मुंबई : मुंबई-गोवा मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला दिवसागणिक उत्तम प्रतिसाद मिळत असून प्रवाशांची संख्याही वेगाने वाढत आहे. मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांत एकूण ५० हजार ७३९ प्रवाशांनी या ट्रेनमधून प्रवास केला आहे. वेगवान, सुरक्षित आणि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या ट्रेनला प्रवासी आणि पर्यटकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन करण्यात आले होते. सेमी-हायस्पीड ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. पहिल्याच फेरीत या ट्रेनच्या ५३३ आसन क्षमतेपैकी ४७७ आसने भरली होती; प्रारंभी ९१.४४ ते ९३.११ टक्के क्षमतेने धावणाऱ्या या ट्रेनला सध्या ९५ टक्के प्रतिसाद मिळत आहे. या ट्रेनला आठ डबे असून प्रवाशांसाठी आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत रेल्वे मंत्रालयाने वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती केली असून ती किफायतशीर दरात उपलब्ध आहे. सध्या मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी-सोलापूर, सीएसएमटी-शिर्डी, सीएसएमटी-जालना आणि सीएसएमटी-मडगाव या वंदे भारत गाड्या धावत आहेत. या सर्व गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत असून सुरक्षित आणि वेगवान प्रवासासाठी प्रवासी समाधान व्यक्त करीत आहेत.