Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीहे तर चॅम्पियन बजेट – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हे तर चॅम्पियन बजेट – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या लोकाभिमुख योजना आणि पायाभूत सुविधा यांचा योग्य तो संतुलन राखणार हे चॅम्पियन बजेट उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी मांडले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच्या अर्थसंकल्पाविषयी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

गेल्या अडीच वर्षांपासून विकासाची घोडदौड सुरू असून महाराष्ट्र आता थांबणार नाही हा निर्धार आजच्या अर्थसंकल्पातून व्यक्त होतो असे सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, दिवंगत शेषराव वानखेडेंनंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळेस देखील हा अर्थसंकल्प मांडतांना समतोल राखत सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

अमेरिकेसारख्या प्रगत देशाचा विकास हा रस्त्यांमुळे झाला आहे. आजच्या अर्थसंकल्पात रस्ते, पूल, बंदरे अशा पायाभूत सुविधांच्या विकासासाठी चांगली तरतूद केली आहे असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले की, आजच्या अर्थसंकल्पात एकही क्षेत्र सोडलेले नाही. औद्योगिक विकासात महाराष्ट्र आघाडीवर असून तो आणखीही पुढे राहील त्याचप्रमाणे गुंतवणुकी मोठ्या प्रमाणावर येईल अशा तऱ्हेने या अर्थसंकल्पामध्ये तरतुदी करण्यात आल्या आहेत.

अजित पवारांनी ११ व्यांदा सादर केला अर्थसंकल्प

मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्राची क्षमता दीड ट्रिलियन डॉलर्स योगदानाची आहे. समृद्धी, अटलसेतू सारखे गेम चेंजर प्रकल्प गेल्या अडीच वर्षांत पूर्ण झाले आहेत.

शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना आणखी लाभ होईल. अडीच वर्षांपासून आपण सिंचनाच्या प्रकल्पांना वेग दिला असून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी उचललेली पावलं अतिशय महत्त्वाची आहेत. गरीब, दुर्बल महिलांना केवळ लाडकी बहीण योजनेतून पैसे देऊन आम्ही थांबलेलो नाहीत तर त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी या बजेटमध्ये आम्ही तरतूद केलेली आहे. लाडकी बहीण योजना बंद करण्यात येणार असा अपप्रचार विरोधकांनी सुरू केला होता मात्र आम्ही या योजनेसाठी बजेटमध्ये 36 हजार कोटींची तरतूद करून बहिणींना मदत करण्याचा आमचा निर्धार कायम ठेवला आहे असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कुठल्याही प्रकारे या अर्थसंकल्पात योजनांना कात्री लावलेली नाही, उलट पायाभूत सुविधांच्या विकासांना या बजेटमध्ये वेग देण्यात आलेला आहे असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, विकास हाच आमचा अजेंडा असून लोकांचे कल्याण हेच आमचे ध्येय आहे. विकसित भारत घडवण्यामध्ये विकसित महाराष्ट्राचं योगदान अधोरेखित करणारा हा अर्थसंकल्प आहे असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -