बेस्ट उपक्रमाची व्यथा

Share

अल्पेश म्हात्रे

कोणे एकेकाळी मुंबईची शान असलेल्या व मुंबईची दुसरी लाईफ लाइन असलेल्या बेस्ट उपक्रमाला मोठी घरघर लागली असून बेस्टला वाचवण्यासाठी मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे. सध्या बेस्टच्या मागे लागलेल्या संकटांची मालिका संपतच नाही त्यात आर्थिक बाजूने बेस्ट पूर्णपणे कोलमडली असून आता मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे. बेस्टची पालक संस्था असलेली मुंबई महानगरपालिका जरी त्याला तात्पुरता टेकू देत असली तरी बेस्टला सक्षमपणे स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे. कोणे एकेकाळी बेस्टच्या ताब्यात ४ हजार ५०० बस गाड्या होत्या त्यातून ४८ लाख प्रवाशांची सेवा बेस्ट उपक्रमातर्फे देण्यात येत होती मात्र आज बेस्टच्या ताफ्यात २ हजार ८१६ बस गाड्या असून त्यातून ३४ लाख प्रवाशांना सेवा दिली जात आहे. त्यातल्या ८४७ बस या स्वमालकीच्या असून बाकी संपूर्ण बस ताफा हा वेटलिज मॉडेल म्हणजे खासगी कंत्राटदाराच्या बस गाड्या आहेत. बस गाड्या कमी असल्यामुळे बस प्रवाशांना एका बससाठी तासंतास वाट पाहावी लागते, तसेच बस आल्यास ती खचाखच भरली असल्याने बसमध्ये प्रवाशांना चढता येत नाही.

मुंबईची लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे.त्यात आज ते दीड कोटींच्या आसपास आहे, तर बस गाड्यांची संख्या २८१६ बस गड्या आहेत, तर एके काळी ७० ते ८० लाख असलेली लोकसंख्या होती, तर बस गाड्यांची संख्या ही ४ हजार ५०० होती. मागील पाच वर्षांत बेस्टने २ हजार १६० बस गाड्या मोडीत काढल्या, तर केवळ ३७ नवीन बस गाड्या खरेदी केल्या आहेत. २०१० – २०११ साली एका बस गाडीमार्फत ९३५ प्रवासी वाहून नेले जात होते, तर आता २०२४-२५ साठी एका बसमार्फत १०३७ प्रवासी वाहून नेले जात आहे म्हणजे बेस्टला बस गाड्यांची किती तातडीची गरज आहे हे दिसून येत आहे. आपल्या खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी बेस्टने २०१९ साली वेटलिज मॉडेल राबवण्यास सुरुवात केली. यात बस गाडी बसचालक बस दुरुस्ती सदर कंत्राटदारांची असून उत्पन्न व बस मार्ग ठरवण्याची जबाबदारी बेस्टची होती. या वेटलिज मॉडेलच्या १ हजार ९०० बस सध्या बस ताफ्यात आहेत. मात्र बेस्टमध्ये हे वेटलिज मॉडेल पूर्णपणे अपयशी ठरलेले दिसते. बस गाड्यांची झालेली दुरवस्था तसेच कुशल बसचालक न मिळाल्याने आज अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून आज बेस्टचे नाव जनमाणसात डागाळले आहे. त्यात आज बेस्टमधील बसचालकास ३५००० वेतन असताना या वेटलिजच्या बसचालकास वीस ते बावीस हजार रुपये वेतन मिळते त्यामुळे त्यांच्यात अशांतता नेहमीच कायम असतं त्याचे रूपांतर नेहमी काम बंद आंदोलनामध्ये होते.

यापूर्वीच आपला बसताफा वाढवण्यासाठी बेस्टने वेटलिज मॉडेल खाली मोठे मोठे ऑर्डर्स दिले आहेत मात्र त्या बस ताफ्यात येण्याचे प्रमाण व बसताफ्यातील जुन्या बस गाड्यांचे प्रमाण पाहता वेग खूपच संथ आहे. यापूर्वीच ओलेक्टा या कंपनीला २ हजार १०० बस गाड्यांची ऑर्डर देण्यात आली होती मात्र आतापर्यंत संपूर्ण बस अपेक्षित असताना आतापर्यंत फक्त ३०० बस गाड्याच ताफ्यात आल्या आहेत तर यानंतर याच कंपनीला २४०० बस गाड्यांची ऑर्डर देण्यात आली आहे. या बस येईपर्यंत किती कालावधी लागेल याचे कोणतेही परिणाम नाहीत. त्यामुळेच दिवसेंदिवस बस प्रवाशांचे हाल होतील हे निश्चित! बेस्टच्या स्वमालकीच्या बस गाड्याचा प्रति किलोमीटर खर्च हा १८०च्या आसपास आहे, तर तेच तोच खर्च वेटलीज बसचा हा १२० रुपये आहे, त्यामुळे खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होते म्हणून वेटलिज मॉडेल आणण्यास बेस्टने प्राधान्य दिले मात्र हा खर्च बचत ही अल्पकाळासाठी असून बेस्टला दीर्घकाळासाठी खर्चावर नियंत्रण आणि मदतीची खूप आवश्यक आहे. २०१९ साली मान्यताप्राप्त युनियनची मदत घेऊन व बेस्टमध्ये एक करार करण्यात आला होता, त्यानुसार बेस्टमध्ये स्वमालकीचा ताफा हा ३३३७ ठेवण्यावर एकमत झाले होते मात्र पुढील आर्थिक परिस्थिती पाहताना बेस्टने या कराराचे पालन केले नाही व स्वमालकीच्या बस गाड्या खरेदी केल्या नाहीत मात्र तेच मुंबई महापालिकेबरोबर केलेल्या अटीनुसार बेस्टने बस भाडे कमी करायचे होते व त्याची प्रतिपूर्ती मुंबई महापालिकेकडून करण्यात येत येणार होते मात्र बस भाडे कमी केल्याने बेस्टचे उत्पन्न कमी झाले मात्र आपूर्ति महापालिकेने नियमित स्वरूपात दिली नाही त्यामुळे बेस्टचा तोटा प्रचंड प्रमाणात वाढत गेला. क्रमश:

Recent Posts

लिंबू लोणचं

पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…

12 minutes ago

पुण्यात काँग्रेसला गळती, नेते आणि पदाधिकारी महायुतीच्या वाटेवर

पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…

24 minutes ago

भाषा हे राजकारण्यांच्या हातातले हत्यार नाही!

डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…

26 minutes ago

आदिवासी जमातीसाठी ती ठरली आरोग्यदूत

अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…

31 minutes ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २० एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…

43 minutes ago

PBKS vs RCB, IPL 2025: घरच्या मैदानावर पंजाब पुन्हा एकदा बेंगळुरूला भिडणार

मुंबई(ज्ञानेश सावंत): रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ पावसामुळे मागच्या सामन्यात पंजाब कडून दारुण पराभूत झाला. सुरुवातीचे…

1 hour ago