भाडोत्री फेरीवाल्यांना संरक्षण, स्थानिकांवर मात्र अन्याय
मुंबई (खास प्रतिनिधी): दादर पश्चिम येथील रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर मागील तीन ते चार दिवसांपासून कडक कारवाई केली जात असून शनिवारीही कडक कारवाईची झलक पाहायला मिळाली होती; परंतु रविवारीही कारवाई दिसून आली असली तरी ज्यांचे संबंध चांगले त्यांना व्यवसाय करण्यास परवानगी दिली का, असा सवाल दादरकरांच्या मनात निर्माण होत होता. त्याचे कारण असे होते की रेल्वे स्थानक परिसर फेरीवाल्यांमुळे अडला गेला होता; परंतु दीडशे मीटरच्या पुढील भागांत मात्र एकही फेरीवाला दिसून येत नव्हता. त्यामुळे दीडशे मीटरच्या पुढे कारवाई आणि दीडशेच्या आत फेरीवाले बसलेले दिसून आल्याने भाडोत्री फेरीवाल्यांना संरक्षण आणि पुढील बाजूस बसलेल्या स्थानिकांवर अन्याय करण्याचा प्रयत्न तर होत नाही ना असा सवाल उपस्थित होत आहे.
मुंबई महापालिकेच्या वतीने मुंबईतील २० ठिकाणे ही फेरीवालामुक्त करण्याचा निर्णय घेवून फेरीवाल्यांविरोधातील कारवाई हाती घेण्यात आली आहे. या २० ठिकाणांमध्ये दादर पश्चिम रेल्वे स्थानकांचा समावेश असून मागील चार ते पाच दिवसांपासून येथील भागांमधील फेरीवाल्यांविरोधातील कारवाई तीव्र करण्यात आली आहे. महापालिकेच्या जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी यांनी स्थानिक पोलिस आदींच्या मदतीने दादरमधील फेरीवाल्यांच्या मुसक्या आवळून हा परिसर मोकळा करून देण्याचा प्रयत्न केला. एरव्ही अशाप्रकारची कारवाई सुरु झाली कि शनिवारी कारवाईत ढिलेपणा दिसून येत असला तरी शनिवारीही ही कारवाई कडक केली होती. त्यामुळे शनिवारी रात्री आठ नंतर पुन्हा रस्त्यावर फेरीवाल्यांनी पथारी पसरवून आपले धंदे थाटले आणि महापालिकेला आव्हान दिले होते. परंतु रविवारी या कारवाईचे चित्र वेगळेच पहायला मिळाले. दादर रेल्वे स्थानकाशेजारी सेनापती बापट मार्ग, केशवसुत उड्डाणपुलाखाली जागा, रानडे मार्ग, डिसिल्व्हा मार्ग, जावळे मार्ग आदी ठिकाणी फेरीवाल्यांनी सकाळपासून धंदे थाटले होते.
या मार्गावरील दीडशे मीटर परिसरात फेरीवाल्यांनी धंदे थाटून रस्ते आणि पदपथ अडवले होते. परंतु याच रस्त्यांच्या दीडेश मीटरच्या पुढील बाजुस तसेच केळकर मार्गावर मात्र कारवाई कडक करण्यात आली होती, याठिकाणी एकाही फेरीवाल्याला बसू दिले गेले नव्हते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर परिसरात फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास निर्बंध आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटरपरिसरात कारवाई होणे अपेक्षित असताना नेमकी उलट कारवाईचे चित्र दादरकरांना दिसून आले आहे. रेल्वे स्थानक परिसर फेरीवाल्यांमुळे गर्दी भरलेला असून उलट पुढील भागांमध्ये कारवाई करण्यात येत असल्याने नक्की महापालिका आणि पोलिस यांनी नियम बदलून रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मुभा दिली आहे का आणि उर्वरीत भागांमध्ये बसू द्यायचे नाही असे आहे का, असा प्रश्न दादरकरांना पडला आहे. विशेष म्हणजे महापालिकेची कारवाई आणि केळकर मार्गावरील खांडके इमारत परिसरातील वाढत्या फेरीवाल्यांविरोधातील कारवाई अशाप्रकारच्या दोन कारवाई एकत्र हाती घेण्यात आल्या आहेत; परंतु यामध्ये भाडोत्री फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मुभा आणि स्थानिक फेरीवाल्यांच्या व्यवसायावर टाच आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे दिसून येत आहे.