Monday, March 24, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखPune : पुण्यातील भीषण वास्तव

Pune : पुण्यातील भीषण वास्तव

पुणे येथे काल अत्यंत लज्जास्पद घटना घडली आणि ज्या पुण्याने लोकमान्य टिळक, महादेव गोविंद रानडे यांच्यासाखे अनेक ऋषीतुल्य माणसे दिली त्या पुण्यात लज्जास्पद घटना घडली. यामुळे सारे पुणे शहर हादरले आणि त्यावर आता गदारोळ सुरू झाला आहे, पण या घटनेच्या पाठीशी जो कुणी आहे त्याला सोडले जाणार नाही याची काहीच गॅरंटी नाही. कारण या लज्जास्पद घटनेतील आरोपी एक सधन वर्गीतील आहे आणि त्याला मद्यधुंद अवस्थेत लघुशंका करताना त्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. आरोपी कुणीही असो. त्याच्यापाठीमागे बडे बाप के बेटे असल्याने पोलीस काही तरी कारवाई करणार नाहीत किंवा अगदी थातूरमातूर कारवाई करतील आणि प्रकरण दाबले जाईल. रस्त्यात या तरुणाने लघुशंका केलीच पण अश्लील चाळेही केले. त्यानंतर आता पोलीस कारवाई करण्याच्या मागे लागले आहेत आणि त्यांनी या तरुणाला ओळखले आहे आणि त्याला लवकरच पोलीस पकडतील. पण नंतरची भूमिका महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे राजकीय दबाव. या तरुणाला तो उच्चभ्रू असल्याने सोडवण्यासाठी दबाव येणारच नाही असे नाही, तर उलट जास्तच दबाव येईल.

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून स्वारगेट येथील बसमध्ये बलात्कार करण्यात आला होता आणि त्या आधी काही दिवसापूर्वी पोर्शे गाडीतून अशाच मद्यधुंद तरुणांने अपघात करून दोघांना उडवले होते. मुंबईमध्ये नेहमी घडणाऱ्या घटना आता पुण्यातही होऊ लागल्या आहेत हे चिंताजनक आहे. कारण पुणे पूर्वी असे नव्हते. येथे संस्कृती नांदत होती आणि पुण्याचा आदर्श घेऊन अवघा महाराष्ट्र चालत असे. पण आजकाल पुणे तसे राहिलेले नाही हे वास्तव पुन्हा पुन्हा पुण्यातील या घटना दर्शन देत आहेत. पुण्यातील स्थानिक लोक जास्त नाहीत. जे काही आहेत ते बाहेरचे आहेत आणि त्यात परप्रांतियांचा भरणा जास्त आहे. त्यामुळे हे होत असेल असे मानण्यास जागा आहे. पुण्यात पूर्वी पब संस्कृती नव्हती, दारूचे उघड उघड चालणारे धंदे नव्हते आणि लोक मर्यादा पाळून जे काही करायचे ते करत. पण आज पुण्यात कुणालाच कसलाच धरबंद राहिला नाही हे सत्य आहे. पुण्यात मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून अपघात घडण्याचे प्रकार अनेक घडले आहेत, पण बीएमडब्ल्यू गाडी चालवून मद्यधुंद तरुणाने लघुशंका करण्याचा प्रकार प्रथमच घडला असावा. स्थानिकांनी या तरुणास हटकले असता त्याने उर्मट उत्तरे देऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेने पुणे तर हादरलेच पण राजकीय पक्षांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात राजकीय पक्षांचे अनेक नेते असले तरी अशा लोकांना वाचवणारेही हेच लोकं असतात. याचाच अर्थ आपण पूर्वीच्या घटनांपासून कुणीही धडा घेतलेला नाही. याचा अर्थ असा की, या लोकांच्या मागे राजकीय आशीर्वाद असतोच आणि त्यामुळे कोणाचेही काहीच चालत नाही. पोलिसांनी या तरुणाला पकडले हे बरे केले. पण त्याला जबर शिक्षा होईल की, नाही हा प्रश्न वेगळाच आहे. कारण या तरुणाच्या पाठीशी त्याचे राजकीय आका उभे राहतील आणि येथे बिहारसारखी परिस्थिती उद्भवलेली दिसू शकेल. या घटनेनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एवढी अलिशान गाडी असतानाही त्या मुलांना लघुशंकेसाठी सार्वजनिक शौचालय उपलब्ध होऊ शकले नाही का आणि पोलीस ठिकठिकाणी उभे असतात पण त्यांच्या देखत असे प्रकार घडतात तरीही ते काहीही करू शकत नाहीत अशी मोठी विचित्र परिस्थिती पुण्यात तयार झाली आहे. याला कारणही तसेच आहे.

एकेकाळी सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेले पुणे शहर आता ड्रग्ज शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. त्यामुळे सारे काही गैरप्रकार या पुण्यात राजरोस घडताना दिसतात. पोलिसांवर आता जबाबदारी मोठी आहे. पण त्यांनी आपली जबाबदारी ओळखून ती व्यवस्थित पार पाडावी हीच पुण्यातील सच्छील नागरिकांची अपेक्षा आहे. पुण्याला ड्रग्जचा विळखा पडला आहे आणि पूर्वी पंजाबसारखी जशी परिस्थिती असते तशीच आज पुण्याची आहे. पंजाब हे राज्य ड्रग्जच्या विळख्यात अडकले होते. आजही त्यातून ते राज्य बाहेर पडलेले नाही. पण आज पुण्यासारखी शहरे त्याचा घास होत आहेत. पुण्यात काही महिन्यांपूर्वी घडलेले ललित पाटील प्रकरण आणि मेफेड्रोनचा प्रकार घडल्यानंतर हा प्रकार आता समोर आला आहे. त्यामुळे चांगले नागरिक पुण्यातच राहत नाहीत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पुण्याचा उडता पंजाब झाला आहे की काय अशी शंका येत असतानाच ताज्या प्रकरणाने पुण्याविषयक चिंतेत भर पडली आहे. पुण्यात दिवसंदिवस पब संस्कृती पसरत आहे आणि या प्रकारानंतर तर तरुणाईबद्दल चिंता व्यक्त करावी अशी स्थिती आहे. पिंपरी-चिंचवडसारखे ठिकाण तर बांगलादेशी घुसखोरांच्या ठिकाणाला उद्ध्वस्त करण्यात आले पण आता पुण्यात या संस्कृतीबरोबरच अश्लील चाळे करणारे तरुण दिसत आहेत आणि त्यामुळे पुण्याचे सामाजिक जीवन उद्ध्वस्त होत आहे. कोणत्याही परिस्थितीत पुण्याला यापासून वाचवायला हवे. त्यासाठी सजग नागरिकांनी एक जुटीने आवाज उठवून आसपास कुणी नवखा दिसला तरीही त्याविरोधात पोलिसांत तक्रार नोदवायला हवी. पुण्यातील घरमालकांनी सजग राहून आपल्या भाडेकरूंची व्यवस्थित चौकशी करूनच त्याला ठेवून घेतले पाहिजे. हे सारे पोलिसांकडून होतच असते. पण नागरिक म्हणूनही आपली काही जबाबदारी आहे याची जाणीव सर्वानी लक्षात ठेवून त्यानुसार कठोर वर्तन ठेवायला हवे. पुण्याचे एकेकाळी कोण कौतुक होते. कारण सारे चांगले लोक पुण्यात राहतात असा लौकिक होता. पण आज पुण्याचा लौकिक काय आहे तर चिमुरडीवर अत्याचार, मद्यधुंद तरुणांने भरधाव वेगाने वाहन चालवून निरपराध नागरिकांना ठार केले आणि वर त्याचे आई-वडील उच्चभ्रू असल्याने त्यांची सुटका, स्वारगेटमध्ये बसमध्ये भर रस्त्यात तरुणीवर बलात्कार होतो ही निश्चितच पुण्याची गौरवास्पद बाब नव्हे. पुण्याचे वास्तव सर्वांच्या डोळ्यांत अंजन घालणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -