मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला अभिनंदनाचा ठराव
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी चॅम्पियन्स चषक जिंकल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदनचा ठराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला. हा ठराव एकमताने पारित करण्यात आला.
भारतीय क्रिकेट संघाने दुबई येथे खेळल्या गेलेल्या आयसीसी चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला. या विजयाने तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स चषकावर नाव कोरणारा भारत हा जगातील एकमेव देश ठरला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले.
Team india: २ वर्ल्डकप, २ टी-२० वर्ल्डकप आणि ३ चॅम्पियन्स ट्रॉफी…भारताच्या नावावर ७ आयसीसी खिताब
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आयसीसी चॅम्पियन्स चषकावर तब्बल १२ वर्षांनंतर भारताचे नाव कोरले गेले आहे. भारतीय संघाचा विजय, सांघिक भावना आणि जिद्द, चिकाटीतून क्रिकेट प्रेमींसाठी अवर्णनीय, अविस्मरणीय आनंदाची पर्वणी ठरली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्णधार रोहित शर्मा यांचे विशेष कौतुक केले आहे. या संपूर्ण मालिकेवर कर्णधार रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सुरवातीपासून वर्चस्व राखले आणि अंतिमतः विजयाचा कळस गाठला. अंतिम सामन्यातही कर्णधार रोहित शर्मा यांनी खेळलेली ७६ धावांची खेळी अविस्मरणीय ठरली.
वास्तू विषारद असलेल्या गोलंदाज वरुण चक्रवर्ती यांनी क्रिकेटमध्ये पुनरागमन करीत भारतीय क्रिकेट संघाला मोक्याच्या वेळी विकेट्स काढून दिल्या. क्रिकेट हे भारतीयांचे वेड आहे. पण केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील क्रिकेटप्रेमी भारतीय संघाचे चाहते आहेत. क्रिकेट विश्वामध्ये भारत सध्या नेतृत्व करीत आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावर स्पर्धा सुरू होण्याआधी टीका झाली. त्यांच्या फॉर्मविषयी साशंकता निर्माण करण्यात आली. मात्र ‘फॉर्म’ हा तात्पुरता असून ‘क्लास’ हा कायम असतो, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे अभिनंदन केले.