मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्प हा महाराष्ट्राची विकासाची गती वाढविणारा आहे. अर्थसंकल्पात ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उन्नत मार्ग आणि नवी मुंबई व खारघर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापर केंद्रे निर्माण करण्याची घोषणेमुळे नवी मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर होण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया राज्याचे वने मंत्री गणेश नाईक यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर व्यक्त केली.
राज्याच्या अर्थसंकल्पातील पायाभूत सुविधांवर भर, शेती क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि सामाजिक कल्याणाच्या योजनांच्या तरतुदीमुळे राज्याचा विकासाची गती आणखी वेगाने वाढणार आहे. महामुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रोथ हब करण्याच्या घोषणेचा फायदा नवी मुंबई व खारघरला होणार आहे. त्याचबरोबर पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर आणि त्याच्या जवळील प्रस्तावित तिसऱ्या विमानतळामुळे व समृद्धी महामार्गाला जोडले जाणार असल्यामुळे पालघर परिसराचा विकास गतीने होणार आहे. पायाभूत सुविधांवर भर दिल्यामुळे राज्यात बंदरे, विमानतळांच्या विकासासाठीही मोठी गुंतवणूक येण्यास मदत होणार असल्याचा विश्वास वने मंत्री श्री. नाईक यांनी यावेळी व्यक्त केला.
लाडकी बहिण योजना, लखपती दिदी योजनामुळे राज्यातील लाडक्या बहिणी आत्मनिर्भर व स्वयंपूर्ण होण्यास मदत होणार आहे. शेती, शिक्षण, सिंचन, महिला, आरोग्य, पायाभूत सुविधा, शिक्षण, मनुष्यबळ विकास, दळणवळण, पर्यटन, सांस्कृतिक आणि उद्योग या सर्वच क्षेत्रासाठी भरीव तरतूदीमुळे हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक व सामाजिक न्यायाचे तत्व पाळणारा असल्याचेही श्री. नाईक यांनी यावेळी सांगितले.