पुणे : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी वस्त्र संहिता लागू करण्याचा निर्णय लागू करण्यात आला आहे. भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना प्रवेश मिळेल, असा निर्णय श्री मार्तंड देव संस्थान, जेजुरीच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यामुळे, पाश्चिमात्य कपडे परिधान करुन भाविकांना जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेता येणार नाही.
यासाठी देवस्थान ट्रस्टने नियमावली जाहीर केली आहे. यापुढे मंदिरात दर्शनासाठी भारतीय वेशभूषा परिधान करणे आवश्यक असणार आहे. भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना प्रवेश मिळेल असे नियम लागू करण्यात आले आहे. पुरूष व महिला भाविकांना मंदिरात कमी कपड्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही असे नियमच लावण्यात आला आहे.
फॅशन म्हणून वापरण्यात येणाऱ्या फाटक्या जीन्स, बर्मुडा, शॉर्ट, स्कर्ट असा व तत्सम कपडे घालून देवदर्शनास गडावर येण्यास मज्जाव केला जाणार आहे. गुडघ्याच्या वरती असणारे किंवा आखूड-कमी कपडे घालणाऱ्यांसही प्रवेश बंदी असणार आहे. तर हे नियम पाळण्याचं आवाहन सर्व विश्वस्त मंडळाच्या वतीने भाविकांना करण्यात आले आहे.
चंपाषष्ठीला याठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनाला येतात. कारण चंपाषष्ठीच्या दिवशी कुलधर्म असतो. यामुळे भाविक श्रद्धेने देवस्थानामध्ये येऊन खंडेरायाच्या दर्शन घेतात. यातच आता महिला आणि पुरुषांना सारखेच असे काही नियम लावण्यात आले आहेत. ज्याचे पालन करण्याचे आवाहन देवस्थान ट्रस्ट व विश्वस्त मंडळ करत आहेत.