मुंबई : राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2025 ) सादर केला. यावेळी त्यांनी मुंबई उपनगरातील वाहतूक गतिमान व्हावी यासाठी वर्सोवा ते मढ, वर्सोवा ते भाईंदर किनारी मार्ग, मुलुंड ते गोरेगाव, ठाणे ते बोरीवली आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग असे ६४ हजार ७८३ कोटी किमतीचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा उन्नत मार्ग बांधण्याचे नियोजन असून त्याद्वारे ठाणे, डोंबिवली, कल्याण व इतर महत्त्वाची शहरे विमानतळाशी जोडली जाणार आहेत. तसेच, बाळकुंभ ते गायमुख या ठाणे किनारी मार्गाची लांबी १३.४५ किमी असून त्याचे ३,३६४ कोटींचे खर्चाचे काम २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
ग्रामसडक योजनेचा पहिला टप्पा पूर्ण
अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील पहिल्या टप्प्यातील कामं पूर्ण झाली असून दुसऱ्या टप्प्यांतर्गत ९.६१० किमी लांबीच्या रस्त्यांचा दर्जा सुधारण्याची कामे हाती घेतली आहेत. ही कामे मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे.
या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात अतिरिक्त ७ हजार किमी रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाईल. तिसऱ्या टप्प्यात १ हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असणारी ३,५८२ गावं १४ हजार किमी लांबीच्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याने प्रमुख जिल्हा-राज्य-राष्ट्रीय महामार्गांना जोडली जातील. याची एकूण किंमत ३०,१०० कोटी रुपये इतकी आहे. पहिल्या टप्प्यात ८ हजार कोटींची केली जाणार आहेत.