मुंबई : नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित ‘सैराट’ (Sairat) चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीत एक इतिहास रचला आहे. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिस दणाणून सोडला होता. या चित्रपटातील आर्ची आणि परशाने महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील प्रेक्षकांनाही वेड लावले. आता हे वेड पुन्हा लावण्यासाठी सैराटची टीम सज्ज झाली आहे. सध्या मनोरंजन क्षेत्रात जुने चित्रपट री-रिलीज करण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. त्याप्रमाणे आता सैराट चित्रपट सुद्धा तब्बल ९ वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
“आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील. आम्ही प्रामाणिकपणे काम केले होते. सैराटने महाराष्ट्रातच नाही तर भारतभर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आणि आज पुन्हा एकदा आमचा हा चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळतेय. याहून आनंद काय असू शकतो? यासाठी मी झी स्टुडिओजला मनापासून धन्यवाद देतो. चित्रपटाच्या पुनर्प्रदर्शनामुळे आम्हाला पुन्हा एकदा तोच अनुभव, तीच उत्सुकता आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळेल , याची मला खात्री आहे.” असे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी म्हटले.
कधी होणार प्रदर्शित?
रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर (Akash Thosar) यांची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट येत्या २१ मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता ‘सैराट’च्या चाहत्यांना पुन्हा एकदा आर्ची आणि परश्याच्या प्रेमकहाणीची जादू मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.
सैराट माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग – रिंकू राजगुरू
“सैराट हा चित्रपट माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. आर्ची या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. या चित्रपटाने मला फक्त ओळख नाही तर प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा दिली. ‘ सैराट’ पुन्हा प्रदर्शित होतोय याचा मला खूप आनंद आणि अभिमान आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला या चित्रपटात काम करण्याची संधी दिली यासाठी मी त्यांची कायम आभारी असेन,” असे रिंकू राजगुरुने (Rinku Rajguru) म्हटले आहे.
View this post on Instagram