डोंबिवली : पुण्याला शिक्षणाचे माहेरघर आणि डोंबिवलीला सांस्कृतिक राजधानी म्हणून अनेकजण ओळखतात. यामुळे डोंबिवलीतील सांस्कृतिक घटनांना विशेष महत्त्व आहे. डोंबिवलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सावरकर शाखेवर दगडफेक झाली आहे. केंद्रात आणि देशातील अनेक राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीची पितृ संस्था म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. संघाने स्थापन केलेल्या डोंबिवलीतील सावरकर शाखेवर दगडफेक झाली. यामुळे या घटनेला महत्त्व प्राप्त झाले आहे.
दगडफेकीची घटना रविवारी रात्री घडली. या प्रकरणी डोंबिवलीच्या टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दगडफेक करणाऱ्यांचा शोध सुरू आहे.
डोंबिवली पूर्वेतील खंबाळपाडा परिसरातील चौधरी वाडी मैदानात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वीर सावरकर शाखा मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. या शाखेत लहान मुले आणि तरुण मोठ्या संख्येने येतात. शाखा अध्यक्ष संजू चौधरी आणि शिक्षक पवन कुमार यांच्या मार्गदर्शनात ही शाखा कार्यरत आहे. याच शाखेरवर रविवारी रात्री दगडफेक झाली. शाखेजवळच्या जंगलातून अंधाराचा फायदा घेऊन दगडफेक करण्यात आली. परिसरातील काही इमारतींमध्ये लपलेल्या अज्ञातांनीही दगडफेक केली. शाखा सुरू असताना दगडफेक झाली. पण मुलांनी आवश्यक ती खबरदारी घेतल्यामुळे कोणी जखमी झाले नाही. शाखेवर झालेल्या दगडफेकीनंतर संघाच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी दगडफेक प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.