. त्या दृष्टीने आपला विजय हा खूप महत्त्वाचा ठरतो. या सामन्यात अत्यंत हाय स्टेक्स लागलेले असतात आणि त्यामुळे ही स्पर्धा जिंकेल तोच जगज्जेता म्हणून समजला जातो. चॅम्पियन ट्रॉफी ही त्यातील रोमांचक सामन्यांसाठी ओळखली जाते आणि प्रेक्षक आपल्या आसनांच्या कडांवर येऊन सामन्याचा थरार पाहण्यास बसलेले असतात. असा थरार त्यांना फुटबॉल किंवा हॉकीतच पाहायला मिळतो. त्यामुळे या सामन्यांचे महत्त्व आगळेच आहे आणि त्यात भारताने तीन वेळा ही स्पर्धा जिंकून आपणच क्रिकेट विश्वाचे बॉस आहोत हे सिद्ध केले आहे. ही ट्रॉफी म्हणजे क्रिकेटमध्ये मिळवलेल्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठीच आहे आणि त्यावर भारत पुरेपूर कसोटीस उतरला आहे. रोहित या सामन्यातील विजयाचा शिल्पकार ठरला तरीही तो सध्या त्याच्या करिअरच्या उतरत्या वर्षात आहे. त्याच्यावर प्रचंड टीका होत होती आणि त्याने निवृत्त व्हावे असा मोफतचा सल्लाही दिला जात होता. ऑस्ट्रेलियात झालेल्या भारताच्या निराशाजनक कामगिरीनंतर रोहित आणि विराट यांच्यावर चौफेर टीका झाली. पण त्या सर्व टीकांना पुरून उरत या दोघांनीही आपल्यात अजून पुष्कळ क्रिकेट शिल्लक आहे याची ग्वाही दिली. याच सामन्यानंतर रोहित निवृत्त होणार अशी चर्चा होती. अनेक पत्रकार तर रोहितच्या पोस्ट मॅच कॉन्फरन्ससाठी बसले होते. पण त्यांच्या पदरी निराशा आली आणि भारतीयांच्या जल्लोषात अवघा देश बुडून गेला.
रोहितने आपला निवृत्तीचा निर्णय घेतला नाही आणि त्यामुळे हजारो भारतीय क्रिकेट रसिकाचा जीव भांड्यात पडला. भारताकडे या सामन्यात बेस्ट बॉलिंग लाईनअप होती, बेस्ट फलंदाजी होती आणि सारे काही घटक जुळून आले होते. त्यामुळे या विजयाचे श्रेय रोहित आणि त्याच्या सहकाऱ्यांचे आहे. कुलदीप यादव आणि रवींद्र जाडेजा यांची गोलंदाजी आणि शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांची फलंदाजी तसेच अय्यरने त्यांना दिलेली साथ याबरोबरच के. एल. राहुल याची फलंदाजी या सर्वांच्या जोरावर रोहितची टीम स्पर्धेत विजयी झाली आणि या सामन्यातच नव्हे तर संपूर्ण स्पर्धेत भारत अपराजित राहिला आणि प्रत्येक सामन्यात सर्वच खेळाडूंनी योगदान दिले आहे. भारताचा प्रवास तसा सोपा होता, असे आता म्हटले जात आहे. कारण भारताने एकही सामना पाकिस्तानात खेळला नाही आणि त्यांना हा फायदा मिळाला असे काही इंग्लिश वर्तमानपत्रे म्हणत आहेत. पण त्यांची ही बोंब भारताच्या विजयामुळे आहे हे उघड आहे, कारण यापूर्वी भारताला कसोटी सामन्यात ढापले जात होते तेव्हा हीच वर्तमानपत्रे काहीही बोलत नव्हती. दुरंगी सामन्यात इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला तेव्हा इंग्लंडचा जॉन लिव्हर याने भारताच्या फलंदाजाना ढापले होते. त्याविरोधात कुणी आवाज उठवला नव्हता. पण आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. आज परदेशी संघांच्या समोर दबणाऱ्यांपैकी भारत नाही हे त्याने दाखवून दिले आहे. भारत आज जशास तसे उत्तर देत आहे आणि हे काही परदेशी पत्रकारांना सहन होत नाही आणि त्यामुळे त्यांच्या तक्रारी आहेत की, भारतासाठी फायद्याच्या मॅचेस ठेवल्या गेल्या. पण तसे काही नाही. दुबईत भारताचे सारे सामने झाले पण त्याही खेळपट्ट्या भारतासाठी सोयीच्या नव्हत्याच. भारताचा प्रशिक्षक गौतम गंभीरने अशी टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. भारत हा आजपर्यंत पांढऱ्या चेंडूचा राजा आहे आणि हे भारताने पुन्हा सिद्ध केले आहे. आता यावर काही प्रतिक्रिया उमटतील, तर त्यांच्याकडे लक्ष देऊ नये हेच खरे.