पुणे : काँग्रेसचे पुण्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर सोमवार १० मार्च रोजी संध्याकाळी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन रवींद्र धंगेकर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. सत्तेशिवाय कामं होत नाहीत अशी जाहीर कबुली देत रवींद्र धंगेकर यांनी शिवसेना प्रवेशाचे संकेत दिले.
मागच्या आठवड्यापर्यंत काँग्रेस बळकट करण्यासाठी काम करणार असल्याची जाहीर भूमिका घेणाऱ्या रवींद्र धंगेकर यांनी सोमवार उजाडण्याआधीच शिवसेना प्रवेशाचा निर्णय घेतला होता. मागील काही दिवसांपासून काँग्रेसच्या आंदोलनांना आणि बैठकांना गैरहजर असलेल्या रवींद्र धंगेकर यांना मागच्या आठवड्यात प्रसारमाध्यमांनी या संदर्भात विचारले. यावेळी काही आधीच ठरलेल्या कामांमुळे पक्षाच्या बैठकांना गैरहजर होतो. पण काँग्रेसमध्येच आहे आणि राहणार… काँग्रेस बळकट करण्यासाठी काम करणार… असे रवींद्र धंगेकर सांगत होते. पण आता त्यांनी भूमिका बदलली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीने रवींद्र धंगेकर यांच्या संपर्कात होते. रवींद्र धंगेकरांच्या मुलाच्या वाढदिवसाला एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उदय सामंत उपस्थित होते. उदय सामंत आणि रवींद्र धंगेकर यांच्या भेटीगाठी वाढल्या होत्या. या बैठका सुरू असताना रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसमध्येच आहोत आणि काँग्रेस बळकटीसाठी काम करणार, अशी जाहीर भूमिका घेतली होती. पण आता लोकांची कामं करण्यासाठी सत्तेची गरज असते असे म्हणत रवींद्र धंगेकरांनी शिवसेना प्रवेशाची तयारी केली आहे.
रवींद्र धंगेकरांनी विधान परिषदेत पद द्या किंवा म्हाडातले पद द्या अशी मागणी केली होती. तसेच महापालिकेत त्यांच्या समर्थकांसाठी १५ ते २० जागांची मागणी केली होती. या मागण्या ऐकल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीने राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी रवींद्र धंगेकरांना आश्वासन दिले आहे. आश्वासनाबाबतची सविस्तर माहिती अद्याप हाती आलेली नाही. पण रवींद्र धंगेकर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत सोमवार १० मार्च रोजी संध्याकाळी शिवसेनेत प्रवेश करत असल्याच्या वृत्ताला उदय सामंत यांनी दुजोरा दिला आहे. यानिमित्ताने रवींद्र धंगेकर यांच्या पक्ष बदलाचे शिवसेना, मनसे, काँग्रेस आणि आता एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना अशा प्रकारे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे.