Friday, May 9, 2025

देशमनोरंजनमल्टिप्लेक्सताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

सोन्याची तस्करी करणारी अभिनेत्री न्यायालयात हजर करताच रडू लागली

सोन्याची तस्करी करणारी अभिनेत्री न्यायालयात हजर करताच रडू लागली
बंगळुरू : सोन्याची तस्करी करण्यासाठी वारंवार दुबई - बंगळुरू असा विमान प्रवास करणारी कानडी अभिनेत्री रान्या राव (Ranya Rao) सोमवारी १० मार्च रोजी न्यायालयात हजर करताच रडू लागली. डीआरआयचे (Directorate of Revenue Intelligence or DRI / महसूल गुप्तचर संचालनालय) अधिकारी मानसिक छळ करत असल्याचा आरोप रान्या रावने केला. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी मारहाण केली नाही पण शिव्या दिल्या. या शिव्यांद्वारेच ते मानसिक छळ करत आहेत, असे रान्या राव म्हणाली. अखेर न्यायालयाने कानडी अभिनेत्री रान्याची २४ मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.



न्यायालयाने निर्णय देण्याआधी डीआरआयच्या वकिलाला त्यांची बाजू मांडण्यास सांगितले. यावेळी डीआरआयच्या वकिलाने रान्याचे आरोप फेटाळले. रान्याला स्वतःच्या वकिलाला भेटण्यासाठी वेळ देण्यात आला होता. या वेळेत रान्याने हा मुद्दा वकिलाला का सांगितला नाही, असा प्रश्न न्यायालयाने विचारला त्यावर रान्याने समाधानकारक उत्तर दिले नाही.



अभिनेत्री रान्याची चौकशी करतानाचे सर्व रेकॉर्डिंग करण्यात आले आहे. रान्याने चौकशीत सहकार्य केलेले नाही. प्रश्नांची उत्तरे दिलेली नाहीत. पण जेव्हा वकिलाला भेटली त्यावेळी त्याच्याच सांगण्यावरुन चौकशी पथकावर खोटे आरोप करण्यास सुरुवात केली आहे, असे डीआरआयच्यावतीने सांगण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि रान्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.

रान्याने नेमके काय केले ?

वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची मुलगी आणि लोकप्रिय कन्नड (कानडी) अभिनेत्री रान्या राव (Ranya Rao) हिला डीआरआयच्या (Directorate of Revenue Intelligence or DRI / महसूल गुप्तचर संचालनालय) पथकाने केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडले. रान्या पोलीस कॉन्स्टेबल (हवालदार) बसवराजूच्या मदतीने सुरक्षा तपासणी टाळून विमानतळावरुन बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होती. पण डीआरआयच्या पथकाने रान्याला अडवले. यानंतर रान्याची आणि तिच्या सामानाची तपासणी करण्यात आली. या तपासणीत रान्याने शरीराभोवती लपेटलेल्या पट्ट्यात १२.५६ कोटी रुपयांचे १४.२ किलो सोने आढळले. हे सोने जप्त करण्यात आले. रान्याच्या घरातून २.६७ कोटींची रोख रक्कम (रोकड) आणि २.०६ कोटी रुपयांचे सोने जप्त केले. या व्यतिरिक्त घरातून तीन मोठे भरलेले खोके जप्त करण्यात आले. एकूण १७.२९ कोटी रुपयांची जप्ती करण्यात आली. रान्या वर्षभरात ३० वेळा दुबईला गेली. ती १५ दिवसांत चौथ्यांदा दुबईवरुन येत होती त्यावेळी तिला अटक झाली.

 
Comments
Add Comment